‘स्व’चा शोध घडविणारा एकांतवास...
By किरण अग्रवाल | Published: October 8, 2020 08:20 AM2020-10-08T08:20:51+5:302020-10-08T08:21:07+5:30
प्राणाचा आयाम शरीराच्या नश्वर देहाचा व्यायाम घडवून आणतो तेव्हा ही ‘स्व’ची घंटी अंतरात्म्याला जागवून जाते.
- किरण अग्रवाल
कोरोनाच्या निमित्ताने एकांतवासातून आत्मावलोकनाकडे जाण्याची संधी मिळते हे खरे, पण हा प्रवास म्हणावा तितका सोपा खचितच नाही. स्वत:तले स्वत्व जेव्हा मनाच्या डोहात पूर्णांशाने विरघळून टाकणे शक्य होते, तेव्हा कुठे त्यासाठीचा मार्ग किलकिला होतो; प्रकाशाची किरणे विचारांच्या ताटव्यांना धडका देत सुवर्णमयी आल्हादकतेची पखरण करू पाहतात, घनगर्द काळोखाची किर्र कवने उजेडाचे गीत गायला अधीर होतात, स्वरांना शब्दांचा आकार-उकार लाभू पाहतो, तो जो काही उत्सव असतो... चेतनेचा प्रकटोत्सव म्हणूया त्याला, तोच तर असतो तिमिरातून तेजाकडे नेणारा. एकांतातला वाटाड्या. अध्यात्माची जाणीव करून देणारा व ‘स्व’चा साक्षात्कार घडविणारा...
एकदा का हा ‘स्व’चा साक्षात्कार झाला, की त्याच्या विलयाची प्रक्रिया सोपी होऊन जाते. जलाचे जलातील अर्पण जितक्या सहजपणे घडून येते, तितक्याच सहजतेने हे ‘स्व’चे तर्पण करता येणे हेच तर अध्यात्म आहे. शेवटी तर्पणदेखील काय, तर तो आहुतीचा, मुक्तीचाच मार्ग असतो. ‘मृत्योऽर्मा अमृतम्गमय’ची दिशा स्वच्छंदी करणारा. म्हणून ‘स्व’ला जाणायचे. त्या स्वमध्ये स्वत:ला समाहित, संमिलीत व संमोहितही करून घ्यायचे; कारण या तिन्ही प्रकारात मननाची प्रकिया अंतर्भूत असते. मनाने, वाचेने, कायेने विलयाचा भाव त्यात अभिभूत असतो, जो ‘स्व’च्या जाणिवेतून मुक्तीच्या राजमार्गाकडे नेतो. स्व हा मूलगामी निर्गुण, निराकार, निरवैर असाच असतो. नवजात बाळासारखा. कसलीही चिंता, भीती वा कपटाचा लवलेश नसलेला. आनंद व केवळ आनंदाचे निधान असलेला. या स्वची जितकी प्रामाणिक गळाभेट घ्याल, तितके मनाचे झरे निर्झर होतील. भवतालचे षड्रिपु यात बाधा आणण्यापूर्वी हे काम करायचे असते, कारण ते मनाची मलिनता वाढवीत असतात. काम, क्रोध, मद, मोह-मत्सराचे जाळे घट्ट असते. या जाळ्याचे तार एकमेकांत असे विणलेले असतात, की कुणा एकास सोडताच येऊ नये. भौतिक सुखासीनतेकडे नेणारी आभासी दिशाभूल तर त्यातून घडून येतेच, शिवाय विचारांची शृंखलाही या मलिनतेत अवरुद्ध होते. स्वच्या आहार, विहारात स्वत:ला झोकून देणे व स्वच्या एकारांततेकडून आत्मसिद्धीच्या उकारांततेकडे मार्गस्थ होणे हे म्हणूनच अवघड असते.
आत्म्याचे अवलोकन घडून येण्यासाठी ‘स्व’चा विलय याकरिताही गरजेचा असतो, की त्याभोवतीच तर आशा अपेक्षांचे इमले उभे होत असतात. या अपेक्षा निरंकुश असतात. समाधान ही संकल्पना तिथे थिटी पडते, संकुचित होते. आहे त्यापेक्षा अधिक प्राप्तीचा लोभ त्यात डोकावल्याखेरीज राहत नाही. लोभाला सहोदरही अनेक असतात. न बोलावता ते येतात, लाभतात व जिवाभावाचे होतात. अशात मार्ग सुटतात, रस्ते खुंटतात व वाटा तेवढ्या उरतात. चालण्याची मर्यादा यातून जोखता येते. जशी ही चाल, तसा ज्याचा त्याचा हाल. त्या चालीत संयम असला तर ठीक, घाई करायला गेले की रिपूंच्या आहारी जाणे ओघाने येते. ‘स्व’चा आहार म्हणूनच बळकट असला तर वाटेतली वावटळ निरस्त करणे अवघड ठरत नाही. या वावटळीचा क्षय घडवून आणायचा तर आशय मजबूत हवा. स्वच्या धारणा जितक्या प्रगल्भ, तितके जाणिवांचे आकाश निरभ्र. पारदर्शीता त्यात अधिक. प्रतिक्रिया ही क्रियेची उत्सर्जनावस्था असते, तसे विकारांचे विसर्जन घडवता आले तर कुविचारांचा क्षय आपोआप घडून येतो. निग्रहाचे बळ मात्र त्यासाठी असावे लागते. सद्विवेकाचा आग्रह व विचारांचा निग्रह, हेदेखील स्वला जोखण्यातून तसेच आत्म्याच्या अनुलोम विलोमातूनच साकारतात. प्राणाचा आयाम शरीराच्या नश्वर देहाचा व्यायाम घडवून आणतो तेव्हा ही ‘स्व’ची घंटी अंतरात्म्याला जागवून जाते.
थोडक्यात वाटा वेगळ्या, पण गंतव्य एकच आहे. ‘स्व’चे म्हणजे आत्म्याचे अवलोकन. चेतनेच्या उत्सवाची तीच तर नांदी असते. तेथूनच आयुष्याचा, जगण्याच्या जीवनदर्शनाचा पडदा उघडतो. तो उघडण्यापूर्वीचे, मनाच्या विंगेतले हे कथानक ज्याला उमजले तो या रंगमंचावरचा असली हिरो. त्याला अचेतनेतील भैरवीची चिंता सतावत नाही, त्यालाच जीवन कळले असे म्हणायचे...