फुग्यांना कचरा बांधा, शेजाऱ्यावर ‘बॉम्ब’ फेका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 09:39 AM2024-06-11T09:39:25+5:302024-06-11T09:39:49+5:30

South Korea Vs North Korea: दक्षिण कोरियाची राजधानी सोलहून आलेली ही बातमी पाहा. किम जोंग ऊन यांच्या उत्तर कोरियाने ६०० मोठ्या फुग्यांच्या मदतीने आपल्या देशातला कचरा शेजारच्या दक्षिण कोरियात नेऊन टाकला. या दोन शेजारी देशांमध्ये जन्मापासूनचे हाडवैर आहेच. आता उत्तर कोरियाची ही आगळीक कचरा बांधलेले फुगे शेजारी देशात पाठवण्यापर्यंत पोहोचली आहे. 

South Korea Vs North Korea: Tie trash to balloons, throw 'bombs' at neighbors | फुग्यांना कचरा बांधा, शेजाऱ्यावर ‘बॉम्ब’ फेका

फुग्यांना कचरा बांधा, शेजाऱ्यावर ‘बॉम्ब’ फेका

कचरा ही एक जागतिक समस्या असून, तिला आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक असे अनेक कंगोरे आहेत. ओला, सुका, जैविक, अशी त्याची वर्गीकरणे केली जातात. आता तर ई-कचऱ्याचा डोंगर पृथ्वीच्या डोक्यावर उभा राहू पाहतो आहे. एकुणातच विविध तऱ्हेच्या कचऱ्याचे करायचे काय? या प्रश्नावर जगभर डोकेफोड चाललेली असते. माणसाने समुद्रात कचरा टाकला, हिमालय घाण केला, नद्या तर कधीच प्रदूषित झाल्या आहेत. आश्चर्य वाटेल; पण आता  कचरा विघटन करून त्यातून वेगळी उत्पादने तयार करण्याचा नवा उद्योग बहरात येत असून, त्यासाठी कचरा विकणारे आणि विकत घेणारेही असतात!  पण सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचलित असलेला स्वच्छतेचा  एक सोपा उपाय म्हणजे आपल्या घरातला कचरा उचलून शेजारच्याच्या घरात टाकणे. हा मार्गही जगभर अवलंबिला जातो, असे दिसते.

दक्षिण कोरियाची राजधानी सोलहून आलेली ही बातमी पाहा. किम जोंग ऊन यांच्या उत्तर कोरियाने ६०० मोठ्या फुग्यांच्या मदतीने आपल्या देशातला कचरा शेजारच्या दक्षिण कोरियात नेऊन टाकला. या दोन शेजारी देशांमध्ये जन्मापासूनचे हाडवैर आहेच. त्यात किम जोंग यांना ऊठसूट क्षेपणास्त्रे डागण्याची आणि जगाला युद्धाच्या धमक्या देण्याची खुमखुमी फार. शेजारी दक्षिण कोरियाच्या कुरापती काढल्याशिवाय तर या हुकूमशहाला चैनच पडत नाही. शस्त्रांनी लढण्याची भाषा नेहमीचीच, आता उत्तर कोरियाची ही आगळीक कचरा बांधलेले फुगे शेजारी देशात पाठवण्यापर्यंत पोहोचली आहे. 

गेले काही दिवस उत्तर कोरियाचा हा उद्योग चालला आहे. सिगारेटची थोटके, प्लास्टिक, वापरलेले टॉयलेट पेपर्स असा कचरा घेऊन आलेले बलुन्स पंधरा दिवसांपूर्वीच्या संध्याकाळी  ८ च्या सुमारास दक्षिण कोरियाच्या आकाशात दिसू लागले. हे नेमके काय असावे याबाबत त्या देशात लगेच काळजीचे वातावरण तयार झाले. हे कचऱ्याच्या पिशव्या लटकवलेले  फुगे असल्याचे कळल्यावर साहजिकच दक्षिण कोरियाचा संताप अनावर झाला. ’आम्ही हे खपवून घेणार नाही’ असा दम मग तिथल्या लष्कराने शेजाऱ्यांना दिला आहे.

