सिद्धीस न जाणारे नूतन वर्षाचे असेही काही संकल्प

By Admin | Published: December 24, 2015 11:38 PM2015-12-24T23:38:13+5:302015-12-24T23:38:13+5:30

चालू वर्ष सरत आले आहे आणि नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. सरत्या वर्षातील हे माझे अखेरचे स्तंभलेखन.

Some of the same resolutions of the new year that have not passed | सिद्धीस न जाणारे नूतन वर्षाचे असेही काही संकल्प

सिद्धीस न जाणारे नूतन वर्षाचे असेही काही संकल्प

googlenewsNext

राजदीप सरदेसाई, (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)
चालू वर्ष सरत आले आहे आणि नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. सरत्या वर्षातील हे माझे अखेरचे स्तंभलेखन. त्यामुळे यात मी आपल्या विविध राजकीय नेत्यांच्या मनातील नवीन वर्षाच्या संकल्पांचा आढावा घेणार आहे. त्यात कुठल्याही प्रकारचा आकस नाही. केवळ एक गंमत आहे. (तसेही संपादकीय पानावरील लेख नेहमीच जड आणि गंभीर असलेच पाहिजेत असे काही आहे?)
नरेंद्र मोदी: आगामी वर्षात वारंवार विदेश दौरे करण्याऐवजी आपल्याच देशामधील ज्या जिल्ह्यांच्या कृषी क्षेत्रात नैराश्य पसरले आहे, त्यांना भेटी देईन. मला याची जाणीव आहे की माझे खरे मतदार भारतातल्याच उन्हात आणि धुळीत आहेत, ‘मोदी मोदी’ असा घोष करणाऱ्या अनिवासी भारतीयांमध्ये नाही. एखाद्या दिवशी शेतकरी संमेलन भरवून तिथे मी ‘मन की बात’ करु शकेन. ती फक्त रेडियोवर नसेल तर फेसबुक, ट्विटर आणि इतर माध्यमांमधूनही असेल. (मला खात्री आहे की मार्कला, म्हणजे झुकेरबर्गलाही ग्रामीण भारताविषयी जाणून घ्यायला नक्कीच आवडेल).
राहुल गांधी: नवीन वर्षात मी माझ्या पक्षातील नेत्यांना न सांगता मोठ्या सुट्टीवर जाणार नाही. मी ही बाब नक्कीच माझी आई, बहीण आणि मेव्हण्यास सांगेन, कारण गांधींसाठी परिवार नेहमीच अग्रभागी असतो. मी संसदेच्या बजेट सेशनच्या तारखा आधीच माहिती करून घेईन जेणेकरून माझ्या आत्मचिंतन रजेचा काळ आणि बजेट सत्र एकाच वेळी येणार नाहीत. आणि हो, मी माझी ओळख म्हणून दाढी ठेवायची की तुळतुळीत ठेवायची हा गोंधळ दूर करेन.
सोनिया गांधी: मी दीर्घकाळ कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूषवित आहे आणि आता माझ्या मुलाने हे पद सांभाळण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्याच्याकडे हे पद जावे या विषयावर येत्या वर्षात मी भर देईन. तरीही राहुल तयार झाला नाही तर माझ्या आतल्या आवाजाचे ऐकून मी पदावरून स्वत:हून बाजूला होईन. आणि हो, ते सुब्रह्मण्यम स्वामी याच प्रकारे न्यायालयाच्या माध्यमातून आम्हाला त्रास देणे सुरु ठेवतील तर मी त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देईन की मी इंदिरा गांधींची स्नुषा आहे आणि कुठलाच न्यायाधीश माझा हा विशेष दर्जा काढून घेऊ शकत नाही.
अरुण जेटली: नव्या वर्षात मी माझी इतर सर्व पदे सोडून देऊन देशाचे अर्थकारण सांभाळणे या माझ्या मुख्य कामावर लक्ष केंद्रीत करेन. मी ब्लॉग लिहिणार नाही, राजकीय मीमांसा करणार नाही, वादाच्या काळात पक्षाचा प्रवक्ता होणार नाही, कुठलेच कायदेशीर सल्ले देणार नाही आणि माध्यमांचे व्यवस्थापनही करणार नाही. एक अशी दक्षता जरुर घेईन की माझे क्रिकेटप्रेम फिरोजशाह कोटला मैदानाच्या पलीकडे जाणार नाही. तशीही तिथली खेळपट्टी आता विश्वसनीय राहिलेली नाही.
