कुणी, ‘घर देता का घर...'; देशाबाहेर घालविलेल्या दुर्दैवी बेघरांची अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 03:53 AM2018-09-04T03:53:37+5:302018-09-04T03:54:03+5:30

 ‘घर देता का घर, घर देता का घर’ अशी याचना करीत कुसुमाग्रजांचा नटसम्राट जेव्हा रस्त्याने निघतो तेव्हा त्याच्या आर्ततेनेच आपली अंत:करणे विदीर्ण होतात. मुलांनी घराबाहेर काढलेल्या, कधीकाळी मराठी माणसांच्या अभिमानाचा विषय झालेल्या त्या नटसम्राटाची दारुण अवस्था तेव्हा आपण पाहतो असतो...

Someone, 'home gives home ...'; The condition of the unfortunate homeless from outside the country | कुणी, ‘घर देता का घर...'; देशाबाहेर घालविलेल्या दुर्दैवी बेघरांची अवस्था

कुणी, ‘घर देता का घर...'; देशाबाहेर घालविलेल्या दुर्दैवी बेघरांची अवस्था

googlenewsNext

- सुरेश द्वादशीवार
(संपादक, नागपूर)

 ‘घर देता का घर, घर देता का घर’ अशी याचना करीत कुसुमाग्रजांचा नटसम्राट जेव्हा रस्त्याने निघतो तेव्हा त्याच्या आर्ततेनेच आपली अंत:करणे विदीर्ण होतात. मुलांनी घराबाहेर काढलेल्या, कधीकाळी मराठी माणसांच्या अभिमानाचा विषय झालेल्या त्या नटसम्राटाची दारुण अवस्था तेव्हा आपण पाहतो असतो... जगात बेघरांची संख्या मोठी आहे आणि ती मानवनिर्मित अधिक आहे. पेरू, अर्जेंटिना, व्हेनेझुएला, चिली, पॅराग्वे इ. दक्षिण अमेरिकेतील देश अन्नान्न दशा, बेरोजगारी, रोगराई, दारिद्र्य व तशाच अनेक आपत्तींनी गांजलेले व नागरिकांना जगवू न शकणारे आहेत. अन्न व निवाऱ्याच्या शोधात त्यातून कशीबशी वाट काढत उत्तर अमेरिकेच्या दिशेने जाणाºया बेघरांची संख्या कित्येक लाखांची आहे. त्यांना प्रवेश नाकारण्यासाठी व अगोदरच देशात आलेल्या अशांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या देशाच्या दक्षिण सीमेवर पोलादी भिंत उभारून तीत विद्युत प्रवाह सोडला आहे. त्या भिंतीवर व भिंतीमागे आपली सशस्त्र सेनाही त्यांनी उभी केली आहे. पुढे जाता येत नाही आणि मागचा निवारा उरला नाही मग तशाच अर्धपोटी अवस्थेत आपल्या मुलांचे व अवतीभवतीचा माणसांचे मृत्यू पाहात ही माणसे जनावरांसारखी कुंपणाआड राहतात.
मध्य आशियातील अनेक देशही आता आपसातील वा बड्या राष्ट्रांतील युद्धात अडकले आहेत. त्यातल्या धर्मांधांच्या संघटना स्त्रियांच्या, अल्पवयीन मुलींच्या व सामान्य माणसांच्या जिवावर उठल्या आहेत. त्यांच्यापासून जीव वाचवीत युरोपचा किनारा गाठणाºया आणि वाटेत उभारलेल्या कुंपणाआडच्या छावण्यात राहणाºया बेघरांची संख्याही आता एक कोटीहून अधिक झाली आहे. त्यातले काही बोटींच्या मदतीने सरकारचा डोळा चुकवून पुढचा किनारा गाठण्याचा प्रयत्न करतात. वाटेत त्या बोटी उलटतात, मग माणसे व मुले समुद्राच्या अधीन होतात. अशी मरून किनाºयापर्यंत आलेल्या अल्पवयीन मुलांची प्रेते जगाच्या डोळ्यांत अश्रू आणतात. मात्र आपल्या सरकारकडे त्यांच्यासाठी मदतीची मागणी करण्याखेरीज त्याला फारसे काही करता येत नाही. याहून वाईट अवस्था सरकारनेच सक्ती करून देशाबाहेर घालविलेल्या दुर्दैवी बेघरांची आहे. त्यात पाश्चात्त्य व मध्य आशियातील सरकारे व धर्मांधांएवढेच थेट पूर्वेकडील देशही भागीदार आहेत. काही