चांदोमामाच्या गावाला जाऊ या... चंद्रावरच्या घरात राहण्यासाठी रांगा; पर्यटनात ‘मूनवॉक’ची ऑफर

By Devendra Darda | Published: September 28, 2021 08:27 AM2021-09-28T08:27:31+5:302021-09-28T08:29:27+5:30

सर्वसामान्य लोकांनाही चंद्रावर फिरायला जाता यावं यासाठी नासानंही पुढाकार घेतला आहे. त्यासाठीचं तंत्रज्ञान तयार करण्यासाठी विविध कंपन्यांना त्यांनी प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आहे.

spacial artical on people are ready to go for travel on moon nasa and other companies planning | चांदोमामाच्या गावाला जाऊ या... चंद्रावरच्या घरात राहण्यासाठी रांगा; पर्यटनात ‘मूनवॉक’ची ऑफर

चांदोमामाच्या गावाला जाऊ या... चंद्रावरच्या घरात राहण्यासाठी रांगा; पर्यटनात ‘मूनवॉक’ची ऑफर

Next

>> देवेंद्र दर्डा, मॅनेजिंग डायरेक्टर, लोकमत

जगभरातील पर्यटन अनेक दिवस बंद असताना, आता पर्यटनासाठी इतकी दारं खुली होऊ लागली आहेत की, लोकं अंतराळातही सैर करायला लागले आहेत. एवढंच नाही, त्यासाठी लोकांमध्ये आणि त्याहीपेक्षा विविध कंपन्यांमध्ये आता स्पर्धा सुरू झाली आहे. अंतराळ प्रवास सुरू झालाच आहे, येत्या तीन-चार वर्षांतच ‘सर्वसामान्य’ पर्यटक आता चंद्रावरही गेलेले आपल्याला दिसतील, तिथे ते ‘घर’ करतील आणि राहतीलही! 

‘स्पेस एक्स’ या कंपनीचे संस्थापक एलन मस्क आणि ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ या कंपन्यांनी काही नागरिकांना नुकतीच अंतराळ सैर घडवून आणली. आणखीही काही कंपन्या या स्पर्धेत आहेत, पण अंतराळ पर्यटनाचं नावीन्य अजूनही ताजं असताना लोकांना आता ओढ लागली आहे ती चांद्र पर्यटनाची. आतापर्यंत काही संशोधक चंद्रावर जाऊन आले आहेत, पण आजवर एकही सर्वसामान्य माणूस चंद्रावर जाऊन आलेला नाही. मात्र त्यांना चंद्रावर घेऊन जाण्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. अंतराळातला आणि चंद्रावरचा प्रवास ही केवळ संशोधकांचीच मक्तेदारी आता राहिलेली नाही. ज्याच्याजवळ पैसा आहे, खिसा बक्कळ भरलेला आहे, असा कोणताही ‘सर्वसामान्य’ माणूस आता अवकाशात, चंद्रावर जाऊ शकतो.  चंद्रावर जाण्यासाठी आपला ‘पहिला’ नंबर लागावा, यासाठी काही लोकांनी तर आतापासूनच ‘नंबर’ लावून ठेवला आहे. ज्या क्षणी सर्वसामान्य माणसाला चांद्र पर्यटनाचा पर्याय खुला होईल, तेव्हा आपल्यालाच तो मान प्रथम मिळावा, यासाठीही लोकांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. त्यासाठी कितीही पैसा मोजायची त्यांची तयारी आहे. एलन मस्क यांच्या स्पेस एक्स या कंपनीकडे तर आठ प्रवाशांनी चांद्र पर्यटनासाठी कधीचीच नोंदणी करून ठेवली आहे. आणखीही अनेक पर्यटक त्यासाठी  तयार आहेत. 

सर्वसामान्य लोकांनाही चंद्रावर फिरायला जाता यावं यासाठी नासानंही पुढाकार घेतला आहे. त्यासाठीचं तंत्रज्ञान तयार करण्यासाठी विविध कंपन्यांना त्यांनी प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आहे. एवढंच नव्हे, त्यासाठी नासानं पाच कंपन्यांबरोबर करार केला असून एलन मस्क आणि जेफ बेझोस यांच्या कंपन्यांचाही त्यात समावेश आहे. सर्वच गोष्टी नासा स्वत: करू शकत नाही, त्यामुळे अंतराळात जाण्यासाठीचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी खासगी कंपन्यांना ते पुढे आणीत आहेत. त्यासाठीचं तांत्रिक सहकार्यही नासानं देऊ केलं आहे. 

