...तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती दिल्याशिवाय राहणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 07:13 AM2021-08-19T07:13:55+5:302021-08-19T07:34:38+5:30

tourism : पर्यटनाचे मंत्र आणि तंत्र अवगत केलेल्या काही पश्चिमी देशांनी त्यांचे दगडधोंडेही रमणीय बनवले. त्या मानाने प्राचीन आणि अर्वाचीन मानवी निर्मितीचा भारतीय पसारा अडगळीतच राहिला.

... so Maharashtra's economic cycle will not last without acceleration | ...तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती दिल्याशिवाय राहणार नाही

...तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती दिल्याशिवाय राहणार नाही

Next

पर्यटनाची प्रेरणा सार्वत्रिक आणि सर्वकालीन मानली जात असली तरी व्यापार - व्यवसायासाठी किंवा धार्मिक कारणांसाठी होणारे तीर्थाटन हीच त्याची प्रमुख आणि पारंपरिक अंगे होती. हौशी, स्वान्तसुखाय भटकंतीचा प्रकार फारसा प्रचलित नव्हता किंवा ते परवडणारेही नव्हते. आधुनिक काळात दळणवळणाची साधने सुकर होत गेली आणि पर्यटनाची व्याप्ती प्रचंड प्रमाणात वाढत गेली. कधी काळी कल्पनाविलास वाटणारे अंतराळ पर्यटनही आता आवाक्यात आले आहे. त्याची प्रायोगिक उड्डाणेही आता होऊ लागली आहेत.

पर्यटनाचे मंत्र आणि तंत्र अवगत केलेल्या काही पश्चिमी देशांनी त्यांचे दगडधोंडेही रमणीय बनवले. त्या मानाने प्राचीन आणि अर्वाचीन मानवी निर्मितीचा भारतीय पसारा अडगळीतच राहिला. निसर्गाच्या छटाही पायाभूत सोयीसुविधांच्या अभावी अस्पर्शीतच होत्या. त्यात महाराष्ट्राची स्थिती तर आणखीनच वेगळी. औद्योगिक क्षेत्रात दीर्घकाळ अव्वल राहिलेल्या महाराष्ट्राला पर्यटन म्हणजे कुडमुडा उद्योग वाटणे स्वाभाविकही होते. हे चित्र आता बदलत आहे. पर्यटन क्षेत्र विस्तारणे  ही काळाची गरज बनू लागली आहे. त्यादृष्टीने पावले पडायला लागली आहेत.

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर तर पर्यटन आणि पर्यावरण ही तुलनेने दुय्यम मानली गेलेली खाती आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आली. तेव्हाच याचे महत्त्व अधोरेखित झाले होते. पर्यटन क्षेत्रात भरीव कामगिरीचा मानसच त्यानिमित्ताने ठळक केला गेला आहे.  अपेक्षेप्रमाणे आदित्य ठाकरे यांनी झपाट्याने या विभागात कामाला सुरुवात केली होती. पण, जगभरात कोरोना महामारीची साथ आली आणि सारेच चित्र बदलले. पर्यटन आणि त्याच्याभोवती उभ्या राहिलेल्या उद्योगाला कोरोनाची सर्वाधिक झळ पोहोचली. पर्यटन व्यवसायावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अवलंबून असलेले उद्योग यात मोठ्या प्रमाणावर भरडले गेले.

लाखो जणांचे रोजगार बाधित झाले. या कालावधीत प्रत्यक्ष पर्यटन थांबले असले तरी मूलभूत स्वरूपाची कामे मात्र सुरू होती, ही समाधानाची बाब म्हणायला हवी. निर्बंधांच्या या कालखंडातच पर्यटन धोरण, कृषी पर्यटन धोरण, साहसी पर्यटन धोरण, नावीन्यपूर्ण असे कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले. हेही धाडसाचे पाऊल म्हटले पाहिजे. परवान्यांची संख्या कमी करण्यात आली. इतकेच नव्हेतर, पर्यटनाला उद्योगांचा दर्जाही बहाल करण्यात आला. ही बाब या क्षेत्राच्या ऊर्जितावस्थेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. उद्योगाचा दर्जा मिळाल्याने पर्यटन क्षेत्रातील विकास आता अनिर्बंध स्वरूपाचा, मनमानी पद्धतीचा न राहता त्याला निश्चित असे स्वरूप प्राप्त होणार आहे.

जुन्या स्थळांचा विकास आणि नव्या क्षेत्रांची निर्मिती हा पर्यटन उद्योगाचा गाभा आहे. मात्र, त्याला पायाभूत सोयीसुविधांची जोड मिळाली तर आणि तरच पर्यटनातून अपेक्षित परिणाम साधता येणार आहे. कोरोनाच्या साथीमुळे सारे काही ठप्प झालेले असताना पर्यटन विभागाने पायाभूत सुविधांच्या विकासावर दिलेला भर सुखावणारा आहे. ‘शांततेच्या काळात जो समाज घाम गाळतो, त्याला युद्धकाळात कमी रक्त सांडावे लागते’ अशा आशयाची एक म्हण आहे.  आगामी काळात पर्यटन उद्योगाला जेव्हा चालना मिळेल तेव्हा या म्हणीचा आशय आपल्या ध्यानात आल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे कोरोनामुळे सगळ्याच क्षेत्रांची गती थांबली असताना पर्यटन विकास महामंडळाची पुणे विभागातील सर्व रिसाॅर्ट ‘वर्क फ्राॅम नेचर आणि वर्क विथ नेचर’ उपक्रम राबवीत खुली झाली होती. वर्क फ्राॅम होममुळे वैतागलेल्या कॉर्पोरेट जगताला निसर्गाच्या कुशीत बसून काम करण्याची घातलेली साद सुखावणारी होती. हा एक सकारात्मक वेगळा प्रयोग म्हटला पाहिजे.

अगदी अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एमटीडीसीचे नवीन संकेतस्थळ सुरू करण्यात आले. सिंहगड येथील नूतनीकरण झालेल्या पर्यटक निवासाचे तसेच गणपतीपुळे येथे बोट क्लबचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. पर्यटन क्षेत्रात सेवा बजावणाऱ्या विविध खासगी कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. पर्यटन उद्योगासाठी मनुष्यबळाच्या प्रशिक्षणासाठीही करार-मदार झाले. कोरोनामुळे दीड वर्षापासून पर्यटन बंद असले तरी भविष्याचा वेध घेत विविध धोरणे आणि निर्णय या काळात घेण्यात आले आहेत.

महाराष्ट्रासारखी पर्यटन समृद्धी अन्यत्र क्वचित आढळून येते. सर्व प्रकारच्या पर्यटनाच्या संधी इथे उपलब्ध आहेत. पर्यटन आणि पर्यावरण या दोन्हींचा विचार करून पावले टाकली तर विकासाचा शाश्वत मार्ग महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती दिल्याशिवाय राहणार नाही. रोजगारशून्य विकासाच्या कालखंडात रोजगारनिर्मितीची प्रचंड क्षमता असलेले पर्यटनाचे क्षेत्र अधिक विहंगम वाटते.

Web Title: ... so Maharashtra's economic cycle will not last without acceleration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन