पोटाची आग विझली नाही, तर राजवटी जळणारच!

By विजय दर्डा | Published: July 11, 2022 07:46 AM2022-07-11T07:46:23+5:302022-07-11T07:47:15+5:30

मनमानी राज्यकर्त्यांची बेशरम मौजमस्ती आणि बेलगाम वर्तनाने भडकलेल्या सामान्य नागरिकांच्या झुंडी जेव्हा सत्तास्थानांवर कब्जा करतात...

spacial article on sri lanka political crisis president house people enter prime minister house fire | पोटाची आग विझली नाही, तर राजवटी जळणारच!

पोटाची आग विझली नाही, तर राजवटी जळणारच!

Next

विजय दर्डा,
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह 

जेव्हा एखादा प्रशासक किंवा लोकशाही पद्धतीने निवडून येऊन खुर्चीत बसलेला लोकप्रतिनिधी सर्व-सत्ताधीश होतो, भ्रष्टाचारात आकंठ बुडून जातो, तरुणांना छळतो, जनतेचा विश्वासघात करतो आणि तिला भुकेने कासावीस व्हायला लावतो, तेव्हा जनता विद्रोह करून उठते. श्रीलंकेत यावेळी हेच होत आहे. तिथे केवळ राजकीय सत्तापालट नाही, तर संघर्ष पेटला आहे. हा चिमुकला देश पोटातील भुकेमुळे निर्माण झालेल्या असंतोषाच्या आगीत जळतो आहे. आपण रशियातल्या महानायकांच्या मूर्ती भुईसपाट होताना पाहिल्या, इराकमध्ये सद्दाम हुसेन यांचे भव्य पुतळे धराशायी होताना पाहिले; पण  श्रीलंकेत घडले तसे दुसरे उदाहरण दिसणार नाही.

या सगळ्याला  राजपक्षे कुटुंब जबाबदार आहे.  या कुटुंबाने श्रीलंकेला मन भरेपर्यंत लुटले. लोकांना गाडीत भरायला एक लिटर पेट्रोल नसताना यांची मुले चालवत असलेल्या गाड्या मात्र एका लिटरमध्ये फक्त चार किलोमीटर जात होत्या. लोकांना प्यायला पाणी नसताना हे लोक दारूच्या अंघोळी करीत होते. लोकांजवळ दोन वेळा खायला अन्न नसताना हे भरपेट खाऊन उलट्या करीत होते. अशी परिस्थिती असेल तर जनता काय करील? पोटाची आग विझली नाही तर राजवटी जळणारच! एरवी शांत प्रकृतीच्या बौद्ध भिक्षूंनीही श्रीलंकेतील राजवटीविरुद्ध मशाल हाती घेतली, यावरून इथली परिस्थिती किती बिघडली होती हे लक्षात येईल. हे बौद्ध भिक्षू जनतेबरोबर उभे राहिले आहेत.

राजपक्षे कुटुंबाने श्रीलंकेची लूट कशी केली याची उदाहरणे चकित करणारी आहेत. २००५ ते २०१५ या काळात राष्ट्रपती म्हणून सत्तेवर राहिलेल्या महिंदा राजपक्षे यांनी विदेशातील बँकांत १८ अब्ज डॉलर्सची संपत्ती जमा केली. देशात विद्रोहाची स्थिती निर्माण झाल्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागला. महिंदा यांचे छोटे भाऊ गोटबाया राजपक्षे यांनी लोक राष्ट्रपती भवनात घुसल्यावर राजीनामा दिला. गोट बाया फरार झाले नसते तर लोकांनी त्यांचे तुकडे-तुकडे केले असते. २०१५ साली ते संरक्षण सचिव असताना सैन्याच्या खरेदीत दहा दशलक्ष डॉलर्सचा घोटाळा झाला होता. महिंदा राजपक्षे यांचे छोटे भाऊ बासील राजपक्षे अर्थमंत्री होते आणि त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. त्यांच्या भ्रष्टाचारी उद्योगामुळेच त्यांना ‘मिस्टर टेन पर्सेंट’ म्हटले जायचे. २०१६ मध्ये श्रीलंकेतील एका कोर्टाने  १६ एकरांत वसलेल्या बासिल यांच्या आरामदायी महालाचा लिलाव करण्यास फर्मावले होते. तामिळींच्या समस्येमुळे श्रीलंका जळत असतानाही हे सत्ताधीश चैनीची बासरी वाजवत होते आणि पैसा लुटत होते. 

चीनकडून विनाकारण कर्ज घेऊ नका, असे सगळे तज्ज्ञ सांगत असतानाही राजपक्षे परिवार चीनबरोबर व्यवहार करीत राहिला. या कुटुंबाने चीनकडूनही बरीच धनदौलत कमावल्याचा आरोप आहे. तूर्तास श्रीलंका भिकेला लागल्यात जमा आहे. तिथले पंतप्रधान रनिल विक्रमसिंगे यांनी राजीनामा दिला आहे. दुर्दैवाने अशीच परिस्थिती पाकिस्तानातही दिसते. आर्थिकदृष्ट्या पाकिस्तानही कंगाल झाला आहे. एखाद्या दिवशी श्रीलंकेसारखा विद्रोह पाकिस्तानातही उसळला,  तर आश्चर्य वाटायला नको.
vijaydarda@lokmat.com

Web Title: spacial article on sri lanka political crisis president house people enter prime minister house fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.