पुन्हा एकदा सामाजिक अभियांत्रिकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 02:37 AM2017-10-03T02:37:02+5:302017-10-03T02:37:07+5:30

विजयादशमीच्या दुस-या दिवशी अकोल्यात साजरा होणारा समांतर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा म्हणजे आंबेडकरी जनतेसाठी विचारांचे सोने लुटायची सुवर्णसंधीच असते.

Social engineering again! | पुन्हा एकदा सामाजिक अभियांत्रिकी!

पुन्हा एकदा सामाजिक अभियांत्रिकी!

Next

- रवी टाले
विजयादशमीच्या दुस-या दिवशी अकोल्यात साजरा होणारा समांतर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा म्हणजे आंबेडकरी जनतेसाठी विचारांचे सोने लुटायची सुवर्णसंधीच असते. नागपुरात विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमीवर पार पडणारा सोहळा आटोपला, की आंबेडकरी जनतेचे पाय वळतात ते अकोल्याच्या दिशेने! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि भारिप-बहुजन महासंघाचे संस्थापक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचे विचार ऐकायला त्यांचे कान आतूर झालेले असतात. आंबेडकरही त्यांना कधी निराश करीत नाहीत. आपल्या अनुयायांमध्ये नवी उमेद जागविण्याचे, प्रेरणा देण्याचे, विचारांचे पंख देण्याचे काम ते चोख पार पाडतात. ती शिदोरी अनुयायांना वर्षभर पुरते.
गत काही वर्षात, भारिप-बहुजन महासंघाच्या अकोल्यातील सामाजिक अभियांत्रिकीच्या प्रयोगास थोडे अपयशाचे डाग लागले. स्वत: आंबेडकरांना १९९९ नंतर सलग तीनदा अकोला लोकसभा मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला आहे. अकोला जिल्हा परिषद त्यांच्याच ताब्यात असली तरी, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत, त्यांच्या पक्षाचा एकच आमदार निवडून येऊ शकला. आता पुन्हा एकदा लोकसभा व विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकर यावेळी अनुयायांना कोणती दिशा देतात, कोणती राजकीय भूमिका घेतात, याकडे केवळ त्यांच्या अनुयायांचेच नव्हे, तर राजकीय विरोधक व प्रसारमाध्यमांचेही लक्ष होते.
आंबेडकरांनी त्यांच्या भाषणात निवडणुकांबाबत थेट भाष्य केले नाही; परंतु पुरेसे संकेत मात्र दिले. नरेंद्र मोदी सरकार हे हिंदूंचे नव्हे, तर मनुवाद्यांचे सरकार असल्याचे त्यांचे वक्तव्य, सामाजिक अभियांत्रिकीच्या प्रयोगास पुढे नेण्याचेच सूतोवाच म्हणता येईल. हक्काच्या नवबौद्ध मतांना अठरापगड जातींच्या मतांची जोड देऊन, प्रस्थापितांना धोबीपछाड देण्याच्या आंबेडकरांच्या प्रयोगास १९८४ नंतर अकोल्यात चांगले यश लाभले. पुढे राम जन्मभूमी आंदोलनाच्या पाठीवर स्वार होऊन भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाचे राजकारण सुरू केले आणि बहुजन समाज भाजपाकडे वळत गेला. गत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तर हिंदुत्वाला विकासाच्या मुद्याची जोड देऊन भाजपाने बहुजन मतपेढीसोबतच, अल्प प्रमाणात का होईना दलित मतपेढीवरही डल्ला मारला. भारिप-बहुजन महासंघाची झालेली पिछेहाट हा त्याचाच परिपाक होता. गत काही दिवसांपासून मात्र विकासाच्या मुद्यावर भाजपाकडे वळलेल्या मतदारांचा भ्रमनिरास होऊ लागल्याचे चित्र समोर येत आहे. या मतदारांना पुन्हा आपल्याकडे वळविण्याची हीच योग्य वेळ असल्याचे आंबेडकरांमधील निपुण राजनीतिज्ञाने जाणले आणि तुम्ही ज्याला हिंदुत्ववादी सरकार समजता ते प्रत्यक्षात मनुवादी सरकार असल्याचा संदेश बहुजन समाजाला देण्याचा प्रयत्न केला. ते करताना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भलामण करून काँग्रेसलाही संदेश दिला. अकोल्यात आंबेडकर व काँग्रेस एकत्र आल्यास भाजपाचा विजय दुष्कर होतो हा इतिहास आहे; पण सामाजिक अभियांत्रिकीच्या आंबेडकरांच्या प्रयत्नास कितपत यश लाभते, हे कळण्यासाठी आगामी निवडणुकांपर्यंत प्रतीक्षाच करावी लागेल.

ravi.tale@lokmat.com

Web Title: Social engineering again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.