दारे ठोठावताहेत काही विचित्र आवाज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 05:34 AM2021-05-01T05:34:49+5:302021-05-01T05:35:01+5:30

- विजय दर्डा एक विचित्र ध्वनी माझ्या कानांवर आदळतो आहे हा ध्वनी नेहमीचा नाही नाही ओळखी-पाळखीचा  पण काही अधिक ...

Some strange noises knocking on the doors | दारे ठोठावताहेत काही विचित्र आवाज

दारे ठोठावताहेत काही विचित्र आवाज

Next

- विजय दर्डा

एक विचित्र ध्वनी
माझ्या कानांवर आदळतो आहे
हा ध्वनी नेहमीचा नाही
नाही ओळखी-पाळखीचा 
पण काही अधिक गतीने
हा ध्वनी दणाणत धावतो आहे..
नंतर कळलं की 
हा सायरनचा आवाज आहे!
परंतु नेहमीसारखा नाही
उरावर मृत्यू धावून यावा
तशासारखे काही!

रात्रंदिवस हाच आवाज
माझ्या कानांवर आदळतो आहे.
याच आवाजांमधून काही
विचलित करणारे आवाज टाहो 
आणि तडफडाटांनी भरलेले आहेत
ते धडाधड दारे ठोठावीत आहेत.
हे कसले आवाज ते मला माहीत नाही.
आणि माझी - त्यांची ओळखही नाही.
मग मी असा अस्वस्थ का?
ही ॲम्ब्युलन्स कुठेतरी पोहोचल्यावर 
थांबून का राहत नाही?
फक्त भटक्यांसारखी का भटकत आहे?
वाटतंय की ती काही शोधते आहे..

कुठे विनवणी सुरू आहे
कुणीतरी त्यांचे त्यांना
जवळ करतील म्हणून!
परंतु अशी जवळीक
दाखवणारे कोणी नाहीत
खरंच कुणी आधार देतील
गळाभेट घेतील?
पण असे गळेदेखील आता कुठे नाहीत.. 
निष्प्राण डोळे, अडखळते बोल
थरथरणारे हात आणि नजरेपुढे राख !
आधीपेक्षा आता तर 
कितीतरी अनोळखी टाहो
माझ्या चाैफेर धावताहेत.. 
लाचार बिचारा
माझा लोकप्रतिनिधी
तोही फक्त स्तब्ध आहे
तो इकडे-तिकडे पाहतो आहे..
काळस्थितीवरून आपली नजर
अन्यत्र लपवतो आहे..
काय करावे हे त्याचे त्यालाही
कळेनासे झाले आहे.. 
कुणापाशी ते दोन हात आहेत?
ज्या कुणापाशी ते असतील
ते आपलेपणाने 
उराशी का लावत नाहीत?
वेळ मिळाला होता बाका 
मग का नाही साधला मोका?
काय ते जगणे काय ते मरणे
सारे चित्र जसेच्या तसेच !

सर्वत्र भीतीचे वातावरण
त्यातही दिसतो एक आशेचा किरण!
तो आहे डॉक्टर.. 
सूर्यकिरण साक्षात!
आणि त्याच्यासोबत राबणारे
सोबतीही प्रत्यक्षात!
आम्हीही आहोत त्यांचे सारथी
तरीही गात नाही त्यांच्या
अथक सेवेची आरती.. 
उपदेशांची नक्षी काढणाऱ्यांनो, 
निष्ठा राखा, समर्पण शिका.. 
फार केल्यात अकारण बाता
भाऊ, चला निघा आणि झोपा आता !
उरलाय फक्त स्वप्नांचा आसरा
खोट्या स्वप्नांमध्ये स्वत:ला विसरा
माझा आवाज त्यांच्यापर्यंत
का पोहोचत नाही?
परंतु त्यांच्या दबलेल्या स्वरातील 
आवाज माझ्यापर्यंत पोहोचत आहेत!
तरीही ते असहाय आणि हतबल! 

त्यांच्याकडील अस्त्रे-शस्त्रे
निष्प्राण भासताहेत, 
नि:शस्त्र हातही बांधले आहेत,
ना श्वसनाला ऑक्सिजन,
ना घाव भरायला इंजेक्शन, 
ना औषधे पुसतात हाल
तिकडे मात्र फॅक्टऱ्या 
लबालब आणि मालामाल..!
तर इकडे परिसीमा गाठत आहे
तू-तू - मी-मी चा पाऊस इरसाल!
 
तरीही मी शांत आहे
कुठलाही आक्रोश न करता.. 
आज नाही तर उद्याच्या
आशेवर जगतो आहे !
इतिहासाने सत्यच सांगितलेय 
की वाईट असते निराशा
सर्वांत सुंदर फक्त
आशा आणि आशाच !!
हे कसले दृश्य आहे..?
रुग्णांचे दु:ख बघून
रडत असलेला
परिस्थितीपुढे हतबल झालेला
डॉक्टर, या आधी
मी कधी पाहिला नाही.
आज तोही उदास आणि
पाहा कसा चिंताग्रस्त आहे.. 
त्यालाही कुठे हे भावत आहे?

इथे तर चौफेर
भय आणि भयाचेच सावट आहे.
हिमालयातून वाहणारी गंगा
आता अपवित्र झाली आहे.. 
मात्र लाखोंनी तिच्यात डुबकी
मारून स्वत:स पवित्र केले आहे.
सर्वत्र जिंदाबादचे निर्भय 
नारे लागताहेत 
कुठल्यातरी कोपऱ्यातून 
बंद कानांवर अजानचा आवाज 
येतो आहे,
आरतीच्या प्रकाशात
लुभानचा सुगंध मिसळतो आहे
अडवू नका, मिसळू द्या यांना परस्परात 
कुणीही त्यांना थांबवू नका !!

होळीपेक्षाही जोरात तेजाळत आहे
प्रेतांची भूमी अशी काही
अपरिचित प्रवाशाला बघून आज 
तिलाही रडू आवरलेले नाही !!

होळी म्हणाली, 
‘‘अकाली येणाऱ्या पाहुण्यांची
कशी ठेवावी बडदास्त
चला अजून कुठले गाव शोधू
तिथेही चेतवायची आहे होळी 
बघा खास’’ 

हरेक स्थळी एकसारखे दृश्य आहे..
कुठे आपली माणसं
आपणापासून गमावल्याचं दु:ख, 
तर कुठे दूर दडून राहणाऱ्या
माणसा-माणसाचे दु:ख.. 
कशी दुरावत चाललीय
माणसा-माणसातली माया,
सर्वत्र दु:ख आणि दु:खाचीच छाया..

अशातच कुठे मला, कुठे तुला
आशांचे दीप चेतवायचे आहेत..
काळ बदलायला हवा
नाहीतर याला बदलवायला हवे !

मला ठाऊक आहे
इथे प्रत्येकजण आहे ‘मजबूर’ 
परंतु काही ‘मजबूत’ पण आहेत!
तेच आता माझा आशेचा प्रकाश,
आणि जगण्याचा विश्वास आहेत...

अनुवाद - सुधाकर गायधनी 'देवदूत'कार

(लेखक लोकमत समुहाचे चेअरमन आहेत)

Web Title: Some strange noises knocking on the doors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.