स्मृती इराणींनी कर्कशपणा त्यागण्याची गरज
By admin | Published: March 3, 2016 11:59 PM2016-03-03T23:59:01+5:302016-03-03T23:59:01+5:30
शरद पवार मितभाषी आहेत तर स्मृती इराणींकडे मोठा शब्दसंग्रह आहे. गेल्या आठवड्यात मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी संसदेतील त्यांच्या असाधारण वक्तृत्वाने साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले
राजदीप सरदेसाई, (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)
शरद पवार मितभाषी आहेत तर स्मृती इराणींकडे मोठा शब्दसंग्रह आहे. गेल्या आठवड्यात मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी संसदेतील त्यांच्या असाधारण वक्तृत्वाने साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. देशभरातून त्यांचे अभिनंदन केले गेले. (त्यात मीही होेतो). पण सेन्ट्रल हॉलच्या एका कोपऱ्यात शांतपणे बसलेले शरद पवार या वक्तृत्वाने फारसे प्रभावित झालेले दिसले नाहीत. स्मृती इराणी संसदेत बोलताना संधीचे सोने करीत होत्या, त्याचवेळी राजकारणातील प्रदीर्घ अनुभवी पवारांनी इराणींना एक निरोप धाडला होता. आम्ही नंतर पवारांना विचारले, तुम्ही नेमका कोणता संदेश इराणींना पाठविला होता? त्यावर पवार उत्तरले, ‘संसद म्हणजे टिव्हीवरचा मनोरंजनाचा कार्यक्रम किंवा बॉक्सिंगचा आखाडा नव्हे. मी त्यांना एवढेच म्हटले की, त्यांनी बोलण्यातला कर्कशपणा कमी करावा व कोणावरही व्यक्तिगत हल्ले करू नयेत’.
पवारांनी आयुष्यातली पहिली निवडणूक १९६७ साली लढवली, तेव्हा स्मृती इराणी यांचा जन्मसुद्धा झाला नव्हता. राष्ट्रीय राजकारणातील एवढा मोठा माणूस आज कदाचित तरुण मंत्र्यांच्या आक्रमकतेपायी किंवा पिढ्यांमधील वैचारिक अंतरामुळे आज बाजूला सारला गेला असावा. सध्याचे दिवस दूरचित्रवाहिन्यांवर चमकणाऱ्या राजकारण्यांचे आहेत व २१ शतकातील नेत्या होण्यासाठी स्मृती इराणी यांच्याकडे उत्कृष्ट संवाद कौशल्य आहे. एके काळी दूरचित्रवाणीवर प्रसिद्ध असणाऱ्या इराणींवर स्त्री-द्वेषातून टीकादेखील झाली आहे. कॉंग्रेसचे माजी खासदार संजय निरु पम यांनी त्यांना ‘ठुमके लगानेवाली’ म्हटल्याचे अनेकाना आठवत असेल. अभिनेत्याचा राजकारणी झालेल्या आणि राजकारणात शून्य कर्तुत्व दाखवणाऱ्या गोविंदावर अशा अपमानजनक शब्दात टीका करण्याचे धाडस कुणी केले असते का?
वास्तवात स्मृती इराणी गुणवंत राजकारणी आहेत. त्यांच्या वक्तृत्वाची फार कमी लोकांशी तुलना होऊ शकते. त्या बहुभाषिक आहेत (जवळपास सहा भाषात
त्या अस्खलित बोलू शकतात). त्यांचा आत्मविश्वास आणि प्रतिभा ओसंडून वाहणारी आहे. वाद-विवादात त्यांचे कौशल्य अनन्यसाधारण आहे. गेल्या वर्षी मी जेव्हा त्यांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांच्या तिखट उत्तरांना सामोरे जाणे मला अवघड जात होते. प्रामाणिकपणे सांगतो, त्यांनी माझी सुट्टी करून टाकली होती. त्यांनी जरी एकही निवडणूक जिंकली नसली आणि त्यांची राजकीय कारकीर्द जेमतेम दशकभराची असली तरी सुद्धा त्यांचा झालेला राजकीय उदय त्यांच्याकडे असलेल्या पात्रतेमुळेच आहे.
शरद पवार स्त्री-द्वेष्टे नाहीत आणि ते कधी बेताल वक्तव्यदेखील करीत नाहीत. त्यामुळे त्यांनी दिलेला सल्ला इराणींनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. स्मृती इराणी संसदेत बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांच्याकडे बघत अनावश्यक हातवारे करीत होत्या आणि रोहित वेमुला आत्महत्त्या प्रकरणात स्वत:ला दोषी सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान देत होत्या. आपल्या मंत्रालयाकडे मदतीसाठी येणाऱ्या राजकारण्यांची नावे उघड करण्याची धमकीदेखील त्यांनी अकारणच दिली व स्वत:ला हमरी-तुमरीत अडकवून घेतले.
