तो राजहंस एक
By admin | Published: December 22, 2016 12:12 AM2016-12-22T00:12:00+5:302016-12-22T00:12:00+5:30
महाकाव्यातील रुपकांचे अनुबंध हे अतिशय गमतीशीर असतात. शतकांचाच नव्हे तर सहस्त्र वर्षाच्या मर्यादा ओलांडूनही त्या काव्यातील
महाकाव्यातील रुपकांचे अनुबंध हे अतिशय गमतीशीर असतात. शतकांचाच नव्हे तर सहस्त्र वर्षाच्या मर्यादा ओलांडूनही त्या काव्यातील रुपके एकमेकांना जोडली जातात. संस्कृत महाकाव्यात श्रीहर्षाचे नैवद्धीयचडित हे महाकाव्य महाभारताच्या वनपर्वातील नल-दमयंतीच्या उप आख्यानावरून श्रीहर्षाने इ.स. ११९३ ते ११९५ या कालावधीत लिहिले.
नलदमयंतीच्या प्रेमाची सुंदर कथा राजहंसाच्या संदेशवहनातून कवीने रंगवली आहे. त्यातील एक प्रसंग फार महत्वाचा आहे. तो असा की, नल हा निषध देशाचा अत्यंत पराक्रमी, देखणा आणि पुण्यश्लोक राजा. त्याने विदर्भकन्या दमयंतीला पाहिलेले नसते. पण तिचे गुण आणि रुप याच्या श्रवणानेच तो तिच्यावर अनुरक्त होतो. तिच्या विचाराने तो अस्वस्थ होतो आणि तिचाच विचार करीत नगराच्या एका उद्यानात हिंडत असताना त्यातील एका विस्तीर्ण सरोवरात काही राजहंस पक्षी विहार करीत असतात. त्यात एक सुवर्ण राजहंस त्याला दिसतो. नल त्या राजहंसाला पकडतो. तेव्हा तो राजहंस सांगतो, ‘राजा मला पकडू नकोस. माझी परिस्थिती लक्षात घे. माझी वृद्ध आई घरी आहे. पत्नी सात दिवसांची बाळंतीण आहे. मला मारलेस तर त्यांची अवस्था काय होईल? माझी पिले माझ्या ध्यास घेऊन प्राण सोडतील. तू मला सोड. मनुष्यवाणीने आपली व्यथा मांडणाऱ्या त्या राजहंसाचे नलाला मोठे आश्चर्य वाटते. त्या राजहंसाला तो सोडतो आणि तोच राजहंस नलदमयंतीच्या प्रेम संदेशाचे एकमेकांकडे वहन करतो.
श्रीहर्षाने ही कथा महाकाव्यातून अद्भुत प्रेमाने रंगविली आहे. श्रीहर्षाने मुक्त केलेला तो राजहंस साहित्यसृष्टीत पुन्हा कधी दिसला नाही. तो उपेक्षितच राहिला. स्वत:चे राजहंसपण विसरला. स्वत:चे गुण आणि सौंदर्यही विसरला. तोच राजहंस जवळजवळ नऊशे वर्षांनी पुन्हा ग.दि.माडगुळकरांना दिसला, तोही एका बदकाच्या पिलाबरोबर विहार करताना आणि सहज शब्द बाहेर पडले.
‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख।
होते कुरुप वेडे पिलू तळ्यात एक।।
पाण्यात पाहताना चोरुनिया क्षणैक।
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक।।
तो नलदमयंती महाकाव्यातील राजहंस गदिमांच्या राजहंसाच्या रुपाने पुन्हा सारस्वताला गवसला. या राजहंसाच्या स्थितीमधील एक मोठे रुपक ग.दि.माडगुळकरांना सांगायचे आहे. आजही समाजात असे गुणवान, कर्तृत्ववान, देखणे राजहंस आहेत आणि आपल्या गुणसौंदर्याला विसरून त्यालाच कुरुपता म्हणून कवटाळत आहेत. त्यांनी आत्मनिर्भरता हरवली आहे. त्यांच्या देखणेपणाचा केवळ समाजाला नाही तर त्यांनाही विसर पडला आहे. त्यांचे गुण आणि देखणेपण समाजापुढे येऊन राजहंस म्हणून त्यांना प्रतिष्ठा मिळणे हीच सामाजिक मूल्यांना शोधणारी एक आदर्शदायी घटना ठरेल.
- डॉ. रामचंद्र देखणे