आलिया भटच्या लेकीची झबली-टोपडी आणि फसवणूक!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 10:09 AM2023-02-07T10:09:28+5:302023-02-07T10:10:34+5:30
सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सकडून ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहक मंत्रालयाने सेलिब्रिटीज, व्हर्चुअल इन्फ्लूएन्सर्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे आणली आहेत.
मुक्ता चैतन्य, समाजमाध्यमांच्या अभ्यासक
आधुनिक काळातील तीन महत्त्वाच्या क्रांती- इंटरनेट, स्मार्टफोन आणि सोशल मीडिया यांनी बाजारपेठांचे स्वरूपही झपाट्याने बदलत नेले आहे. आजची बाजरपेठ फक्त ऑफलाइन नाही तर ती ऑनलाइनही आहे.
ई-कॉर्मर्सचे स्वरूप फक्त ऑनलाइन खरेदी-विक्री करणाऱ्या साइट्सपुरते मर्यादित नाही. इन्फ्लुएन्सर्सची एक मोठी बाजारपेठ या ऑनलाइन जगताचा भाग आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनुसार भारतीय ग्राहक बाजारपेठ जगातली तिसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ २०२० मध्ये १.५ ट्रिलियन डॉलर्सची होती; जी २०३० मध्ये ६ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची होईल असा अंदाज आहे. यातील इन्फ्लूएन्सर्स मार्केटिंगचा हिस्सा २०२२ मध्ये अंदाजे १२ अब्ज रुपये इतका होता. येत्या पाच वर्षांत तो २८ अब्ज रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज आहे.
सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सचा ग्राहकांवर मोठा प्रभाव असतो. यातही दोन प्रकारचे इन्फ्लूएन्सर्स दिसतात. एक म्हणजे, जे इतर माध्यमांमध्ये सेलिब्रिटी म्हणून प्रस्थापित झालेले आहेत. उदा. सिनेमा, टीव्ही, ओटीटी, खेळ.. या क्षेत्रात यश मिळवलेल्या सेलिब्रिटींचा सोशल मीडियावर प्रचंड फॉलोअर बेस असतो. दुसऱ्या प्रकारातील व्यक्ती या सामान्य व्यक्तीच असतात; पण त्यांच्या कामामुळे आणि पोस्टमुळे ते सोशल मीडिया स्टार्स किंवा सेलिब्रिटी म्हणून ओळखले जातात. या इन्फ्लूएन्सर्सच्या माध्यमातून जे मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंग केलं जातं, त्याला म्हणतात इन्फ्लूएन्सर्स मार्केटिंग. फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब या आणि अशा अनेक प्लॅटफॉर्म्सवरून हे इन्फ्लूएन्सर्स निरनिराळ्या उत्पादनांच्या जाहिराती करतात, ही जाहिरात दरवेळी थेट असेलच असे नाही.
इन्फ्लूएन्सर्स मार्केटिंग संपूर्णपणे इन्फ्लूएन्सर आणि फॉलोअर्स यांच्यातील विश्वासावर चालते. एखादा इन्फ्लूएन्सर एखादी वस्तू चांगली आहे, ती जरूर घ्या असे म्हणतो, तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवणारे अनेक फॉलोअर्स असतात. काहीवेळा अप्रत्यक्षपणे केल्या जाणाऱ्या जाहिरातीत केलेली पोस्ट जाहिरात आहे हेही लक्षात येत नाही. उत्पादनाचा दर्जा जो पोस्टमध्ये नमूद केलेला असतो, तो तसा असतोच असे नाही.
ग्राहकांचे हित लक्षात घेऊन आता ग्राहक मंत्रालयाने सेलिब्रिटीज, इन्फ्लूएन्सर्स आणि व्हर्चुअल इन्फ्लूएन्सर्स यांच्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणली आहेत. जेणेकरून ग्राहकांची फसवणूक होणार नाही आणि त्यांना माहितीपूर्ण निर्णय (इनफॉर्म्ड चॉईस) घेता येईल.
काय आहेत ही मार्गदर्शक तत्त्वे?
१. एखादे उत्पादन, सेवा, ब्रँड किंवा अनुभव याचा प्रभाव जर ग्राहकांच्या खरेदी निर्णयावर पडणार असेल तर अशावेळी ती जाहिरात किंवा प्रमोशन आहे हे उघडपणे सांगितले पाहिजे.
२. स्वतःला किंवा कुटुंबाला कशाच्यातरी बदल्यात पैसे, इतर सवलती, भरपाई, पर्यटनाच्या संधी, हॉटेलमधील निवास, मीडिया बार्टर, पुरस्कार, मोफत उत्पादने, भेटवस्तू मिळाल्या असतील तर तो तपशील उघड केला पाहिजे.
३. एंडॉर्समेंटमध्ये (Endorsement) स्पष्ट आणि सोप्या भाषेत ‘जाहिरात’, ‘पेड प्रमोशन’ किंवा ‘पुरस्कृत’ असे लिहिण्यास परवानगी आहे.
४. स्वतः नीट तपासून न घेतलेल्या किंवा स्वतः अनुभव न घेतलेल्या उत्पादनाची जाहिरात सेलिब्रिटी किंवा इन्फ्लूएन्सरने करू नये.
ही मार्गदर्शक तत्त्वे ग्राहक कायदा २०१९ शी संलग्न आहेत. यात असेही म्हटले आहे की चुकीची, खोटी, अपूर्ण जाहिरात, मग ती कुठल्याही प्रकारची, कुठल्याही माध्यमातली असली तरीही बेकायदेशीर आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे सेलिब्रिटी आणि इन्फ्लूएन्सर्सना तर लागू आहेतच; पण उत्पादन निर्मिती कंपन्या, सेवा पुरवठादार, जाहिरातदार आणि जाहिरात कंपन्या यांनाही लागू होतात.
सोप्या शब्दात सांगायचे तर आलिया भटने तिच्या नवजात लेकीसाठी वापरलेल्या झबल्या टोपड्यांबद्दल त्यांच्या उत्पादकाच्या नावासह इन्स्टाग्रामवर लिहिले आणि फोटो टाकला, तर त्या वस्तुच्या गुणवत्तेची खात्री तिने केली पाहिजे आणि हे केल्याबद्दल आपल्याला पैसे किंवा अन्य फायदे मिळाले आहेत का, हे नोंदवलेही पाहिजे! इन्फ्लूएन्सर्स मार्केटिंगमध्ये फसवणूक, चुकीची किंवा अर्धवट माहिती देऊन उत्पादनांची विक्री करण्याचे अनेकदा प्रयत्न होतात. त्या अनुषंगाने नवी मार्गदर्शक तत्त्वे डिजिटल स्पेसमध्ये वावरणाऱ्या ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणारी आहेत.
muktaachaitanya@gmail.com