स्मृती इराणी यांना बहुधा स्मृतिभ्रंश झालेला दिसतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 09:21 PM2018-12-31T21:21:45+5:302018-12-31T21:43:24+5:30

भाजपाची एक हाती सत्ता आल्यानंतर गेल्या चार वर्षांत या सरकारच्या मंत्र्यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. 

Smriti Irani most bizarre statements | स्मृती इराणी यांना बहुधा स्मृतिभ्रंश झालेला दिसतो...

स्मृती इराणी यांना बहुधा स्मृतिभ्रंश झालेला दिसतो...

Next

- विनायक पात्रुडकर

भाजपाची एक हाती सत्ता आल्यानंतर गेल्या चार वर्षांत या सरकारच्या मंत्र्यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. वादग्रस्त विधानांमुळे काहींची मंत्रिपदेही बदलली गेली. तरीही त्या मंत्र्यांचा वादग्रस्त विधान करण्याचा मूळ स्वभाव मात्र बदलला नाही. त्याची प्रचिती केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मुंबईतील मूड इंडिगो कार्यक्रमात केलेल्या विधानाने आली. ३३ कोटी देव असताना शबरीमलाचाच हट्ट का, असे वक्तव्य स्मृती इराणी यांनी कार्यक्रमात केले. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी भाषण करताना असे वक्तव्य करणे योग्य नाही. मुळात असे वक्तव्य करण्याची ती जागा नव्हती. 

करिअर, देश आदी विषयांवर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन अशा कार्यक्रमात व्हायला हवे. स्मृती इराणी यांना बहुधा आपण कोठे भाषण करत आहोत, याचे भान राहिले नसावे. त्यामुळे त्यांनी असे वक्तव्य केले, असे वक्तव्य म्हणजे धार्मिक श्रद्धेवर टीका करण्यासारखे आहे. विविध संस्कृती, जाती-धर्माने नटलेला आपला देश आहे. त्यातूनही स्मृती इराणी यांनी आठवण करून दिलेल्या ३३ कोटी देवांबद्दल विश्लेषण करायचे झाले तर प्रत्येक देवाची पूजा-अर्चा करण्याची पद्धती वेगळी आहे. काही प्रथा अनेक शतकांपासून सुरू आहेत. या सर्व प्रथांचा अभ्यास करायला एक जन्म कमी पडेल. त्यामुळे भाषणात उदाहरण देताना किमान त्याचा थोडा तरी अभ्यास करणे आवश्यक आहे. एखाद्याचे ज्ञान मोजण्याचा अधिकार कोणालाच नाही. पण आपल्या बोलण्याला किमान नैतिक आधार आहे की नाही हे प्रत्येकाने तपासायला हवे. स्मृती इराणी यांनी देवांबद्दल केलेल्या वक्तव्याला नेमका कसला आधार आहे हे त्या स्वत:ही सांगू शकणार नाहीत. शबरीमला हे प्रकरण अनेक वर्षांपासून न्याय प्रविष्ट होते. 

न्यायालयाने त्यावर निकाल दिला व ते मंदिर महिलांसाठी खुले केले. आपण लोकशाहीप्रणित देशात राहतो, येथे काय योग्य आहे व काय अयोग्य आहे याचे मूल्यमापन करण्याचा अधिकार न्यायपालिकेला दिलेला आहे. न्यायपालिकेने दिलेल्या निकालात दोष असल्यास त्यावर विचार मंथन करण्यासाठी संसद आहे. ही कार्यपद्धती स्मृती इराणी यांना बहुधा ज्ञात नसावी. जर त्यांना ही कार्यपद्धती ज्ञात असती तर त्यांनी असे वक्तव्य केले नसते. याआधीही स्मृती इराणी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांचे मंत्रिपद बदलण्यात आले. त्यातून धडा घेऊन त्यांनी अधिक जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. मात्र हा विषय केवळ स्मृती इराणी यांच्यापुरता मर्यादीत नाही. आज अनेक राजकारणी, अभिनेते व समाजातील प्रचलित व्यक्ती बेजबाबदार वक्तव्य करत आहेत. त्याचे परिणाम समाजावर होतात व काही वेळा त्याची चर्चाही भरकटते. तेव्हा समाजात स्थान मिळवलेल्या व्यक्तीने असे वक्तव्य करू नये किंवा वक्तव्य करण्याआधी किमान थोडा विचार करावा, एवढीच प्रार्थना तूर्त आपण करू शकतो.

 

Web Title: Smriti Irani most bizarre statements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.