भंगलेली मने आणि देश जोडण्यासाठी सद्भावना यात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 09:32 AM2021-10-02T09:32:36+5:302021-10-02T09:32:36+5:30

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि बांगलादेश स्थापनेच्या सुवर्णजयंतीच्या पार्श्वभूमीवर आजपासून भारत-बांगलादेश सद्भावना सायकल यात्रा सुरू होत आहे.

spacial article Sadbhavana Yatra to connect broken hearts and countries india and bangladesh pdc | भंगलेली मने आणि देश जोडण्यासाठी सद्भावना यात्रा

भंगलेली मने आणि देश जोडण्यासाठी सद्भावना यात्रा

googlenewsNext

गिरीश कुलकर्णी, सद्भावना यात्रेचे संयोजक 

देशात हिंसा वाढते आहे. सामाजिक मनभेद वाढत आहेत. सगळीकडे अस्वस्थ वातावरण आहे. लोक एकदुसऱ्याबद्दल साशंक आहेत. अशा परिस्थतीत काय करता येईल? लोकांची मनं कशी जोडता येतील आणि त्यांच्यातला संवाद कसा वाढविता येईल? अनेक जण त्यासाठी आपल्या परीनं प्रयत्न करीत आहेत. नगर येथील ‘स्नेहालय’ या संस्थेनं यासाठी पुढाकार घेतला आहे आणि भारत-बांगलादेश सद्भावना यात्रेचे आयोजन केले. महात्मा गांधींनी जगाला शांती आणि समानतेचा संदेश दिला, म्हणून गांधी जयंतीच्या दिवशी, २ ऑक्टोबरपासून या यात्रेला सुरुवात केली जाणार आहे. 
पोपटराव पवार, अण्णा हजारे, डॉक्टर एस. एन. सुबराव तथा भाईजी, कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष प्रकाश आपटे, १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात बांगलादेश मुक्तीसाठी समर्पण केलेल्या शहीद जवानांचे परिवार आदींसह अहमदनगर  ते नौखाली  अशी ७५ दिवसांची ३ हजार किलोमीटरची ही यात्रा आहे. १६ डिसेंबर २०२१ रोजी नौखाली येथे यात्रेचा समारोप होईल.  

बांगलादेशचे राष्ट्रपिता, बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. बांगलादेशात यंदाचे वर्ष मुजीब वर्ष म्हणून साजरे होत आहे. यानिमित्ताने दोन्ही देशांतील स्वातंत्र्य चळवळीच्या भावधारांचे जागरण, दोन्ही देशांच्या संविधानातील मूलभूत मुद्द्यांची  जागृती सायकल यात्री करणार आहेत. त्यासाठी पथनाट्य, समूहनृत्य, चौक सभा, ग्राम आणि युवा संवाद, रोजची सर्वधर्म प्रार्थना, समतेची आणि सद्भावनेची समूहगाणी गात सायकल यात्री जनजागरण करतील. महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, ओडिशा, बंगाल या राज्यांतून जाणारी ही सायकल यात्रा शेवटचे १८ दिवस बांगलादेशात प्रबोधन करणार आहे. 

आचार्य विनोबा भावे यांनी ‘जय जगत’ नारा देत भारत आणि बांगलादेश येथे भूदान आंदोलन केले. भूमिहीन कष्टकऱ्यांना हक्काची शेतजमीन दिली. १९८० च्या दशकात बाबा आमटे यांनी ‘भारत जोडो’ नारा दिला. सायकलवर तरुणाई सोबत घेऊन हिंसा आणि दहशतवाद शमविला. सद्भावना सायकल यात्रेमागे या प्रेरणा आहेत.

भारताची फाळणी झाली तेव्हा (तेव्हाच्या पूर्व बंगालमध्ये) बांगलादेशमध्ये हिंदूंवर  अत्याचार होत होते. हे समजल्यावर महात्मा गांधी नौखाली येथे १२५ दिवस राहिले.  त्यांनी रक्तपात थांबवून हिंदू आणि मुस्लीम समाजात सद्भाव निर्माण केला. जेथे ब्रिटिश सैन्य हतबल बनले होते, तेथे एकट्या गांधींनी शांतता आणि सद्भावना निर्माण केली. म्हणूनच  सद्भावना सायकल यात्रेचा समारोप नौखाली येथे आयोजिला आहे. रस्त्यातील प्रत्येक गावात एक सद्भावना वृक्ष यात्री लावतील. यात्रेत सहभागी झालेली तरुणाई एकूण ५०० सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, विद्यापीठे, ट्रस्ट यांच्याशी संवाद साधतील. 

सायकल यात्री दररोज सुमारे ६५ किलोमीटर अंतर जाणार आहेत. विविध सामाजिक संस्था, शाळा, मंगल कार्यालये, देऊळ, मशीद, ग्रामपंचायत, चर्च, गुरुद्वारा इत्यादी ठिकाणी राहून यात्री संवाद करतील. बांगलादेशकडे कोलकातामार्गे जाताना बंगालमध्ये परिवार केंद्र, मदर तेरेसा यांची संस्था, समरिटन हेल्प मिशन, बेलूर येथील रामकृष्ण मठ, सोनागाच्छी लालबत्ती भागातील महिलांसाठीची कामे, येथील महिलांसाठी काम करणाऱ्या सनलोप आणि सिनीआशा या संस्था, कोलकाता विद्यापीठ, प्रेसिडेंट कॉलेज, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे शांतिनिकेतन अशा अनेक ठिकाणी सायकल यात्री भेटी देतील.

१३ नोव्हेंबर २०२१ रोजी बंगालमधील बोनगाव येथून यात्रा  बांगलादेशात प्रवेश करील. तेथून ढाकामार्गे यात्रा नौखाली येथे ५ डिसेंबर रोजी पोहोचेल. येथील गांधी आश्रम ट्रस्ट ४ दिवसांच्या लोकसंवादाचे नियोजन करीत आहे. ढाका, नौखाली  येथील  विद्यापीठातील तरुणाईशी संवाद, बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या म्युझियमला भेट आणि त्यांच्या जन्मस्थळाला (तुंगीपरा) सायकल यात्री भेट देणार आहेत. भारताच्या परराष्ट्र विभागाने या सायकल यात्रेला अधिकृतपणे पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे अद्यापही सायकल यात्रींना बांगलादेशाचा व्हिसा मिळालेला नाही. हा अडथळा दूर झाला, तर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त होणारे हे सर्वांत मोठे लोकअभियान ठरेल. त्यातून देशात नव्या विचारांची पेरणी होईल. समाजातील एकीची भावना विकसित होईल.

सर्वप्रथम देशाचा विचार करणारा प्रांत, अशी आपल्या महाराष्ट्राची परंपरा आणि ख्याती आहे. सद्भावना यात्रेमुळे आपल्या या परंपरा अधिकच प्रेरक होणार आहेत.
girish@snehalaya.org

Web Title: spacial article Sadbhavana Yatra to connect broken hearts and countries india and bangladesh pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.