सोशल मीडियाचा शाहिरी परंपरेवरही परिणाम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 02:56 AM2018-01-11T02:56:58+5:302018-01-11T02:57:06+5:30
राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित राज्य शाहिरी महोत्सव ८, ९ व १० जानेवारीला बुलडाणा येथे पार पडला. महाराष्ट्र शाहिरी परिषदेचे अध्यक्ष दादा पासलकर यांनी महोत्सवात हजेरी लावली.
- हर्षनंदन वाघ
राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित राज्य शाहिरी महोत्सव ८, ९ व १० जानेवारीला बुलडाणा येथे पार पडला. महाराष्ट्र शाहिरी परिषदेचे अध्यक्ष दादा पासलकर यांनी महोत्सवात हजेरी लावली. त्यांच्याशी केलेल्या बातचितीदरम्यान, त्यांनी शाहिरीच्या इतिहासापासून शाहिरांच्या प्रश्नांपर्यंत अनेक विषयांवर प्रकाश टाकला.
प्रश्न : समाजाच्या सांस्कृतिक जडण-घडणीत शाहिरी परंपरेचे महत्त्व किती ?
दादा - बाराव्या शतकापासून शाहिरी परंपरा सुरू असल्याचे दाखले इतिहासात मिळतात. समाजाच्या प्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून शाहिरी परंपरा सुरू झाली होती. मध्यंतरीचा काळ सोडल्यास, पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत, तसेच पेशवाईतही शाहिरीला राजाश्रय मिळाला होता. इंग्रजांची राजवट स्थिरावल्यावर शाहिरी परंपरा काहीशी बाजूला पडली होती; मात्र स्वातंत्र्य चळवळीत शाहिरांनी ग्रामीण भागात जनजागृती घडवून आणण्यात मोलाची कामगिरी बजावली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शाहिरांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही सहभाग नोंदवून नवचैतन्य निर्माण केले होते.
प्रश्न : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शाहिरी परंपरा का दुर्लक्षित राहिली ?
दादा - स्वातंत्र्यानंतर संयुक्त महाराष्ट्रासाठी शाहिरांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन, अनेक पुढाºयांनी शाहिरांना आपल्या दावणीला बांधले. अनेक राजकीय पुढाºयांनी अशा शाहिरांना सोबत घेऊन, स्वत:चे गुणगान करवून घेत, निवडणुकीत यश मिळविण्यासाठी त्यांचा उपयोग करून घेतला; मात्र निवडणुका पार पडल्यानंतर त्यांच्याकडे पाठ फिरविण्यात आली.
प्रश्न : महाराष्ट्र शाहीर परिषद गठित करण्याची गरज का पडली ?
दादा - राज्याच्या सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाºया शाहिरी परंपरेला अडगळीत टाकण्याचे काम राजकीय पुढाºयांनी स्वातंत्र्यानंतर केले. त्यांचा केवळ निवडणुकीपुरता उपयोग करून घेतला. त्यानंतर अनेक शाहिरांनी घरावर तुळशीपत्र ठेवून, शाहिरीचा प्रचार-प्रसार केला; मात्र सबळ संघटन नसल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्षच झाले. त्यामुळे आत्माराम पाटील, ग. द. दीक्षित आदी नामवंत शाहिरांना शाहिरांची संघटना असण्याची गरज जाणवू लागली. पुढे त्यांच्याच प्रयत्नांती, सतत तीन-चार वर्षे परिश्रम घतल्यानंतर शाहिरांचे पहिले अधिवेशन पुणे येथे शनिवारवाड्यात २८ फेबु्रवारी १९६८ रोजी पार पडले.
प्रश्न : महाराष्ट्र शाहीर परिषदेचे गठन झाल्यानंतर तरी न्याय मिळाला का ?
दादा - महाराष्ट्र शाहीर परिषदेचे गठन होऊन ५० वर्षे उलटली आहेत. यावर्षी महाराष्ट्र शाहीर परिषद आपला सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहे. ५० वर्षांच्या दीर्घ कालखंडात, शाहिरांच्या विविध अडचणी सोडविण्यात यश आले आहे. शासनातर्फे शाहिरांसाठी अनुदान योजना राबविण्यात आली होती. त्या योजनेंतर्गत अनेक शाहिरी फडांना विविध प्रकारचे साहित्य घेण्यासाठी अनुदान मिळाले. त्यानंतर घरकुल योजनेंतर्गत मुंबईत घरे मिळाली; परंतु अनेक शाहीर कलावंत ग्रामीण भागात असल्यामुळे त्यांना त्या घरांचा उपयोग झाला नाही. आता शाहिरांना मानधन योजनेचा लाभ मिळत आहे.
प्रश्न : सोशल मीडियाचा शाहिरी परंपरेवर परिणाम होत आहे का ?
दादा - इतर क्षेत्रांप्रमाणे शाहिरी परंपरेवरही सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. अशा आव्हानांचा मुकाबला करून शाहिरी परंपरा टिकविण्यासाठी शासन शाहिरी महोत्सवासह इतरही कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. तरीही अजून बरेच काही करता येईल. शाळा, महाविद्यालये, तसेच विविध कार्यक्रमांमध्ये प्रबोधन करण्यासाठी शाहिरांना संधी दिली पाहिजे. व्यसनमुक्तीसारख्या गोष्टींसाठी शाहिरांना सहभागी करून घेतल्यास, समाजात प्रभावी संदेश पोहचविण्यास मदत होईल.