अरविंद केजरीवाल: माझी निवड नेमकी ज्या कामासाठी केली गेली ते काम म्हणजे राष्ट्रीय राजधानीचे प्रशासन राबविण्याचे आगामी वर्षात पूर्ण करेन. पंतप्रधानांपासून नायब राज्यपालांपर्यंत आणि दिल्लीच्या पोलीस प्रमुखांपासून सीबीआय व माध्यमांपर्यंत, साऱ्यांशी संघर्ष करणे थांबवेन.
लालकृष्ण अडवाणी: मी आता ज्या वयात आहे त्या वयात कुठलाच संकल्प करणे योग्य ठरत नाही. पण मी मात्र सार्वजनिक जीवनात कायम राहण्याचा संकल्प केला आहे. मला माहीत नाही की ‘मार्गदर्शक मंडळ’ म्हणजे काय असते. पण हे विसरू नका, राष्ट्रपती पदाची निवडणूक २०१७मध्ये आहे व त्याच काळात मी माझी नव्वदी साजरी करणार आहे. राष्ट्रपती भवनासारखे निवासस्थान असणे याहून मोठा उपहार काय असू शकतो?
ममता बॅनर्जी: नव्या वर्षात पुन्हा बंगालच्या सत्तेत येण्याचा संकल्प मी करीत आहे. डाव्यांनी तीस वर्षे पश्चिम बंगालची वाताहत केली, मी तेवढीच वाताहत दहा वर्षात करेन. जर केजरीवालांना असे वाटते की ते आम आदमी आहेत तर मी सुद्धा आम औरत आहे. मी उगाच नाही मुख्यमंत्री असतानाही माझ्याच सरकारच्या विरोधातील रस्त्यावरच्या निदर्शनात सहभागी झाले होते. तुम्हला माहीतच असेल की आम्हा बंगाली लोकांना बंद किती आवडतो ते!
जयललिता: मी सुद्धा २०१६मध्ये तामिळनाडूच्या सत्तेत पुन्हा येण्याचा संकल्प केला आहे. नाही, मी पोस गार्डन भागातून बाहेर पडून पूरबाधित लोकाना भेट देणार नाही. मी खास तयार करुन घेतलेल्या आलिशान बसमधून प्रचार करेन. अम्माची एकच लाट लोकाना पूरस्थितीच्या काळातील अपेष्टा विसरविण्यास पुरेशी आहे.
उद्धव ठाकरे: येत्या वर्षात मी एकाही पाकिस्तान्याला मुंबईत येऊ देणार नाही. देशातील सर्व पारपत्र कार्यालयांमध्ये शिवसैनिकांची नेमणूक करून परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाचा व्हिसा तपासण्याचे नियोजन आम्ही करीत आहोत. आमचा दादर येथे काळ्या शाईचा आणि पिचकाऱ्यांचा कारखाना आहे (आणि हो, काळी शाई फासताना तिथे टिव्ही कॅमेरे वेळेवर हजर राहतील याची काळजी आम्ही नक्कीच घेऊ ).
लालूप्रसाद: राबडीदेवींना राज्यसभेत आणि मिसा भारतीला विधान परिषदेत पाठवून माझा कुटुंबाचा अल्बम पूर्ण होईल. कायद्याने मला निवडणूक लढवण्यापासून रोखले असले तरी रिमोट कंट्रोलला आळा घालणारा कायदा देशात अस्तित्वात नाही.
मुलायम सिंह: अखिलेशला उत्तर प्रदेश सरकार चालवण्याची परवानगी देऊन टाकावी, असे माझ्या मनात घोळते आहे. त्याने माझ्या वाढिदवसानिमित्त किती मोठा समारंभ सैफई येथे ठेवला होता. त्याचे एके काळचे काका अमरसिंह यांना उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात इतक्या मोठ्या प्रमाणात स्टार मंडळी आणण्याचे कौशल्य कधीचदाखवता आले नाही.
मोहन भागवत: मी अशी अशा बाळगतो की नव्या वर्षात रा.स्व. संघ हिंदूराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करेल. आणि जर दांभिक धर्मनिरपेक्षतावाद्यांना ते आवडले नाही तर त्यांनी खुशाल माझ्याकडे किंवा अनुपम खेर यांच्याकडे पुरस्कार परत करावेत.
ताजा कलम: नवीन वर्षासाठीचे संकल्प मोडण्यासाठीच असतात. चला भारतीय राजकारणातील आणखी एका उत्सुकतेने भरलेल्या अनपेक्षित वर्षासाठी तयार होऊ या. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

Web Title: Some of the same resolutions of the new year that have not passed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.