थोडेथोडके नव्हे, तब्बल सहाशेच्या वर फुग्यांनी दक्षिण कोरियाची  राजधानी सोलपासून दोनशे किलोमीटरच्या परिघात हा कचरा फेकला गेला आहे. आतापर्यंत त्यात घातक काही सापडले नसले तरी लोकांनी त्यापासून दूर राहावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

उत्तर कोरिया आपल्या शत्रूंच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागत होता तेव्हा संयुक्त राष्ट्रांनी हरकत घेतली. आता या कचरा बॉम्बचे काय करायचे?- या प्रश्नाने जागतिक धुरिणांना अस्वस्थ केले आहे. उत्तर कोरिया अनाकलनीय वागतो म्हणावे तर ‘तुम्ही आजवर निषेध खलित्यांचे फुगे पाठवत होतात त्याला हा आमचा प्रतिसाद’ असा खुलासा त्या देशाकडून करण्यात आला आहे. सुमारे १५ टन कचरा फेकून झाल्यावर आम्ही ही कारवाई तूर्त थांबवत आहोत असेही उत्तर  कोरियाने म्हटले; पण गेल्या रविवारी पुन्हा  कचऱ्याच्या पिशव्या लटकवलेले सुमारे साडेतीनशे फुगे सोलच्या आकाशात तरंगत आलेच. सोलचे महापौर ओ सी ऊन या कचरा युद्धाने आता भलतेच चिडले आहेत. ‘हा  शेजारी देशाने आमच्या सभ्यतेवर केलेला  नीच हल्ला आहे ‘ अशी एक फेसबुक पोस्ट त्यांनी लिहिली आहे.

१९५३ साली या दोन्ही कोरियांमध्ये युद्ध झाले तेव्हापासून. ते एकमेकांचे कट्टर वैरी झालेले असून, दोघांत तांत्रिक अर्थाने सततचे  युद्ध चाललेलेच आहे. उत्तर कोरिया अनेक अर्थाने  जगापासून तुटलेला आहे. तटबंदी इतकी, की जगभरातली वार्ता त्या देशात पोहोचत नाही आणि  त्या देशात काय चालले आहे, हे अजिबात बाहेर येत नाही. उत्तर कोरियाचे चीनशी संबंध सुधारल्यानंतर या देशातले निर्बंध थोडेबहुत नरमले होते. जगभरात वादळाप्रमाणे घोंगावत असलेल्या दक्षिण कोरियाच्या पॉप कल्चरला किम जोंग यांच्या देशात काही प्रमाणात प्रवेश देण्यात आला होता; परंतु ते तेवढ्यापुरतेच राहिले, नंतर संबंध पुन्हा बिघडले. युद्धात सारे माफ असते म्हणतात. आता कचरा युद्धालाही ते लागू करायचे का?, असा नामी प्रश्न समोर येतो आहे खरा.

सीमेवर लाउडस्पीकर्स
 हे कचरा प्रकरण सुरु झाल्यावर त्याला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण कोरियाने काय करावे ? आपल्या शेजाऱ्याचा हा विचित्र उच्छाद थांबावा, निदान त्यांना जरब बसावी, किमान आपल्या कृत्याची लाज वाटावी म्हणून दक्षिण कोरियाने सीमेवर बसवलेल्या मोठ्या लाउडस्पीकर्समधून शांतता, आशा आणि प्रेमाचे ‘संदेश’ देणे सुरू केले आहे. दिवसरात्र हे सीमेवरचे भोंगे पलीकडच्या नागरिकांना प्रेमाचे संदेश देत् असतात. या नव्याच  उपद्रवाने आता उत्तर कोरियाच्या सीमावर्ती नागरिकांचे कान किटले आहेत, म्हणतात!

Web Title: South Korea Vs North Korea: Tie trash to balloons, throw 'bombs' at neighbors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.