कामचुकार बाबूंसाठी हेडमास्तर मोदींचा ‘तास’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 09:02 AM2021-09-30T09:02:37+5:302021-09-30T09:02:56+5:30

बाबू लोक फक्त फायली सरकवतात अशी नरेंद्र मोदी यांची तक्रार असते, आता त्यांनी बाबूंना कामाला लावायचे नवे तंत्र शोधले आहे !

spacial editorial on how pm narendra modi works with who avoids to work pdc | कामचुकार बाबूंसाठी हेडमास्तर मोदींचा ‘तास’

कामचुकार बाबूंसाठी हेडमास्तर मोदींचा ‘तास’

Next

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

मोदी आपले सरकार कसे चालवतात हे कोणाला जाणून घ्यायचे असेल तर त्यांच्या एखाद्या वर्गात हजेरी लावावी लागेल. अमेरिकेला जाण्यापूर्वी या हेडमास्तरांनी सलग ६ तासांचा एक वर्ग घेतला. या विशेष आढावा बैठकीला बोलावलेल्या ७० हून अधिक सचिवांशी मोदी व्यक्तिश: बोलले. दोन वर्षांत अशी बैठक प्रथमच झाल्याने सचिवांपैकी बहुतेक गोंधळले होते. कोरोना काळात अशी भेट झाली नव्हती. आणखी महत्त्वाचे म्हणजे हे काही कोरड्या विचारविनिमयाचे चिंतन शिबिर नव्हते, तर केल्या कामाचा चोख हिशेब मागणारी झाडाझडतीची बैठक  होती. 

आपल्या खात्याने केलेल्या कामांचा तपशील घेऊनच सचिवांना या बैठकीला बोलावले होते. मागचा तपशील द्यायचा, आणि पुढच्या १०० दिवसांत काय करणार हेही सांगायचे होते. मोदींनी या सर्व सचिवांना राष्ट्रपती भवनात बोलावले. या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक सचिवाला एक टिपण देण्याची सूचना मुख्य सचिव पी. के. मिश्रा आणि मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना देण्यात आलेली होती.

मोदी आणि त्यांचे ७० सचिव व्यवस्थित टाईप केलेले ७० कागद मोदी यांनी त्यांच्या समोरच्या टेबलावर उजव्या बाजूला ठेवले होते. संबंधित सचिव आणि त्याच्या मंत्रालयाची तपशीलवार माहिती त्या प्रत्येक कागदावर होती. याआधी त्या सचिवाने कोणकोणत्या मंत्रालयात काम केले आहे, निवृत्त कधी होणार आहेत, याचीही माहिती त्यात होती. एक सचिव बोलायला उभे राहताच मोदी त्यांना म्हणाले, ‘आपण गेल्या तीन दिवसांपूर्वीच या खात्यात आला आहात, हे मला माहिती आहे.’ 

दुसरे एक सचिव म्हणाले, ‘मी माझ्या मंत्र्यांकडून निर्देश घेत असतो’. त्यावर मोदी म्हणाले, ‘ही बैठक तुम्ही आणि तुमच्या कामाबद्दल आहे. मंत्र्यांना अनेक कामे असतात. २०१९ साली तुम्ही तुमच्या कामाबाबत काय लक्ष्य ठेवले होते आणि ते किती पूर्ण झाले ते सांगा.’ ‘राज्य सरकारे काही फायली अडवून ठेवतात’ असे एका ज्येष्ठ सचिवाने निदर्शनास आणल्यावर ‘हे तुम्ही पंतप्रधान कार्यालयाला आधीच का सांगितले नाही?’ असा थेट प्रश्न मोदी यांनी केला. देशात कोणताही प्रकल्प अडला असेल तर पंतप्रधान कार्यालयाला त्वरित लेखी कळवले गेले पाहिजे, अशा सूचना मोदींनी दिल्या. संबंधित मुख्यमंत्र्यांशी आपण स्वत: बोलू, असेही त्यांनी सांगितले.

