गाणे हरवले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 03:43 AM2017-07-18T03:43:15+5:302017-07-18T03:43:15+5:30

समीरच्या गाण्यांनी स्पंदनांचे हळवे कोपरे निर्माण केले. मात्र भिकार गाण्यांनी या प्रतिभावंत गीतकाराच्या शब्दांना बेड्या घातल्या. परवा त्यांच्या मनातील ही वेदना नागपुरात व्यक्त झाली...

The song is lost .. | गाणे हरवले..

गाणे हरवले..

googlenewsNext

- गजानन जानभोर

समीरच्या गाण्यांनी स्पंदनांचे हळवे कोपरे निर्माण केले. मात्र भिकार गाण्यांनी या प्रतिभावंत गीतकाराच्या शब्दांना बेड्या घातल्या. परवा त्यांच्या मनातील ही वेदना नागपुरात व्यक्त झाली...

‘‘माझ्या गीताचे रोपटे बहरेल अशी जमीनच आता राहिलेली नाही, त्याला मी तरी काय करणार?’’, ख्यातनाम गीतकार समीर यांच्या मनातील ही वेदना. परवा ती नागपुरात त्यांच्याच गाण्यांच्या साक्षीने व्यक्त झाली. कधीकाळी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविलेल्या या गीतकाराचे दु:ख प्रातिनिधिक आहे. ते कलेच्या क्षेत्रातील अस्वस्थ वर्तमानही आहे. भूतकाळाच्या हिंदोळ्यावर अस्वस्थ होत जाणारे समीरसारखे प्रतिभावंत आपल्या अवती-भवतीही असतात. पण सर्जनशीलांना ती सल अधिकच बोचत असते. समीरची दुनिया तशी मायावी. ९० च्या दशकात ‘घुंगट की आड से दिलबरका’ किंवा ‘मेरा दिल भी कितना पागल हैं...’ या गाण्यांनी तरुणाईला वेड लावणारे समीर आज उमेद हरवून असे काही बोलून जात असतील तर त्यांची व्यथा आपण समजून घ्यायला हवी.
समीर हा हिंदी चित्रपटांतील रसिकप्रिय गीतकार. चार हजारांपेक्षा अधिक गाण्यांचा विश्वविक्रम ही तशी बाजारू समाधान देणारी गोष्ट. त्या विक्रमातून कलावंताचे मोठेपण अभिव्यक्त होत नसते उलट त्यातून वाट्याला येणारी लोकप्रियता क्षणिक असते. या विक्रमामुळे नव्हे तर अविट गाण्यांमुळे गीतकार समीर स्मरणात राहणार आहे. आनंद बक्षी, मजरुह सुलतानपुरी, साहीर लुधियानवी यांच्यानंतर हिंदी चित्रपटांतील शब्दसंगीताला नवे वळण समीरने दिले. तरुणाईच्या प्रेमाच्या संकल्पना त्याने हळूवार केल्या सोबतच त्याच्या गीतांनी स्पंदनांचे हळवे कोपरे निर्माण केले. म्हणूनच ही गाणी रसिकप्रिय झालीत. आज सिनेमातील कथा संपली, प्रेक्षकांच्या आवडी-निवडीनुसार ती आकार घेऊ लागली. मग गीतकार त्यात मागे कसे राहणार? याच स्पर्धेतून ‘दो बॉटल व्होडका’ रिचविण्यात आली आणि श्रोत्यांनी ती आनंदाने पचवली देखील. समीरसारखे प्रतिभावंत साहजिकच माघारले. या भिकार गाण्यांनी समीरच्या शब्दांना बेड्या घातल्या. एरवी शब्दांसाठी कधीही न चाचपडणारा हा गीतकार अस्तित्वासाठी ‘सरकायलेव खटिया’, ‘खिच मेरी फोटो’ अशा टुकार गाण्यांभोवतीही काही काळ घुटमळला. पण, तिथे तो फार स्थिरावला नाही. ‘मोह-मोह के धागे’ तरलतेने विणणाऱ्या वरुण ग्रोव्हर या गीतकारानेही काही दिवसांपूर्वी नागपुरात एका कार्यक्रमात हीच खंत व्यक्त केली. ‘चित्रपटाची कथा लिहिल्यानंतर ती बाजारात चालेल का, याचा कानोसा आधी घेतला जातो आणि नंतरच ती दिग्दर्शक-निर्मात्यांकडून स्वीकारली जाते’. हा बदलही वरुणने सखेद सांगितला होता. गाण्याचेही तसेच झाले आहे. तिच्या जन्मामागची प्रेरणा अनुभूती आणि ऊर्मीत दडलेली असते. समीर त्या परंपरेचा प्रतिनिधी. आपण बदलू शकलो नाही तर आपण कालबाह्य ठरू, हे भय अशा कलावंतांना सतत सतावत असते. याच भीतीतून नसिरुद्दीन शाह या श्रेष्ठ अभिनेत्याला नटव्यांसोबत बागेत नाचावे लागते. त्याबद्दल स्वत:ची जाहीर निर्भर्त्सनाही ते कधीतरी करतात. कलेच्या प्रांतातील हे प्रज्ञावंत जगरहाटीनुसार स्वत:ला बदलू पाहतात मात्र ते कधी प्रवाहपतित होत नाहीत. कारण त्यांचे अपराधी मन त्यांना सतत बजावत असते. प्रज्ञावंतांचे हे दु:ख सनातन आहे. त्यातून गुरुदत्त सुटले नाहीत, मन्नाडेला ते अस्वस्थ करायचे, रोशनसारखे संगीतकारही व्यथित व्हायचे. जयदेव यांचा शोकात्मही असाच व्याकूळ करणारा होता. ही परिस्थिती का निर्माण झाली? प्रतिभेच्या क्षेत्रावर गल्लाभरु बाजाराचे अतिक्रमण झाले अन् तिथेच साधक आणि साधना दुय्यम ठरू लागली. पुढे रसिकतेची व्याख्या बदलली, माध्यमांनी ती साऱ्यांवर लादली. याच काळात अनूनासिक हिमेश रेशमीया धुमाकूळ घालू लागला. अशा बेसूरांचे अस्तित्व कुत्र्याच्या छत्रीसारखे अल्पजीवी असते पण, तेवढ्या काळात सांगितिक प्रवाह नासवण्याचे पातक हे नासाडे करून जातात.
मायावी दुनियेच्या व्यवहाराने खंतावलेला समीर माणूसपणाचे सत्व अजूनही टिकवून आहे. अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी मैत्री परिवार संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे कुठलेही मानधन त्याने घेतले नाही. उलट या मुलांसाठी आणखी काही करता आले तर मला सांगा, असे तो म्हणाला. अस्वस्थ असतानाही उपेक्षितांच्या आयुष्यात आनंदाचा बहर यावा ही त्याची असोशी आहे. प्रतिभावंताच्या जगण्याचे समाधान हेच असते आणि निराशेपल्याड त्याला तेच जगवतही असते. ‘आज रात का सीन बना दे’... सारखी भंकस गाणी येतात आणि गटारातही जातात. आठवणीत राहतो तो समीर. याचे कारणही त्यानेच लिहून ठेवले आहे...‘तेरी हर नज्म, तेरा हर गीत हैं याद मुझे.’

 

Web Title: The song is lost ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.