आनंदाच्या कल्लोळातले निखळ माणूसपण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 07:52 AM2022-07-09T07:52:56+5:302022-07-09T07:53:38+5:30
संत विचारांचे प्रतिबिंब आपल्याला इथल्या प्रथा, परंपरा इतकेच नव्हे, सामाजिक चळवळीमध्येही पाहायला मिळते.
ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर
महाराष्ट्रीयन समाजमनावर संत विचारांचा खोलवर परिणाम झालेला आहे. संत विचारांचे प्रतिबिंब आपल्याला इथल्या प्रथा, परंपरा इतकेच नव्हे, सामाजिक चळवळीमध्येही पाहायला मिळते. महाराष्ट्रीयन समाजमनाची मशागत समताधिष्ठित संतविचाराने केली. म्हणूनच इथे सामाजिक बदलांच्या चळवळी उभ्या राहिल्या आणि त्यांनी समृद्ध महाराष्ट्र उभा केला.
बाराव्या-तेराव्या शतकाच्या आसपास हे संत आंदोलन समाजाची एक निकड म्हणून उदयास आले. पूर्वांपार चालत आलेल्या भक्ती परंपरेला या संत चळवळीने काही धक्के दिले. अज्ञानाने अंधारलेल्या समाजमनाला
ज्ञानाच्या उजेडात योग्य वाटा दाखविण्याची किमया संतांनी केली.
कर्मकांडे, जातीय, धार्मिक कट्टरतेचे स्तोम माजलेले होते, चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या टाचेखाली समाज रगडला जात होता; त्याच काळात परकीय आक्रमकांनी आपली मुळे इथे रुजवायला सुरुवात केली होती. म्हणजे परकीयांचा सत्तालोलूप मस्तवालपणा आणि स्थानिक वर्चस्ववाद्यांची मग्रुरी यात समाज भरडला जात होता. त्यावेळी संतांची प्रबोधन चळवळ उभी राहिली. वारकरी संतांनी उभी केलेली ही भागवत धर्माची भक्कम इमारत आज सातशे वर्षे उभी आहे. पंढरपूरच्या वाळवंटात मांडलेल्या या खेळात सर्वच इतके रंगून गेले की, सर्व भेद आपोआप गळून पडले. किंबहुना त्यासाठीच हा जात-धर्मविरहित भागवत धर्माचा खेळ मांडलेला आहे.
कोणतेही अवघड कर्मकांड नाही, कोणतेही बाह्य उपचार नाहीत. गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गोपीचंदनाचा टीळा लावला की, अन्य कोणताही देखावा करावा लागत नाही. टाळ-मृदंगाच्या तालावर आपोआपच आनंदाचा कल्लोळ निर्माण होतो. पंडित, ज्ञानी, योगी, महानुभाव, सिद्ध, साधक, स्री-पुरुष हे सर्व भेद गळून पडतात. एरवी आपल्या उपाधीच्या श्रेष्ठत्वाचा डोलारा घेऊन मिरवणारे पंढरपूरच्या वाळवंटात मांडलेल्या खेळात सहभागी होतात, तेव्हा त्यांच्या या सर्व उपाध्या गळून पडतात आणि उरते ते केवळ निखळ माणूसपण!
निर्मळ मनाने उचनीचतेचा गढूळपणा मागे सारुन स्वच्छ समाज निर्मितीची वाट संत चळवळीने मोकळी केली. अवघड दुस्तर वाटा मोडून टाकून भक्तीपंथ बहुसोपा केला.