अंथरूणाला खिळलेल्या डॉटीआजींचा समुद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 07:20 AM2021-12-18T07:20:24+5:302021-12-18T07:21:16+5:30

काही आजारी किंवा वृद्ध माणसांना स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागते,  पैसे देऊन  सेवा विकत घ्याव्या लागतात किंवा शेजारी पाजारी आणि ओळखीच्या लोकांच्या चांगुलपणावर अवलंबून राहावं लागतं.

spacial article on A sea of dotty granny on the bed world | अंथरूणाला खिळलेल्या डॉटीआजींचा समुद्र

अंथरूणाला खिळलेल्या डॉटीआजींचा समुद्र

Next

जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला सगळ्यात जास्त भीती वाटत असते ती मृत्यूची आणि त्याखालोखाल भीती वाटत असते ती मृत्यूपर्यंत नेणाऱ्या रस्त्याची. मृत्यू हे जरी जगातील अंतिम सत्य असलं तरी तिथवर जाण्याचा रस्ता प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. जिथे खूप काळ चालणारं आजारपण असतं, तिथे त्या व्यक्तीच्या आयुष्यात तर उलथापालथ होतेच, पण तिच्या जवळच्या व्यक्तींच्याही आयुष्याची गणितं बदलून जातात. एका आजारी किंवा वृद्ध माणसामुळे सगळ्या घराचा दिनक्रम बदलून जातो.  काही आजारी किंवा वृद्ध माणसांना स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागते,  पैसे देऊन  सेवा विकत घ्याव्या लागतात किंवा शेजारी पाजारी आणि ओळखीच्या लोकांच्या चांगुलपणावर अवलंबून राहावं लागतं. काही वेळा त्यांना जवळचे नातेवाईक नसतात, काही वेळा नातेसंबंध इतके ताणलेले असतात, की अशा प्रसंगीदेखील एकमेकांचा सहवास नकोसा वाटतो.

वृद्ध पेशंट स्वभावाने किरकिरा नसतो त्यावेळी कितीही आजारपण आणि वृद्धत्व आलं तरी त्याचा ताण हसतखेळत पेलला जातो.  डॉटी श्नायडर ही अशीच एक अमेरिकन वृद्ध महिला. तिला वयाच्या ९१व्या वर्षी पक्षाघाताचा झटका आला. अमेरिका म्हटलं की, इतर जगाला असं वाटतं की तिथे लोकांचे आपापसातले नातेसंबंध चांगले नसतात. त्या आजीबाईंना कुठेतरी हॉस्पिटलमध्ये एकटीने शेवटचे दिवस काढावे लागतील. पण प्रत्यक्षात मात्र डॉटीआजींची मुलगी किंबर्ले वॉटरबेरी ही आजींचं आयुष्य सुखाचं व्हावं, यासाठी धडपडत होती.

त्याचाच एक भाग म्हणून तिने डॉटीआजींचे मिळतील ते सगळे जुने - नवे फोटो एकत्र करून त्यांचे अल्बम बनवायला सुरुवात केली. तिला असं वाटलं की, ते फोटो बघून आपल्या आईला छान वाटेल. ती जुन्या आठवणीत रमेल. त्याप्रमाणे डॉटीआजी फोटो बघण्यात तर रमल्याच, पण तिथे थांबल्या नाहीत. जुन्या ट्रीपमध्ये बीचवर गेल्याचे फोटो बघून डॉटीआजी म्हणाल्या की, मला अलाबामा राज्यातल्या या समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा जायचं आहे. आधी ज्या ट्रीपला मजा आली होती ती ट्रीप आपण पुन्हा करूया, असं त्यांना वाटलं त्यावेळी त्यांचं वय होतं केवळ ९५ वर्षं! 

किंबर्ले आणि डॉटीआजींनी त्यांच्या त्या ट्रीपचं प्लॅनिंग करायला सुरुवात केली. एका ९५ वर्षांच्या पक्षाघात झालेल्या वृद्ध महिलेला बीचवर ट्रीपला नेण्यासाठी तिच्या मुलीने आणि मुलीच्या मैत्रिणीने शक्य ती सगळी तयारी केली. गाडीतून तिला बीचवर नेण्यापर्यंतचा प्रवास तर त्यांनी जमवला, पण डॉटीआजीला आधीचा सगळा अनुभव रिपीट करायचा होता. आयुष्य छान भरभरून जगायचं होतं. त्यांना नुसता हॉटेलच्या गॅलरीत बसून समुद्र बघायचा नव्हता, तर किनाऱ्यावरच्या ओल्या मऊ वाळूत पाय घालायचे होते. आता कसं करावं? 

किंबर्लेने आईसाठी व्हीलचेअर तर आणलीच होती. पण  तिला व्हीलचेअर ढकलताना फार ताकद लावता यायची नाही. त्यातही समुद्रकिनाऱ्यावरच्या भुसभुशीत वाळूत व्हीलचेअर ढकलणं हे तर फारच कठीण व्हायला लागलं. आता काय करावं? इथवर येऊन जर का डॉटीआजीला समुद्राच्या पाण्यात पाय बुडवायला मिळाले नाहीत, तर काय उपयोग? पण, त्यावेळी किनाऱ्यावर तैनात असलेल्या एका लाईफ गार्डने किंबर्लेची झालेली अडचण बघितली आणि मग “काही मदत करू का?” असं विचारायला तो त्यांच्या जवळ आला. खरं तर त्याचं काम हे केवळ समुद्रात कोणी बुडायला लागलं तर त्याचा जीव वाचवणं एवढंच असणार, पण इथे जी मदत आपण सहज करू शकतो ती केली पाहिजे असं वाटून तो आला आणि त्याने ती व्हीलचेअर ढकलायला किंबर्लेला मदत केली. इतकंच नाही, तर त्याने त्याला लाईफगार्ड म्हणून वापरायला दिलेली गाडी आणली. त्यात डॉटीआजीला बसवलं आणि थेट समुद्राच्या पाण्यापर्यंत घेऊन गेला. आता फक्त एकच गोष्ट राहिली होती, ती म्हणजे  बीच चेअरमध्ये बसून संपूर्ण दिवसाचा आनंद घेणं.

आपल्या पंच्याण्णव वर्षांच्या आईला गाडीतून खुर्चीत बसवणं किंबर्लेसाठी जितकं अवघड होतं तितकंच ते त्या लाईफ गार्डसाठी सोपं होतं. त्याने आजीबाईंना सहज उचललं आणि बीच चेअरमध्ये ठेवून दिलं आणि मग अलाबामा बीचवरच्या त्या सगळ्या तरुण लाईफ गार्ड्सनी रोजच ती जबाबदारी घेतली. ते रोज त्या दोघींना  भेटायचे आणि आजीबाईंना त्यांच्या बीचचेअरमध्ये बसवून  आपापल्या कामाला जायचे. सध्या ही कहाणी अमेरिकेत सर्वत्र चर्चेचा विषय झाली आहे.

आनंदाचं रहस्य
या प्रवासात किंबर्लेला मदत मिळाली म्हणून डॉटीआजींची ट्रीप त्यांच्या मनाप्रमाणे झाली. त्यांना रोज बीचवर नेऊन आणणाऱ्या तरुण लाईफ गार्ड्सचं कौतुक आहेच. पण वयाच्या ९५व्या वर्षी पक्षाघातासारखा आजार झालेला असतांना हातपाय गाळून न बसता बीचवर जाण्याचं स्वप्न बघणं आणि स्वतः साठीत असताना आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळे प्रयत्न करणं, हे जास्त छान आहे.

Web Title: spacial article on A sea of dotty granny on the bed world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.