भारताच्या हिमतीमुळे अख्खे जग अचंबित
By विजय दर्डा | Published: December 13, 2021 08:16 AM2021-12-13T08:16:02+5:302021-12-13T08:16:45+5:30
रशियाबरोबर अत्याधुनिक एस-४०० सह लष्करी खरेदी-करार करून भारताने जगाला उच्चरवाने सांगितले, कुणीही आमच्यावर दबाव आणू शकत नाही!
विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन भारतात येण्याच्या केवळ ३६ तास आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तराखंडात विकासकामाचा प्रारंभ झाला. ‘भारत कोणाच्याही दबावाखाली येत नाही’ असे मोदी या वेळी म्हणाले. त्यातून निघणारा अर्थ अगदी स्पष्ट होता. डेहराडूनमध्ये जे बोलले गेले त्याचा रोख अमेरिकेकडे होता हे समजणाऱ्यांना समजले. गोष्ट इतक्या सफाईदारपणे केली गेली की अमेरिका त्यावर काही प्रतिक्रियाही देण्याच्या स्थितीत नव्हती.
खरे तर अमेरिका, भारत आणि रशिया यांच्यातील संरक्षण-त्रिकोणात एक यंत्रणा फसली होती; तिचे नाव आहे एस-४००. रशियात तयार झालेली ही यंत्रणा अमेरिकेच्या पेट्रीयट या उत्तम हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणेइतकीच सक्षम आहे. ही यंत्रणा क्रूज, बॅलिस्टिक क्षेपणास्त्राबरोबर हायपरसोनिक शस्त्रेही नष्ट करू शकते. जमिनीव्यतिरिक्त नौदलाच्या फिरत्या फलाटावरूनही ते सोडता येते. चीनने ते रशियाकडून खरेदी केले आहे आणि रशियाने ते दुसऱ्या देशाला विकावे असे अमेरिकेला वाटत नाही. त्यासाठी त्यांनी कायदेही करून ठेवले आहेत. गतवर्षी त्यांनी याच कायद्यांचा वापर करून तुर्कस्तानवर निर्बंध लावले. ३५ लढाऊ विमानांचा सौदा रद्द केला. अमेरिकेशी भारताची सलगी वाढत असल्याने पुतीन यांच्या जेमतेम ६ तासांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु भारताने त्यांचे पाय भूमीला लागण्यापूर्वीच संदेश दिला की तुम्ही भरवशाचे मित्र आहात आणि राहाल. आम्हाला कोणाचीही चिंता नाही.
रशियाने भारताला कायम प्रत्येक संकटात मदत केली आहे. आपण शस्त्रांचे ८० टक्के सुटे भाग रशियाकडून घेतो. रशियाचीच लढाऊ विमाने वापरतो. रशियाच्या मदतीने ए के २०३ रायफलींचा कारखाना लवकरच भारतात सुरू होणार आहे. एकीकडे रशिया खूश आणि अमेरिका काही प्रतिक्रियाही व्यक्त करू शकली नाही, हे भारताने कसे घडवले? असा प्रश्न आता जगाला पडलाय. तुर्कस्तानप्रमाणे भारतावर अमेरिका निर्बंध लावू पाहील तर तिला अडचणींना सामोरे जावे लागेल. चीनविरुद्धच्या प्रत्येक पावलावर आपल्याला भारताची गरज पडेल हे अमेरिकेला माहीत आहे. पाकिस्तान पूर्णत: चीनच्या मांडीवर जाऊन बसल्याने आता उपयोगाचा राहिलेला नाही. गेल्या महिन्यात अमेरिकेने ११० देशांची लोकशाही शिखर बैठक बोलावली होती. चीनच्या सांगण्यावरून पाकिस्तान बैठकीला गेला नाही.
आजच्या घडीला भारत एक सशक्त देश आहे हे अमेरिकेला समजते. भारतीय तरुणांची छाप साऱ्या जगावर पडते आहे. श्रेष्ठतम अमेरिकी कंपन्यांत भारतीय मुख्य अधिकारी आहेत. हिंदी महासागरात चीनला अडवायचे तर भारताशिवाय ते अशक्यच! अशा स्थितीत भारताशी मैत्री राखण्याशिवाय अमेरिकेला पर्याय नाही. गेल्या १५ वर्षांत भारताने अमेरिकेबरोबर शस्त्रखरेदीचे अनेक करार केले आहेत.
अमेरिकेशी भारताची मैत्री वाढताच रशियानेही नाराजी दर्शवली. भारताने अमेरिकेच्या छावणीत जाऊ नये असा प्रयत्नही झाला. भारत, अमेरिका,जपान आणि ऑस्ट्रेलियासमवेत क्वाड गटात सामील झाला, यावरही चीनशी मैत्री वाढवणारा रशिया नाराज झाला. इंडो पॅसिफिक क्षेत्रात भारत पश्चिमी देशांच्या चीनविरोधी नीतीचा एक मोहरा झालाय, अशी टीका रशियाचे विदेशमंत्री सर्जी लावरोव्ह यांनी केली. रशियन अधिकाऱ्यांनी भारताचे संरक्षण सल्लागार अजित डोवाल, विदेशमंत्री जयशंकर, विदेश सचिव हर्षवर्धन शृंगला यांच्याजवळ हा विषय काढला. मात्र भारताकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही. रशियाने अफगाणिस्तानविषयक बैठकात प्रारंभी भारताला बोलावले नाही, पण भारताने जाणीव करून दिली की आमच्याशिवाय या प्रश्नावर तोडगा काढता येणार नाही.
जगात गट तयार होतात, मोडतात. अलिप्तता चळवळीचा पाया घालणाऱ्या नेहरू यांच्या काळापासून कोणत्याच गटात सामील व्हायचे नाही, भारताचे हे धोरण राहिले आहे. भारतात सरकार कोणत्याही पक्षाचे असो, कोणीही पंतप्रधान असो, सर्वांनी देशहित सर्वोच्च मानले. त्यानुसार धोरणे आखली.माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी मला सांगितलेल्या एका घटनेची आठवण होते. गुजराल हे रशियात भारताचे राजदूत असतानाची ही घटना. मोरारजीभाई देसाई पंतप्रधानपदी येताच आपल्या पदाचा राजीनामा देऊन गुजराल दिल्लीला परतले. मोरारजींना भेटायला गेले तेव्हा त्यांनी राजीनाम्याचे कारण विचारले. गुजराल म्हणाले, "आपली अमेरिकाधार्जिणी भूमिका मला माहिती आहे, म्हणून मी राजीनामा देणेच उचित!" मोरारजींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. काही काळातच मोरारजीभाईंच्या सरकारने रशियाबरोबर महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.भारताच्या संकटकाळात लाल सडका गहू देऊन अमेरिकेने भारताचा अपमान केला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पत्र लिहून तो गहू परत पाठवला होता. ‘आमच्याकडे जनावरेही हा खात नाहीत. तुमच्याकडे माणसे खात असतील तर त्यांना खाऊ द्या,’ असे त्यांनी पत्रात म्हटले होते.
भारताने आपल्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर कळस चढवला आहे. कोणी भारताकडे नजर वर करून पाहण्याची हिम्मत करणार नाही, कारण आपण आपली ताकद ओळखून आहोत. कोणी आपल्याला वाकवू शकत नाही... सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा!
vijaydarda@lokmat.com