‘स्पेस एक्स’ आणि ‘ब्लू ओरिजिन’ या कंपन्यांसह इतरही तिन्ही कंपन्या यासाठी कंबर कसून तयारीला लागल्या आहेत. चंद्रावर माणसाला सहजपणे उतरता यावं यासाठीचं ‘लॅण्डर’ तयार करण्याचं त्यांचं काम आता युद्धपातळीवर सुरू आहे.  या पाचही कंपन्यांशी करार करताना  केवळ तांत्रिक सहकार्यच नाही, तर भरभक्कम पैसाही नासा त्यांना देणार आहे. या करारानुसार नासा त्यांना १४ कोटी ६१ लाख डॉलर्सची रक्कम (सुमारे १०७८ कोटी रुपये) मोजणार आहे. कुठल्याही परिस्थितीत चांद्र पर्यटनाची ही योजना पहिल्याच प्रयत्नात यशस्वी व्हावी, यासाठी नासा प्रयत्नशील आहे. या माेहिमेला नासानं ‘अर्टेमिस मिशन’ असं नाव दिलं आहे. 

या मिशनमागे नासाचा आणखी एक महत्त्वाचा हेतु आहे. तो म्हणजे या चांद्र पर्यटनाद्वारे नासा जगातील पहिली सर्वसामान्य महिला आणि जगातील पहिला अश्वेत पुरुष चंद्रावर पाठवणार आहे. या मोहिमेतून समानतेचा एक उदात्त संदेशही नासा देऊ पाहत आहे. यासंदर्भात नासाच्या ‘ह्युमन लँडिंग सिस्टीम प्रोग्राम मॅनेजर’ लिसा वॉटसन मॉर्गन म्हणतात, या कराराचा उद्देश पुढील पिढ्यांसाठी चंद्राचे नवीन क्षेत्र खुले करण्यासाठी मजबूत नवीन अर्थव्यवस्था विकसित करणे हा आहे. 

चंद्रावर ‘घरं बांधतानाच’ नवे रोवर तयार करणं आणि चंद्रावर नवी पॉवर सिस्टीम विकसित करण्याचाही प्रयत्न या मोहिमेतून केला जाणार आहे. एका कॅप्सूलमधून एकावेळी चार जणांना चंद्रावर पाठविण्याची योजना असून त्यासाठी वीस कोटी ३२ लाख डॉलर्स  खर्च येण्याची शक्यता आहे, असं नासाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. 

चंद्रावर मानवाचं पहिलं पाऊल पडण्यासाठी खूप काळ जावा लागला, अनेक देशांनी त्यासाठी अविरत प्रयत्न केले. त्यानंतरही ते प्रमाण कमीच होतं, पण येत्या काही काळांत मात्र चंद्रावर जाण्यासाठी आणि राहण्यासाठी लोकांची रीघ लागेल, हे स्पष्ट दिसतं आहे. 

पर्यटनात ‘मूनवॉक’चाही समावेश!

अंतराळ पर्यटनापेक्षा चांद्र पर्यटनाचा खर्च अधिक असेल असं म्हटलं जात आहे. नुकत्याच अंतराळात गेलेल्या प्रत्येक प्रवाशामागे सुमारे साडेपाच कोटी डॉलर्स  खर्च आल्याचा अंदाज आहे. नासाच्या सहकार्यानं ‘स्पेस एक्स’ ही कंपनी स्टारशिप रॉकेट विकसित करीत आहे. त्यासाठी नासानं ‘स्पेस एक्स’ला २८५ कोटी डॉलर्स  देऊ केले आहेत. ‘मूनवॉक’साठीची व्यवस्थाही त्यात करण्यात येणार आहे. जे पहिले चार जण चंद्रावर जातील, त्यातील दोघांना चंद्रावर उतरून ‘मूनवॉक’ करण्याची संधी मिळेल. एक आठवड्यानंतर ते परत पृथ्वीवर येतील.

Web Title: spacial artical on people are ready to go for travel on moon nasa and other companies planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.