कार्यप्रवण करण्याचा नवा पायंडा सचिवांकडून काम करून घेण्याची आणखी एक पद्धत मोदी यांनी विकसित केली आहे. बैठकीत त्यांनी एकदम वेगळा पवित्रा घेतला. पंतप्रधान कार्यालयाला रोज अहवाल पाठवायचा, असे त्यांनी सर्व सचिवांना या बैठकीदरम्यान सांगितले. रोज कार्यालय सोडण्यापूर्वी दिवसभरात काय कामे केली, याचा ई-मेल या सर्व सचिवांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवायचा आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी पुढचे १०० दिवस रोज प्रत्येक सचिवाने हे करायचे आहे. प्रत्येक मंत्रालय आणि त्याचे सचिव यांच्या कामाचा आढावा १०० दिवसांनी घेण्यात येणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे या बैठकीत कोणीही पॉवरपॉईंटचे सादरीकरण केले नाही.

काळ बदलतो आहे...
नोकरशाहीबरोबर काम करण्याचा दीर्घ अनुभव आता नरेंद्र मोदी यांच्या गाठीला आहे. ‘मी ल्युटन्स दिल्लीवाला नाही, बाहेरचा आहे’ असे म्हणणे आता त्यांनी सोडून दिलेले दिसते. एकेकाळी ते बाबू लोकांवर रागवत. ‘नोकरशाहीतले लोक फक्त फायली सरकवतात’ असे या बाबूंना उद्देशून मोदी खासगीत म्हणत असत. एकदा रागाच्या भरात एका नोकरशहाशी बोलताना मोदींनी त्यांना सुनावले होते, ‘एक परीक्षा उत्तीर्ण झालात म्हणजे देश चालवण्याचा परवाना तुम्हाला मिळाला, या समजुतीत राहू नका.’

सेवेत असताना आणि निवृत्तीनंतर या अधिकाऱ्यांना सगळे काही मिळत असते, पण काम मात्र ते काडीचे करत नाहीत, हे लक्षात आल्यावर पंतप्रधान खूप अस्वस्थ झाले होते. वरिष्ठ अधिकारी फक्त फायली इकडून तिकडे सरकवायचे काम  कसेबसे करतात, अशी मोदींची धारणा होती. पण आता ७ वर्षे सर्वोच्च पदावरून दिल्लीत काम केल्यावर त्यांनी थोडा वेगळा पवित्रा घेतल्याचे दिसते आहे. 

याआधी प्रशासनातील ज्येष्ठ अधिकारी मोदींच्या वक्रदृष्टीला घाबरून गोल्फ खेळायला क्लबमध्ये जाईनासे झाले होते. अनेकांनी तर पंचतारांकित हॉटेलेही वर्ज्य केली होती, पण आता थोडे बदल होत आहेत. वेळेत काम करायचे तर नोकरशाहीला कामाला लावले पाहिजे, हे मोदींनी जाणले आहे.  दुसरे म्हणजे सरकारबाहेरचे हुशार लोक मदतीला घ्यायला त्यांनी सुरुवात केली आहे. सहसचिव आणि त्यावरच्या पदांवर त्यांनी बाहेरून माणसे आणली आहेत. तज्ज्ञ तसेच तंत्रज्ञांना त्यांनी हाताशी धरले आहे. एस. जयशंकर, अश्विनी वैष्णव, हरदीपसिंग पुरी किंवा अगदी निर्मला सीतारामन यांच्यासारख्या आपापल्या विषयात तज्ज्ञ व्यक्तींच्या हाती मोदींनी महत्त्वाची मंत्रालये सोपवली आहेत. या सगळ्यातले जुने जाणते रुळलेले नोकरशहा मात्र काही अभिनव कल्पना मांडण्याऐवजी केवळ श्रवणभक्ती करत आपले दिवस घालवत  असतात, हा भाग वेगळा.

Web Title: spacial editorial on how pm narendra modi works with who avoids to work pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.