सीने की वो धड़कन, गालों पर वो थपकी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 07:51 AM2021-07-12T07:51:13+5:302021-07-12T07:52:29+5:30
Dilip Kumar : सदैव शांततेची मशाल हाती घेतलेला अभिनयाचा कोहिनूर हिरा म्हणून दिलीपकुमार यांचे स्मरण कायम केले जाईल.
विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
दिलीपकुमार या एका माणसात एकाच वेळी दोन व्यक्तिमत्त्वे नांदत होती : एक दिलीपकुमार आणि दुसरे युसूफ खान. त्यातले दिलीपकुमार अभिनय, दिग्दर्शन याला वाहिलेले तर युसूफ खान मानवतेची सेवा आणि अधिकार रक्षणाला समर्पित. अविरत प्रेमाचा वर्षाव आणि दुखावलेल्या मनाला हृदयाशी धरणे हे त्यांच्या रोमारोमात होते. देश हीच त्यांच्या हृदयाची धडकन होती. कारगिल युद्ध झाले तेव्हा ते संतापून म्हणाले, ‘दोस्तीच्या नावाने पाठीत सुरा खुपसला, हे चांगले नाही केले.’ जातीपाती धर्माचे अवडंबर त्यांनी कधीही माजवले नाही. राम-रहीम असे दोघेही त्यांच्या मनात सदैव वास करून होते. त्यांची प्रकृती अत्यंत आध्यात्मिक होती. ते नेहमी म्हणत ‘त्याची इच्छा नसेल, तर झाडाचे वाळलेले पानही जमिनीवर पडत नाही.’ ही सांगोवांगी गोष्ट नाही. हा माझा स्वत:चा अनुभव आहे. आमच्या दाट स्नेहामुळे मला त्यांना जवळून पाहण्याची, अनुभवण्याची संधी मिळाली.
एकदा पाकिस्तानात वर्ल्ड ॲडर्व्हटायझिंग काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. उद्योगपती हरीश महिंद्रा या अधिवेशनाचे अध्यक्ष असणार होते. नेमके त्याचवेळी पाकिस्तानने काश्मीर आपल्या नकाशात दाखविले आणि वादंग उभा राहिला. असे ठरले की याबाबत बोलण्यासाठी दिलीपकुमार यांनी जावे. ते गेले; पण उपयोग झाला नाही, मग आम्हीही पाकिस्तानात गेलो नाही. दिलीपकुमार देशासाठी तुरुंगात गेले होते हे फार कोणाला ठाऊक नसेल.
पुण्यात असताना ते मिलिटरी कँटिनमध्ये सँडविच तयार करण्याचे काम करत. एकदा त्यांनी कुठल्यातरी जमावासमोर स्वातंत्र्याचा पुकारा करणारे भाषण दिले. तेव्हा भारत पारतंत्र्यात होता. पोलिसांनी तत्काळ दिलीपकुमार यांना पकडून तुरुंगात टाकले. पुढे सँडविचचा दीवाना असलेल्या एका मेजरने शेवटी त्यांची सुटका करवली. माझे वडील स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा आणि एन. के. पी. साळवे यांच्यामुळे माझी आणि दिलीपसाहेबांची भेट व्हायची. तो परिचय अर्थातच तसा औपचारिक होता. १९७१ साली माझ्या लग्नाचे आमंत्रण द्यायला मी त्यांच्याकडे गेलो. तेव्हा गमतीने ते म्हणाले ‘शादीका बोझ उठा पाओगे, बरखुरदार?’ - मला काही समजले नाही. माझा गोंधळ ओळखून ते म्हणाले ‘देखो, ये बडा प्यारा बंधन है, बडी अहमियत रखता है ! तुम्हाला अंतर्बाह्य बदलण्याची ताकद केवळ याच बंधनात आहे. मात्र त्याचे पावित्र्य राखले गेले पाहिजे. त्या दिवशी मला शूटिंग आहे, लग्नाला येऊ शकणार नाही; पण माझ्या खूप खूप शुभेच्छा.’
नंतर एकदा मुलाखत घ्यायला त्यांच्या घरी गेलो, ती दुसरी भेट होती. ते एका चित्रपटाबाबत विचार करण्यात गढून गेले होते. मुलाखत नाही झाली, पण त्यांनी माझा पाहुणचार मात्र उत्तम केला. ती सरबराई पाहून मी थक्कच झालो होतो. १९८० साली यवतमाळ येथे कबड्डी सामन्यांच्या निमित्ताने पाहुणे म्हणून आम्ही दिलीपकुमार यांना बोलावले. २५ डिसेंबर ही तारीख होती. नागपूरहून ते मोटारीने आले. स्टार असल्याचा रुबाब नाही, कसलेही नखरे नाहीत. अगदी सामान्य माणसासारखे ते साधेपणाने आले. जोरदार भाषण दिले आणि थेट कबड्डीच्या मैदानात उतरले. म्हणाले ‘ मी मातीतला माणूस आहे, कबड्डी चांगली खेळतो.’ .. हे ऐकल्यावर तिथे माहौल काय तयार झाला असेल याची तुम्ही कल्पना करू शकता !
