...म्हणून ‘गोल्ड रश’चा पुन्हा एकदा घेतला जगानं अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 02:56 AM2020-04-27T02:56:55+5:302020-04-27T06:33:33+5:30

मुळातच जसे भारतीयांच्या अर्थविषयक कल्पनेत सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, तसे सोन्यामध्ये गुंतवणूक करणे हे भारतीयांचे परंपरागत शहाणपण आहे.

... so the world experienced the ‘Gold Rush’ once again | ...म्हणून ‘गोल्ड रश’चा पुन्हा एकदा घेतला जगानं अनुभव

...म्हणून ‘गोल्ड रश’चा पुन्हा एकदा घेतला जगानं अनुभव

googlenewsNext

जगभर ‘कोरोना’ने थैमान घातले असताना तितक्याच वेगाने अर्थकारणात सोन्याने उसळी घेतली. याचे कारण शोधताना दोन गोष्टी प्रकर्षाने
समोर येतात. एक तर ‘कोरोना’ने जगात जसे मृत्यूचे तांडव माजवले तसे जागतिक अर्थव्यवस्थेचे तीन-तेराही केले. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याने ५० हजारांचा विक्रमी टप्पा ओलांडला. मुळातच अक्षयतृतीया हा दिवस भारतीय परंपरेत सोने खरेदीचा शुभ दिवस मानला जातो. आपली संपत्ती अक्षय राहो, या भावनेतून लोक आपल्या ऐपतीनुसार सोने खरेदी करतात. मुळातच जसे भारतीयांच्या अर्थविषयक कल्पनेत सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, तसे सोन्यामध्ये गुंतवणूक करणे हे भारतीयांचे परंपरागत शहाणपण आहे. साऱ्या जगाने गुंतवणुकीसाठी शेअर बाजारापासून क्रिप्टोकरन्सीपर्यंत धांडोळा घेतला; पण गुंतवणूक म्हणून भारतीय समाजमनाचा विश्वास सोन्यावरून तसूभरही ढळला नाही. तीस हजारांच्या आसपास सोने बराच काळ घुटमळत राहिले तरी भारतीयांची गुंतवणुकीसाठी पहिली पसंती सोन्यालाच होती, म्हणून आज जगभर सोन्याने झळाळी घेतली असताना आमचे व्यावहारिक शहाणपण पुन्हा एकदा सोन्यासारखे शंभर नंबरी झळाळून आले.


भारत हा जगातील सोन्याचा सर्वांत मोठा खरेदीदार. धन-संपत्ती-खजिना हे शब्द उच्चारताना डोळ्यासमोर जमीनजुमला, मोटारींचा ताफा, गगनचुंबी इमारती येत नाहीत, तर येते फक्त सोने. एवढी घट्ट बांधीलकी आपली या सुवर्णाशी आहे. असे हे सोने रविवारी ४८ हजारांवर पोहोचले आणि जागतिक अर्थबाजाराची अवस्था अशीच राहिली, तर वर्षभरात ते दहा ग्रॅमला ८२ हजारांची पातळी गाठू शकते, असे अंदाज वर्तवले जात आहेत. कोरोनाशी झुंज संपल्यानंतर अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी कशी सुधारायची, हा प्रश्न साºया जगासमोर असणार आहे. अर्थचक्राचे गाडे रुतल्याने शेअर बाजारावर परिणाम झाला. जगभरात व्यवहार थांबल्याने इंधनाचा खप कमी झाला आणि त्याचा परिणाम तेल उत्पादन करणाºया देशांवर झाला. त्यांनी तेलाचे भाव कमी केले. ते इतके की, गेल्या आठवड्यात ते उणे पातळीवर खाली गेले. म्हणजे तेल कंपन्यांचे समभाग गडगडले. तेथेही गुंतवणुकीत अर्थ राहिला नाही, अशा वेळी गुंतवणुकीचा एकमेव सुरक्षित पर्याय सोने हाच शिल्लक राहिला. सोन्याच्या बाजारातही गेल्या काही दिवसांत आस्तेकदम सुधारणा होत राहिली आणि गेल्या आठवडाभर ते पन्नास हजारांच्या खाली घुटमळत राहिले. दुसरे कारण कोरोनामुळे सोन्याच्या खाणीतील काम बंद आहे. सोने शुद्ध करणारे उद्योग ठप्प आहेत. खाणीतून निघालेले सोने शुद्ध करून बाजारात आणणे ही मुळातच वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून सोन्याचा पुरवठा बंद झाला आणि दुसरीकडे जागतिक पातळीवर मागणी वाढत राहिली आणि सोने तेजाळले. आता तर बाजारात सोन्याचा तुटवडा पहिल्यांदाच आला आहे. मध्यंतरी अमेरिकेने सुवर्णरोखे विक्रीला काढले. त्यात आठ हजार ट्रिलियन डॉलरचे रोखे विकले गेले.

आता तेजीच्या काळात गुंतवणूकदारांनी या रोख्याच्या बदल्यात गुंतविलेले सोने मागितले, तर एवढे सोने उपलब्ध नाही. अशीही अर्थव्यवस्था सोन्याभोवती फिरताना दिसते आहे. आज देशभरात अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी कोट्यवधी लोकांनी प्रयत्न केले; परंतु लॉकडाऊनमुळे देशभरातील सराफी बाजार बंद होते. काहींनी आॅनलाईन खरेदी केली; पण त्यांनीही खरेदी केली असली तरी सोने लॉकडाऊन उठल्यानंतर देण्याचा वायदा झाला आहे. सोने खरेदीची ही आभासी स्पर्धा मोठी होती. सोन्याच्या आॅनलाईन खरेदीसाठी वाट पाहण्याचा वेळदेखील मोठा होता, तरी खरेदीची आभासी का होईना गर्दी होती. या निमित्ताने १८४८ मध्ये अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतात सोन्याची खाण सापडण्याची घटना आठवली. विल्सन मार्शल नावाच्या सुताराला नदीकिनारी सोने सापडले आणि तो शोध खाणीपर्यंत पोहोचला आणि सगळ्या अमेरिकेत कॅलिफोर्नियात जाऊन सोने आणण्याची स्पर्धा निर्माण झाली आणि या भागात एकच गर्दी झाली. ‘गोल्ड रश’ नावाने ही घटना प्रसिद्ध आहे. आज सोने बाजारात उपलब्ध नाही; पण खरेदीसाठी जगभर गर्दी लोटली आहे. ‘गोल्ड रश’चा पुन्हा एकदा अनुभव जग घेते आहे, ही गर्दी आभासी असली तरी.

Web Title: ... so the world experienced the ‘Gold Rush’ once again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.