शिंजो आबे यांच्यासारखा मित्र गमावल्याचे दुःख
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 07:57 IST2022-07-11T07:56:29+5:302022-07-11T07:57:16+5:30
शिंजो यांच्यासारख्या माणसाचे कोणाशी असे काय शत्रुत्व असेल, त्यातून त्याने यांना थेट गोळी घालावी? हा प्रश्न मला पुन:पुन्हा पडतो आहे.

शिंजो आबे यांच्यासारखा मित्र गमावल्याचे दुःख
विजय दर्डा,
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
या क्षणाला माझे मन अगदी सुन्न झाले आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या मृत्यूने मला खूपच मोठा धक्का बसला. शिंजो यांच्यासारख्या माणसाचे कोणाशी असे काय शत्रुत्व असेल, त्यातून त्याने यांना थेट गोळी घालावी? हा प्रश्न मला पुन:पुन्हा पडतो आहे.
शांतताप्रिय आणि संवेदनशील जपानमध्ये असे कधी घडले नव्हते. हत्येचे कारण अजून उलगडलेले नाही. परंतु का कुणास ठाऊक, मला या हत्येमागे दूरवर बसलेल्या एखाद्या सत्तेने रचलेले षड्यंत्र असावे, अशी शंका येते आहे; कारण शिंजो घेत असलेल्या भूमिकेमुळे दमनकारी आणि हुकूमशाही प्रवृत्तींना सरळ सरळ आव्हान मिळत होते.
शिंजो आबे यांच्या जाण्याने भारताच्या हिताचा विचार करणाऱ्या मित्रास आपण गमावले आहे. माझ्यासाठी हा आघात व्यक्तिगतही आहे, कारण मी एक मित्र गमावला. त्यांच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण मला या क्षणी आठवतो आहे. टोकियोत मी त्यांना पहिल्यांदा भेटलो होतो. भारत-जपान संबंध सुधारण्यासाठी काम करणाऱ्या इंडिया फाउंडेशनचे विभवकांत उपाध्याय यांनी ही भेट घडवली होती. भारत-जपान मैत्रीच्या भूमिकेचा मी समर्थक आहे. आबे यांच्याशी झालेल्या पहिल्याच बैठकीत आमची गट्टी जमली.
सप्टेंबर २००६ मध्ये पंतप्रधान म्हणून आबे शपथ ग्रहण करणार होते त्याच्या पूर्वसंध्येला आयोजित भोजनाचे निमंत्रण मला अचानक आले. मी त्यांच्याबरोबर पुष्कळ वेळ घालवला. भारतीय माध्यमे आणि राजकारण समजून घेण्याचा ते सतत प्रयत्न करीत असत. भारताने अणुपरीक्षण केल्यानंतर जगभरातून निर्बंध लावण्यात आले तो काळ मला आठवतो. अटलजींच्या सूचनेनुसार भारतातून एक शिष्टमंडळ जपानला गेले, त्यात मी सहभागी होतो. त्यावेळी ‘भारताला शांतीपूर्ण परमाणू शक्ती का आवश्यक आहे?’ हे जपानी संसदेच्या नाराज तरुण खासदारांना समजावण्यातही आम्ही यशस्वी झालो. भारत-जपान संबंधात काही थोडेफार योगदान देण्याचे सौभाग्य मिळाले याचा मला आनंद आहे.
आबे पंतप्रधान म्हणून भारतात आले तेव्हा इंडिया फाउंडेशनतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्रभाई मोदी, जॉर्ज फर्नांडिस, वसुंधराराजे, सीताराम येचुरी आणि मी व्यासपीठावर उपस्थित होतो. जेव्हा-जेव्हा आमची भेट व्हायची तेव्हा तेव्हा भारत आणि जपानचे संबंध मधुर कसे राहतील, हेच बोलणे व्हायचे. त्यांच्या जाण्याने भारताने एक सच्चा मित्र गमावला आहे.
vijaydarda@lokmat.com