ना मशिदीवर भोंगे, ना मंदिरावर भोंगे 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 11:04 AM2022-05-03T11:04:30+5:302022-05-03T11:05:01+5:30

सध्या भोंगे प्रकरणावरून अख्ख्या राज्यात अस्वस्थता पसरली आहे. त्याचे साधे उत्तर नांदेडमधल्या मुदखेड तालुक्यातील बारड या गावाने शोधले, त्या गावाची कहाणी!

spacial article on loudspeakers on mosque and temples raj thackeray maharashtra nanded | ना मशिदीवर भोंगे, ना मंदिरावर भोंगे 

ना मशिदीवर भोंगे, ना मंदिरावर भोंगे 

googlenewsNext

राजेश निस्ताने,
वृत्तसंपादक, लोकमत, नांदेड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भाेंग्यांबाबत उघड आक्रमक भूमिका घेतल्याने राज्यातच नव्हे तर देशभर भाेंगे बंदीचे वादळ उठले आहे.  यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये म्हणून पाेलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. या सर्व गाेंधळात नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यातील बारड हे गाव मात्र शांत आहे. कारण या गावाने आधीच अंमलात आणलेला भाेंगे बंदीचा निर्णय! गावातील एकाेप्याचा आणि जातीय सलाेख्याचा हा उपक्रम चार वर्षांपूर्वी सुरू झाला व आजतागायत ताे टिकून आहे. गावकऱ्यांच्या एकीमुळे भविष्यातही ताे टिकून राहील, यात शंका नाही.

वीसेक हजार लाेकवस्तीच्या बारड गावात १७ सदस्यीय ग्रामपंचायत आहे.  गावात १२ मंदिरे, एक मशीद, एक जैन मंदिर, दाेन बुद्ध विहार आहेत. त्या सर्वच ठिकाणी भाेंगे लावले गेले हाेते. वेळीअवेळी ते वाजत. एवढेच नव्हे तर ‘काेणाचा आवाज माेठा’ यावरून जणू विविध समाजात स्पर्धाच लागली हाेती. त्यातून जातीय तणाव निर्माण हाेण्याची चिन्हे दिसू लागली. या ध्वनी प्रदूषणाचा त्रास  सर्वांनाच हाेत हाेता.

सन २०१८ मध्ये तत्कालीन सरपंच जयश्री विलास देशमुख, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा देशमुख आदींनी या भाेंगे बंदीबाबतचा विचार  गावातील प्रतिष्ठित, सर्वच जातीधर्माच्या प्रमुख व्यक्तींसमोर ठेवला.  बैठका घेतल्या. गाव गुण्यागाेविंदाने नांदावे, यासाठी भाेंगे बंदीवर विविध गटांमध्ये एकमत झाले.  ३० जानेवारी २०१८ च्या ग्रामसभेत गाव भाेंगेमुक्त करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला गेला. या गावात आता धार्मिक स्थळांवरच नव्हे, तर कुठेही जाहीर भाेंगे वाजविण्यास मनाई आहे. एवढेच काय लग्न वरात, सण-समारंभातही भाेंगे लावण्याची परवानगी नाही. निवडणूक प्रचाराच्यावेळी सुद्धा गावात भाेंगा लावलेले वाहन फिरू दिले जात नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे नेते ज्याेतिरादित्य शिंदे यांच्या जाहीर सभा सुद्धा विनाभाेंग्याच्या पार पडल्या.

भाेंगे बंदीची ही अंमलबजावणी गेल्या चार वर्षांपासून काटेकाेरपणे सुरू आहे. गावात ५० लाेक एखाद्या कार्यक्रमात असतील तर तेवढ्याच लाेकांना आवाज जाईल, इतरांना त्रास हाेणार नाही, असा छाेटा स्पीकर बाॅक्स लावून काम भागविले जाते.  शेती हेच उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या या गावात इसापूर धरणाचे पाणी  असल्याने बारमाही व बागायती शेती केली जाते. रस्ते, पाणी, वीज व इतर सुविधा गावात उपलब्ध आहेत. हागणदारीमुक्त  गावाला महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचा सात लाखांचा पुरस्कारही मिळाला आहे. गावातील विकासाचे व इतरही लाेकहिताचे बहुतांश निर्णय आजही सर्वसंमतीने घेतले जातात.

गावात विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या विचारधारेचे लाेक आहेत. परंतु या राजकारणाचा गावातील एकाेपा आणि सलाेख्यावर काेणताच परिणाम हाेणार नाही, याची खास काळजी प्रत्येकाकडूनच घेतली जाते. गावातील वाद गावातच मिटविण्यावर जाेर असताे. त्यामुळेच सण-उत्सवात पाेलिसांना या गावाच्या बंदाेबस्ताकडे फारसे लक्ष द्यावे लागत नाही. बारडचे पाेलीस पाटील यशवंत लाेमटे सांगतात, गावातील सर्व जातीधर्माच्या लाेकांनी घेतलेली सामंजस्याची भूमिका ही  भाेंगे बंदीच्या निर्णयातील सर्वात महत्त्वाची बाब. त्यामुळेच या गावात गेल्या कित्येक वर्षात कधीही पाेलीस बंदाेबस्त मागवावा लागलेला नाही. बारडचे सरपंच प्रभाकर आठवले आहेत.

उपसरपंच बाळासाहेब देशमुख सांगत होते. भाेंगेमुक्तीच्या निर्णयाची फळं आम्ही आज चाखत आहाेत. गावात सर्वत्र शांतता नांदते. जे आम्ही केले, ते इतर गावांनाही सहज जमू शकेल. बारड गावाच्या भाेंगे मुक्तीच्या निर्णयापासून प्रेरणा घेऊन लगतच्या निवघा बाजार (ता. मुदखेड) या गावाने आपल्या गावात सर्व प्रकारच्या मिरवणुका, लग्न वराती यावर बंदी घातली आहे. गावकऱ्यांचे सामंजस्य आणि एकजुटीचे हे उदाहरण आत्ताच्या वातावरणात दिलासा वाटावा, असेच आहे! 
rajesh.nistane@lokmat.com

Web Title: spacial article on loudspeakers on mosque and temples raj thackeray maharashtra nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.