अमुक नाही, तमुकही नाही ? नाहीच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 06:52 AM2022-09-29T06:52:51+5:302022-09-29T06:53:58+5:30

१४ सप्टेंबरपासून इराणची राजधानी तेहरान संतप्त महिला आणि पुरुषांच्या ‘हिजाब’विरुद्धच्या आंदोलनामुळे धगधगत आहे.

spacial article on gender equality countries same rules for men women iran hijab row | अमुक नाही, तमुकही नाही ? नाहीच नाही!

अमुक नाही, तमुकही नाही ? नाहीच नाही!

Next

१४ सप्टेंबरपासून इराणची राजधानी तेहरान संतप्त महिला आणि पुरुषांच्या ‘हिजाब’विरुद्धच्या आंदोलनामुळे धगधगत आहे. २२ वर्षीय महसा अमिनी या तरुणीने हिजाब घातला नाही म्हणून पोलिसांनी केलेल्या कारवाईअंतर्गत तिचा मृत्यू झाला आणि आंदोलन पेटले. अमिनीच्या मृत्यूनंतर इराणमधील महिलांवर असलेल्या निर्बंधांबाबत जगभरातून चिंता आणि हळहळ व्यक्त करण्यात येत आहे; पण महिलांवरील निर्बंध ही बाब फक्त इराणपुरतीच मर्यादित नाही. जगभरात सर्वत्र कुठल्या ना कुठल्या कारणासाठी महिलांवर निर्बंध लादले जातात. कुठे या निर्बंधांविरुद्ध स्त्रिया आवाज उठवत आहेत, कुठे महिलांच्या विरोधाच्या आवाजाला पुरुषही बळ देत आहेत तर कुठे अजूनही आपल्यावरील निर्बंधांविरुद्ध ब्र काढण्याचा अधिकारही महिलांना नाही. 

१.  महिलांवरील कडक  निर्बंधाबाबत पश्चिम आशियातील सुदान, येमेन यानंतर कतार देशाचा नंबर लागतो.  पालकांच्या परवानगीशिवाय येथील मुली परदेशात शिकायला जाऊ शकत नाही.  लग्न झालेल्या महिला बाहेरील देशात एकट्याने प्रवास करू शकतात; पण नवऱ्याला वाटल्यास तो त्यावर हरकत घेऊ शकतो आणि अशा हरकतीला तिथे कायदेशीर मान्यता आहे. पुरुष सोबत असल्याशिवाय  ३० वर्षांखालील एकट्या महिलेला हाॅटेलमध्ये राहाण्यास परवानगी नसते.  कतारमध्ये महिलांना आपल्या मुलांसदर्भातील आर्थिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा कोणत्याच कागदपत्रांवर स्वाक्षरी करता येत नाही. मुलांच्या पालकत्वाबाबत महिलांना कायदेशीर अधिकार नाहीत.

२. रशियात काम करण्याच्या बाबतीत ‘नो वुमन जाॅब्स’ लिस्ट अजूनही मोठी आहे. पूर्वी ४५६ नोकऱ्यांमध्ये महिलांना परवानगी नव्हती. आता हा आकडा कमी  झाला तरी आजही ९८ क्षेत्रांत महिलांना प्रवेश नाही.  विमान चालवणे, खाणकाम, वेल्डिंग काम, अग्निशमन विभाग...  इत्यादी. महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ नये या कारणाने महिलांना  नोकरी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

३. अनेक अरब देशांमध्ये  बाहेर वावरताना महिलांवर ‘अबाया’ घालण्याचे बंधन आहे. तेथील महिला डाॅक्टरांना पुरुष रुग्णांवर उपचार करण्यास मनाई आहे. महिलांना घराबाहेर पडताना घरातील पुरुषांची परवानगी आवश्यक असते.

४.  अफगाणिस्तानात मुलींच्या शिक्षणावर बंदी आहे. महिलांना सरकारी , खाजगी क्षेत्रात काम करण्यास मनाई आहे. महिलांसाठी असलेल्या मर्यादांचे उल्लंघन केल्यास महिलांना मृत्यूदंडही दिला जातो.

५. इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर असलेल्या लाॅक्सुमाव्हे या शहरात महिलांनी गाडीवर दोन्ही बाजुंनी पाय  टाकून बसण्यास मनाई आहे. तसेच पुरुषांच्या मागे  गाडीवर बसताना आधारासाठी पुरुषाच्या शरीरावर हात ठेवण्यास  महिलांना कायदेशीर मनाई आहे. 

६.  इस्त्रायलमध्ये  महिलांना नवऱ्याला घटस्फोट द्यायचा असेल तर त्यासाठी नवऱ्याची परवानगी अनिवार्य आहे. एकटी महिला अत्याचाराला कंटाळून घटस्फोटाचा दावा दाखल करू शकत नाही.

७. येमेनी न्यायालयासमोर महिला अर्ध व्यक्ती मानली जाते. त्यामुळे न्यायालयात एका महिलेची साक्ष ग्राह्य धरली जात नाही. दोन महिलांची साक्ष ही एका पुरुषाच्या साक्षीएवढी मोजली जाते.

८. अमेरिकेतल्या १४ राज्यात गर्भपातावर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. प्रगत राष्ट्रात महिलांना आपल्या शरीरावर असलेला अधिकार अशा प्रकारे नाकारण्यात आला आहे. अमेरिकेतील ७ राज्यांमध्ये बलात्कार करणाऱ्या पुरुषाला बलात्कारातून जन्माला आलेल्या अपत्याच्या पालकत्वाचा अधिकार देण्यात आला आहे.

९.  इक्वाटोरिएल ज्युनिआ, गॅम्बिया, सौदी अरेबिया, सोमालिया, दक्षिण सुदान, येमेन या सहा देशांमध्ये मुलींची किती कमी वयात लग्न करावीत यावर काहीही मर्यादा नाही. मुलींना अनिच्छेने शाळा सोडावी लागते. त्यांना घरगुती हिंसाचार आणि आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते.

१०. जगभरात केवळ चार देशांमध्ये विवाहातंर्गत बलात्कार गुन्हा मानला गेला आहे. सिंगापूरसह ११२ देशात विवाहांतर्गत बलात्काराला कायदेशीर मान्यता आहे.

खरी ‘समानता’ फक्त १२ देशांत!
स्टॅटिस्टा या आंतरराष्ट्रीय डेटाबेस कंपनीच्या सांख्यिकी अहवालानुसार बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, ग्रीस, आइसलॅड, लक्झमबर्ग, पोर्तुगाल, स्पेन आणि स्वीडन या सारख्या काही देशांतच स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार आहेत. शिक्षण, नोकरी, वेतन, लग्न, मुलांचे संगोपन, पालकत्व, व्यावसायिक मालकी, मालमत्ता- संपत्ती व्यवस्थापन, पेन्शन य सर्व बाबतीत कायदेशीरदृष्ट्या स्त्री- पुरुष भेद केला जात नाही.

Web Title: spacial article on gender equality countries same rules for men women iran hijab row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Iranइराण