त्यानंतर आम्ही घरी जेवायला गेलो. आई सर्वांना वाढत होती, तर आग्रह करून तिलाही बाजूला बसवून घेतले. एका बाजूला बाबूजी आणि दुसरीकडे बाईजी असा त्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. खूप गप्पा मारल्या. त्या दिवशी त्यांनी ज्योत्स्नाला आशीर्वाद तर दिलाच, वर लग्नाला न आल्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली.
राज्यसभेचे सदस्य नियुक्त होऊन ते दिल्लीत आले तेव्हा त्यांना सदनिका मिळाली. मला म्हणाले, इथे करमणार नाही. माझ्या नावाने एक बंगला मिळाला होता. ७ गुरुद्वारा रकाबगंज रोड हा बंगला मुकेश पटेल यांच्या नावे एक वितरित झाला होता. ते तिथे एकटेच राहत होते. त्यांनी आम्हाला दोघांनाही निमंत्रण दिले. एके दिवशी दुपारी दिलीपकुमार यांना घेऊन आम्ही जेवायला मुकेशभाईंकडे आलो. बंगला पाहून दिलीपसाहेब म्हणाले, आता मी येथेच राहणार !” - आणि खरोखरच आम्ही तिघे तेथे राहू लागलो. फार छान दिवस होते ते. आमची तिघांची मैफल जमायची. दिलीपसाहेबांच्या स्वरात कमालीचे माधुर्य होते. सुरीले गायचे. एकदा मी त्यांना विचारले, ‘राजकपूर, देवानंद यांच्याबद्दल तुमचे काय मत आहे?’ - मिश्कीलपणे त्यांनी विचारले, इन दोनोंके साथ मेरा नाम क्यू नही जोडा?” - आम्ही सगळे खळखळून हसलो. मग म्हणाले, हे तिघेही आपापल्या मैदानातले अव्वल खेळाडू आहेत. प्रेक्षकांना खेचून घेण्याची, खिळवून ठेवण्याची क्षमता त्यांच्यात आहे !”
दिल्लीत राहत असतानाच सायरा बानू पतीवर किती गाढ प्रेम करत याचा अनुभव मला आला. मुंबईत राहूनही त्या नवऱ्याची काळजी घेत. आम्हाला फोन करून विचारत साहेबांनी काही खाल्ले आहे की नाही? औषधे घेतली का? - इकडे दिलीपसाहेब हळूच म्हणत ‘सांगा, खाणे झालेय, औषध घेतले आहे.’ मग तिकडून सायराजी म्हणत ‘तेच तुमच्याकडून वदवून घेताहेत ना? त्यांची काळजी घ्या, त्यांना अजिबात पर्वा नसते आपल्या तब्येतीची !” आई, वडील, भाऊ, मित्रांबद्दल दिलीपसाहेबांचे समर्पण अद्भूत असेच होते. ते प्रत्येक नाते जिवापाड सांभाळत. दिलीपसाहेब आणि माझ्या वयात बरेच अंतर होते, पण त्यांनी ते कधी जाणवू दिले नाही. संसदेतून बाहेर पडल्यावर ते माझ्या गालावरून हात फिरवत, प्रेमाने जवळ घेत. त्यांचा तो स्पर्श मी कधीही विसरू शकत नाही. ‘लोकमत’चा ’महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांना आमंत्रित केले तेव्हा सायराजींना ते म्हणाले, मला जायचे आहे या कार्यक्रमाला. त्यांची प्रकृती ठीक नसतानाही सायराजी त्यांना घेऊन आल्या. त्यांनी त्या दिवशी प्रेम वर्षावात आम्हाला भिजवून टाकले. त्यांच्या कलाकारीबद्दल मी काय लिहू? या ओळीच पुरेशा आहेत...
दफन से पहिले, नब्ज जांच लेना साहब
कलाकार उमदा है कहीं किरदार में ना हो...
अलविदा दिलीपसाहब... शेवटच्या श्वासापर्यंत तुमची आठवण येत राहील !
vijaydarda@lokmat.com