सोलापुरी भाजप प्रासंगिक कराराच्या चक्रव्यूहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 02:12 AM2018-03-21T02:12:51+5:302018-03-21T02:12:51+5:30
काँग्रेसच्या गोटात चाललेल्या खा. राजू शेट्टी यांच्या भूमिकेचा प. महाराष्टÑातील साखर पट्ट्याच्या राजकारणावर नक्कीच परिणाम होणार आहे. त्यात सोलापूर, माढा आणि उस्मानाबादसारख्या तीन-तीन लोकसभा मतदारसंघाने व्यापलेल्या सोलापूर जिल्ह्यात भाजप मात्र ‘प्रासंगिक करारा’च्या चक्रव्यूहात अडकलेला आहे.
- राजा माने
काँग्रेसच्या गोटात चाललेल्या खा. राजू शेट्टी यांच्या भूमिकेचा प. महाराष्टÑातील साखर पट्ट्याच्या राजकारणावर नक्कीच परिणाम होणार आहे. त्यात सोलापूर, माढा आणि उस्मानाबादसारख्या तीन-तीन लोकसभा मतदारसंघाने व्यापलेल्या सोलापूर जिल्ह्यात भाजप मात्र ‘प्रासंगिक करारा’च्या चक्रव्यूहात अडकलेला आहे.
महाराष्टÑाच्या राजकारणात सोलापूर जिल्ह्याला नेहमीच मोठे महत्त्व राहिलेले आहे. राष्टÑीय राजकारणातील अनेक घडामोडीत नेहमीच अग्रस्थानी राहणाऱ्या शरद पवारांचा हा लाडका जिल्हा! म्हणूनच त्यांनी याच जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातून २००९ साली लोकसभेत प्रवेश केला होता. माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री खा. विजयसिंह मोहिते-पाटील ही वजनदार मंडळी याच जिल्ह्यातील. २०१४ साली देशाला नरेंद्र मोदी लाटेने व्यापले तेव्हा त्या लाटेत सुशीलकुमार शिंदेंसारखे नेतेही स्वत:चा पराभव रोखू शकले नाहीत. अशा संदर्भासह २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांची चाहूल लागलेल्या या जिल्ह्याचे राजकीय चित्र आज मात्र मोठे मनोरंजक बनले आहे.
२०१४ साली झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीला ग्रामीण जिल्ह्यात विजयसिंह मोहिते-पाटील तसेच त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते-पाटील विरुद्ध संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील व राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण तुर्कांच्या आक्रमक गटाची झालर होती. शरद पवार व अजित पवार यांच्या निष्ठावंतांतील अंतर्गत राजकारणाचेच ते फळ होते. त्याही वातावरणात सहकारमहर्षी स्व. शंकरराव मोहिते-पाटील यांची पुण्याई व स्वत: विजयसिंहांबद्दल असणारा आपलेपणा या बळावर माळशिरस तालुक्यातील मतदारांनी त्यांना तारले. ते विजयी झाले, पण मतदान दिवसाच्या तोंडावर सोलापुरात झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेने सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव मात्र निश्चित झाला होता. पक्ष कुठलाही असो गटबाजीच्या अशाच समीकरणांभोवती फिरण्याची या जिल्ह्याच्या राजकारणाची परंपरा आहे. राज्यात होणाºया राजकीय उलथापालथीतदेखील अशाच प्रकारचे गणित हा जिल्हा कायम राखत आलेला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आळवलेला ‘मोदीमुक्त’ राजकारणाचा नवा सूर आणि शेतकरी नेते खा. राजू शेट्टी यांनी खा. राहुल गांधी यांना भेटून काँग्रेसच्या गोटात जाण्याची चालविलेली तयारी या घटनांचा मोठा परिणाम पश्चिम महाराष्टÑ आणि सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावरही होणार आहे.
२०१४ च्या निवडणुकीपासून पवार काका-पुतणे निष्ठावंत मानला गेलेला संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मोहिते-पाटील विरोधी गट सरळसरळ भाजप आघाडीत जाऊन बसला. स्वत: अपक्ष राहून शिंदे यांनी भाजपच्या मदतीने जिल्हा परिषद अध्यक्षपदही मिळविले. भाजप प्रवेशाची छोटी लाटच जिल्ह्यात आली होती. या लाटेचा आधार मात्र ‘प्रासंगिक करार’ एवढाच मर्यादित होता, असे आता स्पष्ट होऊ लागले आहे. राज्यमंत्री असलेले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री असलेले सुभाष देशमुख यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे सख्य सदैव कायम राहिले आहे. त्याच कारणाने प्रत्येक तालुक्यातील अनेक नेते भाजपामध्ये गेले, पण त्यांची निष्ठा मात्र पारंपरिक गटबाजीवरच! त्यामुळे तालुका-तालुक्यातील या राजकीय प्रासंगिक करारांच्या चक्रव्यूहात भाजप सापडला आहे. तो भेदण्याची क्षमताही कुणामध्ये दिसत नाही. तो चक्रव्यूह सोलापूर, माढा आणि उस्मानाबादसारख्या तीन-तीन लोकसभा मतदारसंघाने व्यापलेल्या सोलापूर जिल्ह्याच्या निवडणुकांवर परिणाम करणार आहे. त्या परिणामाची चिंता मात्र भाजपच्या कुठल्याही नेत्याला दिसत नाही अथवा त्याची त्यांना फिकीर नाही, असेच म्हणावे लागेल.