हमें और जिने की चाहत ना होती, अगर तुम ना होते..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 10:12 AM2022-09-28T10:12:21+5:302022-09-28T10:12:38+5:30

आपल्या आयुष्यात सदैव सोबत असतो, आपल्या जखमांवर मलम लावतो तो लतादीदींचा आवाज... आज लता मंगेशकर यांचा जन्मदिन. त्यानिमित्ताने...

spacial article on lata mangeshkar on her birthday remembering her contribution to the industry | हमें और जिने की चाहत ना होती, अगर तुम ना होते..

हमें और जिने की चाहत ना होती, अगर तुम ना होते..

googlenewsNext

सुनील देवधर
भाजपचे राष्ट्रीय सचिव,आंध्रप्रदेश सहप्रभारी

मला आठवतं, मी लहान होतो; माझे वडील रोज सकाळी रेडिओ लावत. भजन-गाणी कानावर पडत. मग चित्रहार पाहण्याची उत्सुकता असे. तेव्हापासून कधी मी त्या एका आवाजाच्या प्रेमात पडलो कळलंही नाही. त्याकाळी ऑडिओ कॅसेट मिळत, दुर्मीळ गाणी मी कुठून कुठून मिळवून ऐकत असे. मोहंमदअली रोडवर काही दर्दी लोक होते, त्यांच्याकडे जुनी गाणी मिळत. १९४५ पासूनच्या प्रत्येक दशकातली गाणी माझ्याकडे होती, त्या गाण्यातला आवाज एकच : लता मंगेशकर. 

पुढे मी विद्यानिधी हायस्कूलमध्ये नोकरीला लागलो. संगीतकार उत्तम सिंग यांचा मुलगा व मुलगी तिथं शिकत. त्यांच्या घरी जाऊन मुलांची शिकवणी घेणार का, असं मला विचारण्यात आलं. मी जाऊ लागलो, मनात एकच होतं उत्तम सिंग यांना सांगू्न कधीतरी आपल्याला लतादीदींना भेटता यावं. तशी मी त्यांना विनंतीही केली. त्याकाळी ‘‘मैने प्यार किया’’ गाजला होता. संगीतकार राम लक्ष्मण यांच्याकडे उत्तम सिंग सहायक होते. एक दिवस मला म्हणाले, सातवा आसमान सिनेमाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला लतादीदी येत आहेत. या लवकर, भेटवतो!’’ 

मी लगोलग माझी स्कूटर काढून निघालो. नेमकं तेव्हाच शिकवणीची फी असलेलं पाकीट मिळालं, ते खिशात टाकलं. पाच मिनिटं ओझरती भेट झाली. त्यांना मी सांगितलं की, मी तुमचा मोठा फॅन आहे. मला तुमची दोन हजार गाणी तोंडपाठ आहेत. त्या मनापासून हसल्या. सही घ्यायची तर कागदही नव्हता, शेवटी फीच्या पाकिटावर सही घेऊन आलो.

काळ पुढे सरकला, पण लतादीदींची गाणी सोबत होती, पुढे मी ईशान्य भारतात संघाच्या कामासाठी गेलो. फार वर्षांनी त्रिपुरात भाजपाची सत्ता आली, माझ्या नावाची तेव्हा महाराष्ट्रात थोडीबहुत चर्चा होती. योगेश खडीकर, लतादीदींचे भाचे, त्यांना म्हटलं, ‘‘दीदींची भेट मिळेल का?’’- १५ मिनिटं वेळ मिळाला.  पेडर रोडवर जाता येताना जे प्रभूकुंज अत्यंत भक्तीने केवळ पाहिलं होतं, तिथे पोचलो.. बोलता बोलता म्हटलं, तुमचा आवाज नसता तर आमचं आयुष्य किती नीरस झालं असतं...‘हमें और जिने की चाहत ना होती, अगर तुम ना होते..’ त्यानंतर बऱ्याच गप्पा झाल्या.

गाण्यांची वैशिष्ट्यं, खास जागा यावर गप्पा निघाल्या.  तू जहां जहां चलेगा या गाण्याच्या केवळ मुखड्याला त्यांनी कशी चाल दिली होती हे दीदींनी सांगितलं. ‘‘संगम’’ सिनेमातल्या ‘‘ओ मेरे सनम’’ गाण्यातला आलाप कसा शंकर-जयकिशन यांच्याशी झालेल्या चर्चेतून स्वत:च दिला तो किस्सा सांगितला. (हे मी एकदा गृहमंत्री अमित शहा यांना सांगितलं. लतादीदींच्या गाण्याचे ते ही मोठे चाहते आहेत. तर ते  म्हणाले, ‘‘वो आलाप तो उस गाने की जान है ’’)  निघता निघता दीदींनी मला एक सुरेल भेट दिली, म्हणाल्या ‘खूप कळतं हो देवधर तुम्हाला गाण्यातलं..’ याहून मोठी पावती माझ्यासाठी काय असेल? 

आपल्या कुणाच्याही आयुष्यात अनेक चढउतार येतात, सुख- दु:ख असतात, विजय-पराजय असतात, त्या साऱ्यात सोबत असतो लतादीदींचा आवाज. त्यांचा आवाज ऐकला की मूड बदलतो. एकेक गाणं औषधासारखं काम करतं. त्यांच्या आवाजात ही जखमेवर मलम लावण्याची अद्भुत ताकद आहे, माणसाला बरं करतो तो आवाज.. मी आधी बंगाली, मग आता माझ्या कामासाठी  तेलगू शिकलो. कोणत्याही भाषेतली लतादीदींची गाणीही ऐकताना वाटतं की त्यांच्या आवाजाला भाषेच्या मर्यादाच नाहीत. तेलगू भाषेतल्या ‘संथानम’ सिनेमातली अंगाई आहे, निदूरा पोरा तम्मुडा.. त्या गाण्यात सुकून आहे.. भाषा कोणतीही असतो...आवाज फक्त लतादीदींचा असतो...
आता त्या नाहीत, पेडर रोडवरुन जाताना प्रभूकुंजच्या पहिल्या मजल्याकडे लक्ष जातं. आणि त्यांचंच गाणं आठवतं, हमारे बाद अब महफ़िल मैं अफ़साने बयान होगे, बहारे हम को ढूँढेगी, ना जाने हम कहाँ होगे..

Web Title: spacial article on lata mangeshkar on her birthday remembering her contribution to the industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.