तरुण मुलांना सांगा, ‘बोल, के लब आजाद हैं तेरे’...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 08:48 AM2022-05-06T08:48:06+5:302022-05-06T08:48:28+5:30

फैज अहमद फैज यांनी लिहिलेल्या कवितांवरचे दोन उतारे अभ्यासक्रमातून काढून टाकणे हे कशाचे निदर्शन आहे? विचार मोकळा हवा, निवडीचे स्वातंत्र्य तर हवेच हवे.

spacial article on central board cbse two poems removed democratic politics freedom | तरुण मुलांना सांगा, ‘बोल, के लब आजाद हैं तेरे’...

तरुण मुलांना सांगा, ‘बोल, के लब आजाद हैं तेरे’...

Next

पवन वर्मा,
राजकीय विषयाचे विश्लेषक

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) प्रसिद्ध उर्दू कवी फैज अहमद फैज यांनी लिहिलेल्या कवितांवरचे दोन उतारे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमातून काढून टाकले. ‘डेमोक्रेटिक पॉलिटिक्स’ या एनसीईआरटीच्या दहावीच्या पुस्तकात ‘धर्म, जातीयता आणि राजकारण’ या शीर्षकाचा पाठ गेल्या दशकभरापासून आहे. उतारे का वगळण्यात आले, याचे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. शालेय अभ्यासक्रमाचा आशय तपासून पाहण्याचा अधिकार त्या क्षेत्रातील अधिकाऱ्यांना असतो, हे मान्यच! काही वेळा ते गरजेचेही असते. आपला शैक्षणिक आशय अजूनही बराचसा वसाहतकाळात अडकलेला आहे. देशाची लक्षणीय ऐतिहासिक विविधता त्यातून प्रतिबिंबित होत नाही. 

- अर्थात, हे खरे असले तर फैज यांच्या लेखनाला कात्री का लावली, हा प्रश्न उरतोच. ते काय सामान्य कवी होते? देशद्रोही होते? धर्मांध होते? - या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे ठाम नकार! फैज उर्दूतील महान कवी होते. त्यांच्या गझला आणि कविता भारत- पाकिस्तानातच काय, पण जगभर प्रसिद्ध  आहेत. साहित्याच्या नोबेल पुरस्कारासाठी त्यांचे नामांकन झाले होते आणि शांततेचा लेनिन पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. ते लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या राजवटीच्या विरुद्ध होते. पाकिस्तानातील लष्करी हुकूमशहांविरुद्ध ते लढले. ‘बोल के लब आजाद हैं तेरे’ किंवा ‘हम देखेंगे’ या त्यांच्या गाजलेल्या रचनांनी न्याय आणि स्वातंत्र्य मागणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. 

- पण मग केवळ फैजसाहेब पाकिस्तानी आहेत म्हणून उतारा वगळला गेला का? त्या देशाशी आपले राजकीय आणि लष्करी संबंध गंभीर स्वरूपात बिघडलेले आहेत हे खरे. या शेजाऱ्याशी आपले दोनदा युद्धही झाले आहे. तरीही यावरून सांस्कृतिक मुद्दे आणि लोकातला संवाद ओलीस ठेवावा का? आपण त्या देशाशी क्रिकेट सामने खेळतो. ते पाहायला अलोट गर्दी जमते. त्यांचा आपला सांस्कृतिक वारसा पुष्कळसा एक आहे. आपले सिनेमे तिकडे मोठी गर्दी खेचतात. मोहंजोदारो आणि हराप्पा पाकिस्तानात आहे. आपल्या पाठ्यपुस्तकातून सिंधू संस्कृतीचा भाग वगळणार का? तक्षशीला हे प्रसिद्ध प्राचीन विद्यापीठ पाकिस्तानात आहे. ते ज्याचे प्रतीक ते सर्व शहाणपण आपण अडवायचे का? ब्रिटिशांनी भारत जिंकला आणि लुटला. इतिहास पुसता येत नसेल तर बदला म्हणून आपण शेक्सपिअरवर बंदी घालायची का? संस्कृती आणि सर्जनशीलता राजकीय सीमा आणि इतिहासाच्या स्मृतीपलीकडे जाते, हे आपण कधी ध्यानी घेणार? सध्या सत्तेवर असणाऱ्यांच्या मनात उर्दूविषयी आकस आहे का?

- कदाचित! पण उर्दूला इस्लामशी जोडणे अशिक्षित अतिउजव्या हिंदू मूलतत्त्ववाद्यांच्या घातक मूर्खपणाचे लक्षण होय. उर्दू भारतीय भाषा असून, पाकिस्तानातही बोलली जाते. अतिशय उदात्त विचारांचा ठेवा तसेच नजाकतीचे भावप्रकटन या भाषेत आहे. ते एका धर्माशी जोडणे हा सांस्कृतिक अडाणीपणा होईल. फैजसाहेब फाळणीमुळे पाकिस्तानी होणार असतील तर मिर्झा गालिब, मोमीन झक, मुन्शी प्रेमचंद, गुलजार, जावेद अख्तर, (ही काही नावे झाली) यांचे काय करायचे? हे सगळे उर्दूतच तर लिहितात... हा वेडेपणा कोठे थांबणार आहे? हिंदू हिताची अशी संकुचित व्याख्या करणे सांस्कृतिक अडाणीपणाचे द्योतक होय. फैज याचे बळी ठरले का?

सीबीएसईने ‘डेमोक्रसी अँड डायव्हर्सिटी’ तसेच ‘चॅलेंजेस टू डेमोक्रसी’ या विषयावरची दोन प्रकरणेही अभ्यासक्रमातून काढली. - का? ती सुसंगत राहिली नाहीत का? वैविध्याचा आदर न करता लोकशाही मार्गक्रमण करू शकेल का? लोकशाहीसमोरची आव्हाने कोणती, त्यांचा सामना कसा करायचा ते तरुणांनी शिकू नये का? लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार अशी आव्हाने निर्माण करीत असेल तरी? खंडन मंडनाच्या वातावरणातच शिक्षण आणि संस्कृती चांगली वाढते. विचार मोकळा हवा, निवडीचे स्वातंत्र्य हवे. मोठ्या लेखकांचे, विचारवंतांचे संस्कार ते कुठे जन्मले याचा संबंध न आणता व्हायला हवेत. जे केवळ पायतळी पाहून चालतात आणि संकुचित विचारांच्या मर्यादेत शैक्षणिक अभ्यासक्रम बांधू पाहतात, ते महान बौद्धिक वारसा असलेल्या भारतीय संस्कृतीचे मोठे नुकसान करणार आहेत. त्यांच्या पापाची फळे भारतीय विद्यार्थांना भोगावी लागता कामा नयेत.

Web Title: spacial article on central board cbse two poems removed democratic politics freedom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.