जैन उद्योगसमूहाची सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 03:10 AM2017-10-07T03:10:55+5:302017-10-07T03:12:25+5:30
एखाद्या उद्योगसमूहाने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान पाहायचे असेल तर निश्चित जळगावात यावे लागेल. ज्या जळगावात सात हजार रुपयांच्या भागभांडवलावर भवरलाल जैन यांनी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली
एखाद्या उद्योगसमूहाने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान पाहायचे असेल तर निश्चित जळगावात यावे लागेल. ज्या जळगावात सात हजार रुपयांच्या भागभांडवलावर भवरलाल जैन यांनी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली, त्याच जळगावात या उद्योगाची भरभराट झाली. सात हजार कोटींवर उलाढाल पोहोचली. जगभर विस्तार झाला. परंतु उद्योगसमूहाचे मुख्यालय जळगावातच कायम ठेवण्याच्या आग्रही भूमिकेत जळगावविषयी असलेले जैन परिवाराचे प्रेम, आपुलकी आणि बांधिलकी अधोरेखित होते. जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या या जळगावचे ऋण फेडण्याचे प्रयत्न या उद्योगसमूहाने सुरुवातीपासून केले ते अविरत कायम आहेत.
जळगावात कला, साहित्य, संस्कृती, क्रीडा, शिक्षण, सामाजिक, आरोग्य म्हणजे जीवनाशी निगडीत सर्व अंगांचा व्यापक विकास व्हावा, मूलभूत सोयीसुविधांअभावी जळगावातील तरुण मागे पडू नये हा उद्देश ठेवून जैन उद्योगसमूहाने प्रयत्न केलेला आहे. जैन चॅरिटीज्, त्यानंतर भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठे प्रकल्प उभे करण्यात आले.
न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गांधी रिसर्च फाऊंडेशनची स्थापना करून अल्पावधीत ‘गांधीतीर्थ’ हे जगातील गांधीजींविषयी अमूल्य असे संग्रहालय उभारण्यात आले. केवळ संग्रहालयापुरते कार्य सीमित न ठेवता गांधी विचारांवरील अभ्यासक्रम, कार्यशाळा, ग्रामविकास यासंबंधी निरंतर कार्य सुरू आहे. जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या माध्यमातून क्रिकेट, बुध्दिबळ, जलतरणासह अनेकविध क्रीडा प्रकारांमध्ये प्रशिक्षण, स्पर्धा आयोजनासह खेळाडू दत्तक योजनेसारखे उपक्रम अव्याहत सुरू आहेत. भारतीय संस्कृती आणि विचारावर आधारित परंतु जागतिक दर्जाची ‘अनुभूती’ नावाची शाळा सुरूकरीत असतानाच ‘अनुभूती २’ ही दारिद्र्यरेषेखालील नागरिकांच्या पाल्यांसाठी मोफत शिक्षण देणारी दर्जेदार व उपक्रमशील शाळादेखील सुरू करण्यात आली.
गांधीजी, टाटा, नेहरू यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या भवरलाल जैन यांनी सामाजिक बांधिलकीची रुजवात करून दिली. त्यांच्यानंतर पुत्र अशोक, अनिल, अजित व अतुल यांनी व्यवसायासोबत ही बांधिलकी अधिक दृढ केली. कोणताही राजकीय पक्ष, विचार, जात-धर्म असा भेद न बाळगणाºया या उद्योगसमूहाने चांगले काम करणाºया व्यक्ती, संस्थांना कायम मदतीचा हात दिला आहे.
महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने विकासाचा मोठा अनुशेष आहे. अशा स्थितीत जळगावकरांशी असलेल्या बांधिलकीला हा उद्योग समूह जागला आहे. मग पाणीटंचाई काळात पीव्हीसी पाईप तातडीने उपलब्ध करून देणे असो की, गणेशविसर्जन मार्गावरील रस्त्यांची आपत्कालीन दुरुस्ती असो हा समूह अग्रभागी राहिला. लोकसहभागातून मेहरुण तलावाची गळती थांबवून गाळ काढण्याचा उपक्रम महापालिकेने हाती घेतला असताना या समूहाने मोलाचा वाटा उचलला. नागरी सुविधा पुरविण्यात महापालिका अपुरी पडत असताना उद्यानांची उभारणी आणि पुनर्बांधणी, चौकांचा विकास अशी कामे या उद्योगसमूहाने स्वत:हून हाती घेऊन वेळेत लोकार्पण केली.
- मिलिंद कुलकर्णी
milind.kulkarni@lokmat.com