विरोधकांनी हैदराबाद येथील दलित युवकाच्या आत्महत्त्येचे राजकारण केले, हे इराणींचे विधान बरोबरच आहे. रोहित वेमुलाच्या निलंबनाची शिफारस करणाऱ्या कार्यकारिणीची नियुक्ती कॉंग्रेस सरकारने केली होती, हे त्यांचे विधानही योग्यच. याआधी जेव्हां केव्हां दलित विद्यार्थ्याने आत्महत्त्या केली, तेव्हा आजच्यासारखा क्षोभ व्यक्त करण्यात आला नव्हता, हे त्यांचे म्हणणेदेखील रास्तच. पण विरोधकांचा दुटप्पीपणा उघडा पाडणे आणि टीकेकडे घृणास्पद नजरेने पाहाणे या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत.
वास्तवात इराणींच्या मंत्रालयाने वेमुला प्रकरणात अकारणच लक्ष घातलेले दिसते. अभाविप आणि केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्या हस्तक्षेपानंतर इराणींच्या मंत्रालयाने आंबेडकर स्टुडन्ट्स असोसिएशन राष्ट्रविरोधी असल्याचा दावा केला होता. वेमुलाच्या आत्महत्त्येनंतर पुरेशी सहानुभूती सुद्धा दाखविली गेली नाही. एकाही मंत्र्याने किंवा वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने रोहितच्या कुटुंबियांचे सांत्वन केले नाही.
सहानुभूतीची भावनाच दुर्दैवाने आजच्या काळात वृद्धिंगत होत चाललेल्या राजकीय ध्रुवीकरणात विस्मरणात जात चालली आहे. वेमुला आत्महत्त्या प्रकरण असो किंवा जेएनयुतील राष्ट्रद्रोह प्रकरण असो, जे लोक या प्रकरणात सहभागी (विशेषत: विद्यार्थी) आहेत ते राजकीय डावपेचात सापडले आहेत. ते एक तर या बाजूला ओढले गेले आहेत वा त्या बाजूला. ते राष्ट्रविरोधी असतात नाही तर देशभक्त. टीका-टिप्पणी किंवा शिवराळ भाषा न वापरता समोरच्याचा दृष्टीकोन समजून घेण्यासाठी अगदी नगण्य प्रयत्न होत आहेत. समेटाऐवजी संघर्षाच्या भूमिकेस प्राधान्य दिले जात आहे. आपण विरोधी पक्षांवर असहकाराचा आरोप होऊ शकतो, पण सत्ताधाऱ्यांनीही कायम विरोधात्मक रोखच ठेवला आहे.
पंतप्रधानांचा ‘छप्पन इंच की छाती’चा पुरुषी अहंकार कदाचित निवडणूक प्रचार काळात आकर्षक होता, पण सरकारचा कारभार हाती आल्यानंतर त्यांचा गतिशील प्रशासनाचा दावा लयास जातो आहे. स्मृती इराणींना आपण आधुनिक दुर्गा आहोत आणि कोणतेही विरोधी मत ठेचले पाहिजे असे वाटत असावे. उपकुलगुरू, ज्येष्ठ अभ्यासक आणि आयआयटी संचालकांवर अधिकार गाजवणे असो किंवा ट्विटरवरून पत्रकारांशी शाब्दिक युद्ध असो, स्मृती इराणी नेहमीच टीकाकारांना उत्तर देण्याऐवजी त्यांना गप्प करण्यावर भर देणाऱ्या सरकारच्या प्रतिनिधी आहेत.
विद्यमान स्थितीत देशातले संपूर्ण शिक्षण क्षेत्र वैचारिक पातळीवर दुभंगले गेले आहे. शिक्षक विरुद्ध संस्थाचालक, विद्यार्थी विरुद्ध विद्यार्थी, अभ्यासक विरु द्ध सरकारी उच्च अधिकारी असा संघर्ष सर्वत्र दिसतो आहे. आधीच्या सरकारनेही शिक्षण क्षेत्रात हस्तक्षेप केला पण आजच्यासारखा नाही. म्हणूनच स्मृती इराणींनी काही गोष्टींमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यांनी खुल्या संवादाला प्राधान्य दिले पाहिजे. सांस्कृतिक युद्धाऐवजी वैचारिक विरोधकांशी समेटास प्राधान्य दिले पाहिजे. चांगले प्रशासन वक्तृत्वानेही चालू शकते पण ते नेहमी कर्कश आवाजानेच चालवता येईल असे नव्हे.
ताजा कलम- सध्या स्मृती इराणी बातम्यांच्या मथळ्यांमध्ये झळकत आहेत. त्यांची छबी सुद्धा भाजपाला अभिप्रेत अशा सुसंस्कृत सुनेची आहे. एके काळी सुषमा स्वराज सुद्धा पक्षाच्या धडाडीच्या महिला नेत्या होत्या. त्यांनीही सोनिया गांधी पंतप्रधान झाल्यास केशवपन करण्याची तयारी दाखवली होती. पण आज त्या सौम्य झाल्या आहेत. हा पर्याय त्यांनीच निवडला असावा किंवा त्यांना तसे सांगण्यात आले असावे. अनेक नेते परस्परांशी संघर्ष करण्यास प्रवृत्त होत असताना, स्वराज यांची प्रतिमा व प्रतिष्ठा तशीच कायम आहे.