भाजपाचं चुकतंय; उत्पल पर्रिकरांना तिकीट नाकारणं हा आगीशी खेळ, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 09:25 AM2022-01-19T09:25:26+5:302022-01-19T09:25:49+5:30
Goa Election 2022 : मनोहर पर्रीकर म्हणजे केवळ नाव नव्हे तर ते अजून देखील गोमंतकीयांचा श्वास आहेत अशा प्रकारचा अनुभव गेले काही दिवस गोव्याला येत आहे.
मनोहर पर्रीकर म्हणजे केवळ नाव नव्हे तर ते अजून देखील गोमंतकीयांचा श्वास आहेत अशा प्रकारचा अनुभव गेले काही दिवस गोव्याला येत आहे. सोशल मीडियावर भाजप समर्थकांचीच आणि भाजप कार्यकर्त्यांचीच जी चर्चा चाललीय, त्यावरून कळून येते, की पर्रीकर यांच्या मुलाला दुखवले गेल्यास पूर्ण गोव्यात आज देखील पर्रीकर समर्थकांना जखम होते. वेदना होते. पणजीत तर कार्यकर्ते जास्त जखमी होतात हे गेल्या काही दिवसांतील वाद-संवादातून अनुभवास आले. केवळ मनोहर पर्रीकर यांचा मुलगा आहे म्हणून तिकीट देता येणार नाही अशा अर्थाचे विधान देवेंद्र फडणवीस यांनी करायला नको होते, असे राज्यभरातील पर्रीकर समर्थकांना व कार्यकर्त्यांना वाटले.
अर्थात जे झाले ते झाले, पण भाजपने आणखी आगीशी खेळण्याचा प्रयत्न करू नये. उत्पलना तिकीट नाकारणे हा आगीशी खेळ ठरतोय एवढ्या टप्प्यावर आता वाद आलेला आहे. उत्पलने आपण पणजीत अपक्ष राहाण्याचा निर्धार करत थेट रिंगणात उडीच टाकली आहे. एकूण काय तर आता होमखण पेटलेले आहे. त्यात भाजपमधील निष्ठावान व पर्रीकर समर्थक स्वत:ची बाजी लावायला सिद्ध होऊ लागले आहेत.
कधी कधी नियती कोणती स्थिती आणून ठेवते ते बघा. पणजीत बाबूश मोन्सेरात नको म्हणून काही वर्षांपूर्वी भाजपचे काही पदाधिकारी व काही नगरसेवक मोन्सेरात समर्थकांची डोकी फोडण्यासाठी सरसावले होते. त्यांचे हात शिवशिवत होते. मात्र आता तोच भाजप पणजीत आम्हाला बाबूशच हवा व पर्रीकरांचा पुत्र नको अशी भूमिका घेतो. उत्पलचे समर्थन जे करतात त्यांची डोकी फोडण्यासाठी आता भाजपमधील काहीजणांचे हात शिवशिवू लागले आहेत. हा संघर्ष वाढणार आहे. कारण उत्पल माघार घेणार नाही हे स्पष्ट झाले आहे. भाजपने बाबूशला पणजीत तिकीट पक्के केले, कारण ते विद्यमान आमदार आहेत.
बाबूशच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात यांना ताळगावमध्ये तिकीट निश्चित केले गेले. जेनिफरला तिकीट नाकारण्याचा प्रश्न येतही नाही. सांताक्रुझ मतदारसंघात बाबूशचा उजवा हात मानले जाणारे आग्नेल जर तिकीट मिळवू शकले तर बाबूशचे भाजपमधील वजन प्रचंड वाढलेय हे स्पष्ट होईल. तूर्त काँग्रेसचे रुडॉल्फ फर्नांडिस हे सांताक्रुझमध्ये पुढे आहेत असे भाजपला वाटते. बाबूशला आणि भाजपला कोणत्याच स्थितीत तिथे रुडॉल्फ जिंकलेले नको आहेत. त्यामुळे आग्नेलना तिकीट मिळू शकते.
एकूण काय तर सर्वांना भाजप तिकीट देतो पण पर्रीकरच्या मुलाला देण्यासाठी भाजपकडे सध्या तिकीट नाही. उत्पलविषयी भाजपला चिंता आहे, त्यांच्या भविष्याविषयी भाजप विचार करतोय हे देवेंद्र फडणवीस यांचे विधान दिलासादायक आहे. फडणवीस यांची ही भूमिका स्वागतार्हही आहे. स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे महत्त्व व स्थान लक्षात घेऊन फडणवीस यांनी हे विधान केले. मात्र उत्पल पणजीतून लढू पाहतात याची कल्पना भाजपला गेली दोन वर्षे तरी निश्चितच होती. पर्रीकर यांच्या निधनानंतर सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना भाजपने तिकीट दिले होते, त्यावेळीही उत्पल लढण्यासाठी इच्छुक होते. वास्तविक भाजपने त्यावेळी तिकीट दिले नाही तरी, उत्पलला पक्षात सतत प्रोत्साहन देण्याचे काम करता आले असते. मात्र भाजपने उत्पलला वाळीतच टाकले होते. प्रोत्साहन देणे दूरच राहिले. यात केंद्रीय नेत्यांचा किंवा फडणवीस यांचा मुळीच दोष नाही.
भाजपच्या स्थानिक शाखेनेच उत्पलला कायम राजकीयदृष्ट्या अस्पृश्य ठेवल्याने उत्पल जखमी झाला. त्यातूनच आता तो चिवटपणे पणजीत लढण्यासाठी इरेला पेटला. उत्पलचे समर्थक हे मनोहर पर्रीकर यांचे खरे कार्यकर्ते आहेत. ते कार्यकर्ते आता नव्याने पणजीत घाम गाळत आहेत. एक पर्रीकर गेला, दुसरा पर्रीकर तयार होतोय याचे हे शुभसंकेत म्हणायचे की काय हे शेवटी मतदार ठरवील. त्याविषयीचा निष्कर्ष आताच काढता येणार नाही. मात्र पणजीत भावनिक वातावरण तयार झाले आहे. उत्पल जर यापुढे मतदारांना भावनिक साद घालू लागेल तर राज्यभर वणवा पेटू शकतो. शिवसेनेचे संजय राऊत वगैरैंच्या विधानांना काही अर्थ नाही. ते त्यांचे राजकारण खेळत आहेत. पण उत्पल हा गंभीरपणे यावेळी राजकारण खेळत आहे. मनोहर पर्रीकर यांच्या मुलाला तुम्ही जखमी करता म्हणजे आम्हालाच वेदना देता अशी भावना राज्यभरातील पर्रीकर समर्थकांची होऊ लागलीय. यातून एक वेगळाच उठाव राज्यात होऊ शकतो.