वर्षांपूर्वी श्रीलंकेच्या सरकारने तेथील सिंहली बौद्धांच्या पाठिंब्याने तेथे वर्षानुवर्षे राहात आलेल्या तामिळांचे हत्याकांड केले. तोच प्रकार आता म्यानमारमध्ये सुरू आहे. त्या देशाच्या दक्षिण-पूर्व टोकावर असलेल्या अराकान पर्वताच्या आश्रयाने राहणारे लक्षावधी रोहिंग्या आदिवासींचे मरणसत्र चालवून त्यांचा मागमूसही राहू न देण्याचा म्यानमार सरकारचा इरादा आहे. म्यानमार हाही भगवान बुद्धाची अहिंसेची शिकवण आत्मसात केलेला देश आहे. गेल्या तीन ते चार हजार वर्षांपासून थेट आदिवासींचे दरिद्री जीवन जगणारे हे रोहिंगे चौदाव्या व पंधराव्या शतकात तेथे आलेल्या मुस्लीम व्यापाºयांच्या संपर्कामुळे त्या धर्मात गेले. मात्र त्यामुळे त्यांचे आदिवासी असणे संपले नाही. त्यापाठोपाठ भारत सरकारने आसामातील ४० लक्ष लोकांना देशाबाहेर घालविण्यासाठी त्यांच्या नावाचे रेकॉर्ड तयार केले आहे. आसामातील चहा मळ्यात कामासाठी येऊन गेली कित्येक दशके तेथे स्थिरावलेली ही माणसे आहेत. त्यातली काही इंग्रजी राजवटीतही तेथे आली आहेत. त्यांचा अपराध, त्यांचे दारिद्र्य व स्वदेशातील बेकारी हाच आहे. त्यांनी आसामची वर्षानुवर्षे सेवा केली आहे. ते तिथले मतदार आहेत, कर भरणारे आहेत. पण त्यांचा धर्म बहुसंख्यकांना खुपणारा आहे. फार पूर्वी तेही आमचेच होते असे म्हणणाºयांचा हा दुष्टावा आहे. त्या बेघरांना घ्यायला बांगलादेश तयार नाही आणि भारत त्यांना ठेवायला राजी नाही. बंगालच्या ममता बॅनर्जींनी त्यांना जागा देण्याची तयारी दाखविली तर त्यांना राजकीय आरोपांचे धनी व्हावे लागले आहे. सबब या ४० लाख भारतीयांनाही आता घर हवे आहे. तात्पर्य देश युरोपातला असो वा अमेरिकेतला, मध्य पूर्वेतला असो वा दक्षिण आशियातला आणि तो ख्रिश्चन असो वा मुसलमान, बुद्ध असो वा हिंदू त्याचे एकारलेपण व परधर्माविषयीचा आणि उपेक्षित व दरिद्री माणसांविषयीचा त्यांचा द्वेष सारखाच तीव्र आणि दुष्ट आहे. त्यात माणुसकीच्या कथा अधूनमधून ऐकू येणे हा वाळवंटात ओलावा सापडावा तसा दुर्मीळ भाग आहे. जगाच्या इतिहासात १४ हजारांहून अधिक लढायांची नोंद आहे आणि त्यातल्या साडेबारा हजारांवर लढाया धर्माचे झेंडे खांद्यावर घेतलेल्या लोकांनी लढविल्या आहेत. दुसरी गोष्ट राज्यकर्त्यांची. एकट्या विसाव्या शतकात जगभरातील हुकूमशहांनी मारलेल्या स्त्री-पुरुषांची संख्या १६ कोटी ९० लक्ष एवढी असल्याचे मार्क पामर या अमेरिकी राजनीतिज्ञाचे सांगणे आहे. या आकड्यात युद्धात मृत्यू पावलेल्यांची संख्या समाविष्ट नाही. हिटलरने ज्यू वगळता दोन कोटी जर्मनांना, स्टॅलिनने पाच कोटी रशियनांना तर माओने सात कोटी चिनी लोकांना आपल्या राक्षसी महत्त्वाकांक्षेपायी मारले वा ते मरतील अशी व्यवस्था केली. बाकीच्यांची मरणे देशोदेशीच्या लहानसहान हुकूमशहांच्या हातची आहेत. अखेर दुष्टावा ही वृत्ती आहे. ती देश, धर्म व कुटुंब यांनाही मागे सारणारी आहे. कुसुमाग्रजांच्या नटसम्राटाला दुसºया कुणी नाही तर त्यांच्या मुलामुलींनीच बेघर केले हे येथे लक्षात घ्यायचे आहे.

Web Title: Someone, 'home gives home ...'; The condition of the unfortunate homeless from outside the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.