दुखऱ्या जिवांना पोटाशी घेणारी ‘बिडी बिडी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2025 07:43 IST2025-03-03T07:43:01+5:302025-03-03T07:43:53+5:30
आणि हा दिलासा त्याच्या आयुष्यात आणला आफ्रिकेतली सगळ्यात मोठी निर्वासितांची छावणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बिडी बिडी’ या केंद्रातल्या ‘परफॉर्मिंग आर्ट सेंटर’ने!

दुखऱ्या जिवांना पोटाशी घेणारी ‘बिडी बिडी’
साऊथ सुदानमधून युगांडाच्या आश्रयाला आलेला सीझर गॉडफ्रे हा निर्वासित तरुण मुलगा अवघ्या २१ वर्षांचा आहे. त्याने लहान वयात खूप हिंसा पाहिली, अनुभवली. त्याच्या आई-वडिलांचा खून डोळ्यांनी पाहिला. ‘माझ्या समाजातल्या लोकांच्या मते, मी पुरता वाया गेलो होतो. सिगारेट्स ओढायचो. दारू प्यायचो. उपद्रवी होतो. नंतर माझ्या आयुष्यात म्युझिक आलं आणि मी बदललो, मी गातो तेव्हा मी सगळं विसरतो,’ असं हा मुलगा सांगतो तेव्हा ती त्याची एकट्याची नाही तर त्याच्यासारख्या अनेक निर्वासितांची प्रातिनिधिक गोष्ट असते. आणि हा दिलासा त्याच्या आयुष्यात आणला आफ्रिकेतली सगळ्यात मोठी निर्वासितांची छावणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बिडी बिडी’ या केंद्रातल्या ‘परफॉर्मिंग आर्ट सेंटर’ने!
युगांडा हा पूर्व आफ्रिकेत वसलेला छोटासा देश. हा देश खासकरून तिथल्या वन्यजीव समृद्धीसाठी ओळखला जात असला तरी अलीकडच्या काळात नागरी युद्ध आणि दहशतवादी, गुन्हेगारी कारवायांसाठीही युगांडा कुप्रसिद्ध आहे. युगांडाची आणखी एक ओळख मोठी ठसठशीत आहे. आफ्रिकेतील सर्वाधिक निर्वासितांचं वास्तव्य सध्या युगांडामध्ये आहे. आफ्रिकेतली सगळ्यात मोठी निर्वासितांची छावणी म्हणून ओळखलं जाणारं ‘बिडी बिडी’ हे केंद्र अनेक कारणांसाठी महत्त्वाचं आहे. याच बिडी बिडीमध्ये एक ‘परफॉर्मिंग आर्ट सेंटर’ आहे. निर्वासितांच्या आयुष्यातले घाव भरून काढण्यासाठी आर्ट थेरपी हे सेंटर देतं.
या केंद्राच्या परिसरात आपल्याला एखादं वाद्य वाजवण्याची संधी मिळावी किंवा गाणं रेकॉर्ड करायला मिळावं, या अपेक्षेने तरुण-तरुणी जमतात. इथलं भलंमोठं अंजिराचं झाड हा या सगळ्यांचा हक्काचा आसरा. या झाडाखाली जमायचं आणि नाचायचं, गाणी म्हणायची हा इथे येणाऱ्यांचा शिरस्ता. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोहून युगांडात संगीत शिकवण्यासाठी आलेले एडवर्ड बायेंबा स्वतः एक निर्वासित आहेत. सीझर गॉडफ्रे हा त्यांचाच शिष्य. २०२२ मध्ये या सेंटरचं काम सुरू झालं.
युगांडामध्ये सुमारे १.७ मिलियन निर्वासित आहेत. त्यांपैकी ७५ टक्के महिला आणि मुलं आहेत. त्यापैकी २५ टक्के निर्वासितांचं वय १५-२४ दरम्यान आहे.
निर्वासित लोकसंख्येपैकी सुमारे ५३ टक्के लोकसंख्या १८ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. युगांडामध्ये निर्वासितांसाठी मुक्तद्वार धोरण आहे. सुदान, साऊथ सुदान, बुरुंडी, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशांमधले बहुतेक निर्वासित इथे येतात. युगांडामध्ये त्यांना आरोग्य आणि शिक्षणाच्या पायाभूत सुविधा मिळतात. ते तिथे काम करू शकतात आणि सहज कोणत्याही निर्बंधांशिवाय वावरू शकतात. निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी संगीत आणि मनोरंजन ही माध्यमं वापरण्याच्या उद्देशाने सिना लोकेता ही स्वयंसेवी संस्था, टू फाउंडेशन ही स्वीस सामाजिक संस्था आणि प्लेयिंग फॉर चेंज फाउंडेशनच्या पाठबळावर हे बिडी बिडी परफॉर्मिंग आर्ट सेंटर कार्यरत आहे.
इथे येणारे निर्वासित कमी वयातच बरंच काही बघून, सोसून आले आहेत. त्यांच्या मनावर झालेल्या आघातांचे घाव कमी करण्यासाठी, समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी संगीत आणि नृत्य यांचा वापर केला जातो.