‘तसल्या’ व्हिडिओमागे ‘असला’ विकृत मेंदू 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 11:17 AM2022-09-25T11:17:29+5:302022-09-25T11:24:17+5:30

मुद्द्याची गोष्ट : चंडीगड विद्यापीठात मुलींच्या हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थिनीने मुलींचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ चित्रित करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. अशा घटनांमागील विकृत मनोवृत्तीची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत..

spacial article on viral videos chandigarh girls hostel social media diry mind behind that | ‘तसल्या’ व्हिडिओमागे ‘असला’ विकृत मेंदू 

‘तसल्या’ व्हिडिओमागे ‘असला’ विकृत मेंदू 

Next

समीर परांजपे,
मुख्य उपसंपादक

हाली येथील चंडीगड विद्यापीठामध्ये (सीयू) मुलींच्या हॉस्टेलमध्ये १७ सप्टेंबर रोजी एका विद्यार्थिनीने काही मुलींचे अंघोळ करीत असतानाचे व्हिडिओ चित्रित करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकरणात त्या मुलीचा एक मित्रही सामील होता. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या हॉस्टेलमधील काही मुलींनी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केल्याची चर्चा आहे. अश्लील व्हिडिओ प्रकरणी आरोपी मुलगी, तिचा हिमाचल प्रदेशमधील मित्र सन्नी मेहता तसेच रंकज शर्मा अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाने संतप्त झालेल्या शेकडो पालक व विद्यार्थी संघटनांनी त्या हॉस्टेल व विद्यापीठाच्या इमारतीसमोर उग्र निदर्शने केली. अश्लील व्हिडिओच्या प्रकरणामागे मोठे रॅकेट असून पोलीस आणखी काहीजणांना अटक करण्याची शक्यता आहे. आरोपी सन्नी मेहता व रंकज शर्मा या दोघांनी गेल्या काही दिवसांत मुंबई, चेन्नई येथेही अनेक प्रकार केले होते. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे अनेक राज्यांत पसरली असावीत, असाही पोलिसांचा कयास आहे.

अश्लील व्हिडिओ प्रकरणातून एक गोष्ट जाणवते की, यात विकृत मनोवृत्तीचा भाग आहेच; पण स्त्री म्हणजे उपभोग्य वस्तू असाही एक दृष्टिकोन त्यामागे दिसून येतो. सोशल मीडियावर सर्वांत जास्त ब्लू फिल्म व अश्लील व्हिडिओ पाहिले जातात. लोकांना त्याची चटक लागली आहे. असे व्हिडिओ बनविणाऱ्या कंपन्या कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे उगवल्या आहेत. या सर्व गोष्टींतून प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे चोरून चित्रित केलेले अनेक अश्लील व्हिडिओ समाजमाध्यमांवर सहजच पाहायला मिळतात. ते बनविणाऱ्यांना बऱ्यापैकी पैसे मिळत असावेत, असाच काहीसा व्यवहार चंडीगड प्रकरणाच्या मागे असावा, अशी शंका तपास यंत्रणांना आहे. त्या दृष्टीने आरोपी मुलगी व तिच्या दोन साथीदारांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

या प्रकरणी शेकडो संतप्त पालक व विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी चंडीगड विद्यापीठाच्या मुलींच्या हॉस्टेलसमोर उग्र निदर्शने केली. मात्र अनेकदा शिक्षणसंस्थांचे प्रशासन अशा विषयांबाबत तात्कालिक उपाययोजना करते, पोलीस काही लोकांना अटक करतात व मामला थंडबस्त्यात जातो. 

गुजरातमध्ये झाला हाच प्रकार
चंडीगडमधील घटनेनंतर गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील धरमपूर येथे एका शाळेतील मुलींच्या हॉस्टेलमध्ये एका आचाऱ्याने विद्यार्थिनींची अश्लील छायाचित्रे व व्हिडिओ तयार केल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी मुलींनी तक्रार करताच पोलिसांनी चौकशीस सुरुवात केली. मुलींचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ बाथरूमच्या तुटलेल्या खिडकीतून चित्रित करण्याचा प्रयत्न हा आचारी करत होता असा आरोप आहे. या व्हिडिओद्वारे मुलींना ब्लॅकमेल करून त्यांच्याबरोबर कुकर्म करण्याचाही त्याचा इरादा असावा, असा कयास आहे.

महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ
सन २०२१ साली देशभरात सायबर गुन्ह्यांमध्ये ५ टक्के वाढ झाली. २०२० साली ५२९७४ सायबर गुन्हे दाखल करण्यात आले होते. २०२१ साली तेलंगणामध्ये सर्वाधिक म्हणजे १०३०३ सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. नॅशनल क्राइम रेकाॅर्ड ब्यूरोच्या आकडेवारीनुसार महिलांविरोधातील सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये महिलांविरोधातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामध्ये महिलांचे अश्लील चित्रण करून ते व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या अनेक प्रकरणांचा समावेश आहे. अल्पवयीन मुले व मुलींचेही अश्लील व्हिडिओ बनविले जाण्याचे प्रकार घडले आहेत, घडत असतात.

महिलांनो, महिलांचा सन्मान राखा
मुलींच्या हॉस्टेलमध्ये अश्लील व्हिडिओ चित्रित करण्याचे गेल्या काही दिवसांत जे प्रकार उघडकीस आले त्यातून काही गोष्टी समोर येतात. मुलींच्या हॉस्टेलमध्ये अधिकाधिक महिला कर्मचारी वर्ग असणे आवश्यक आहे. सुरक्षारक्षक अनेकदा पुरुष असतात; पण त्यातही महिला सुरक्षारक्षकांचा समावेश असणे अधिक योग्य आहे. मुलींचे अश्लील व्हिडिओ चित्रित करण्याच्या काही घटनांत स्त्रियांचाच सहभाग आढळला आहे. हे तर अतिशय दुर्दैवी आहे. असा सहभाग घेणे टाळावे म्हणून जनजागृती होणे आवश्यक आहे. स्त्री ही स्त्रीची कधीही शत्रू असता कामा नये. तिने तिचा घात करू नये. पुरुषप्रधान समाजात स्त्री ही पुरुषांच्या हातचे बाहुले असते असे म्हटले जाते; पण आता काळ खूप बदलला आहे. महिलांना प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. अन्यायकारक बंधने झुगारून पुढे जाण्याची हिंमत त्यांच्यात आली आहे. अशा वातावरणातही काही स्त्रिया चुकीच्या विचारांच्या पुरुषांच्या संगतीने इतर स्त्रियांचा घात करत असतील तर ते अतिशय घृणास्पद कृत्य आहे. हे प्रकार थांबल्यास समाजात विधायक बदल होतील. त्यातून महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाणही कमी होईल.

Web Title: spacial article on viral videos chandigarh girls hostel social media diry mind behind that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.