शिव्या देणाऱ्यांना आरोग्य, दीर्घायुष्य मिळतं?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 09:24 AM2021-09-29T09:24:00+5:302021-09-29T09:24:41+5:30
शिव्या द्या, शिव्या देणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं, असं जर कोणी सांगितलं; त्यातही विशेषत: संशोधकच जर हे सांगत असतील, तर??.. आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल..
मराठीत ‘म’ आणि ‘भ’ वरून तर इंग्रजीत ‘एफ’वरून कोणी शिव्या देत असेल, तर आपण त्यांच्यापासून चार हात दूरच राहतो. मुलांच्या तर कानावरही असे शब्द पडू नये, यासाठीच विलक्षण काळजी घेतो. शिव्या देणाऱ्या अशा मुलांच्या संगतीत आपली मुलं येऊ नयेत, यासाठी पालक म्हणून वाट्टेल ते करतो. अशा मुलांबरोबरची आपल्या मुलांची संगत तोडतो, तोडायला लावतो.. आपण स्वत: शिव्या देत असू किंवा शिव्या देण्याची सवय असेल, तर किमान मुलांसमोर तरी ते शब्द उच्चारले जाऊ नयेत, याची काळजी घेतो... शिव्या देण्याची सवय मोडण्याचा आटोकाट प्रयत्न करतो..
..पण तुम्ही शिव्या द्या, अगदी घाणेरड्या आणि कानाला ऐकवल्या जाणार नाहीत, अशा शिव्या द्या, भले मोठ्यानं नका देऊ, पण मनातल्या मनात का होईना, शिव्या द्या, शिव्या देणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं, असं जर कोणी सांगितलं; त्यातही विशेषत: संशोधकच जर हे सांगत असतील, तर??.. आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल..
पण शिव्या देणं किती ‘चांगलं’ असतं, निदान शिव्या देणाऱ्या व्यक्तीसाठी तरी ते किती फायदेशीर असतं, याचा पद्धतशीर अभ्यास आणि निरीक्षणंच संशोधकांनी लोकांसमोर ठेवली आहेत. त्यासाठी अनेक देशांतल्या लक्षावधी लोकांचाही त्यांनी अभ्यास केला आणि हा सिद्धांत मांडला. ज्याला शिव्या पडतात, त्याला किती वाईट वाटत असेल, त्याच्या मनावर काय परिणाम होत असेल, ही गोष्ट वेगळी. सतत शिव्या खाणारे तर आपल्या आयुष्यालाच कंटाळून या जगातून निघून गेल्याची उदाहरणंही काही कमी नाहीत, पण शिव्या देणाऱ्यांना स्वत:ला मात्र त्याचा फायदाच होतो..
न्यू जर्सी येथील किन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतच्या सिद्धांतात म्हटलं आहे, जे शिव्या देतात, ते जास्त जगतात. त्यांना दीर्घायुष्य लाभतं. याचं मुख्य कारण म्हणजे इतरांच्या तुलनेत ते ‘टेन्शन फ्री’ असतात, त्यांच्यावरचा ताण कमी असतो. कारण एखादी चुकीची, न पटणारी गोष्ट, घटना घडली, विशेषत: ज्या गोष्टीवर आपल्या स्वत:चं काहीच नियंत्रण नसतं, अशा वेळी शिव्या देऊन मोकळं झालं की, ताण कमी होतो आणि लवकर मिटतोही. यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग, अभ्यास तर केलेच, लक्षावधी लोकांशी बोलणं केलं, पण एक साधा, सोपा प्रयोगही केला..
युनिव्हर्सिटीतील काही विद्यार्थ्यांना त्यांनी बर्फाच्या थंडगार पाण्यात हात बुडवून ठेवायला सांगितलं. निष्कर्ष असा.. ज्यांनी शिव्या देत देत या पाण्यात हात बुडवून ठेवले, त्यांना शिव्या न देणाऱ्या इतर ‘सोज्वळ’ मुलांपेक्षा जास्त वेळ हात पाण्यात बुडवून ठेवता आले. त्यांची क्षमता तर वाढलीच, पण तुलनेनं त्यांच्यावरचा ताणही इतर मुलांपेक्षा कमी होता... अर्थात हे एक उदाहरण. अशाप्रकारचे अनेक प्रयोग संशोधकांनी करून पाहिले आणि त्या सगळ्या प्रयोगांचं तात्पर्य होकारार्थी आलं. जे शिव्या देतात, त्यांना दीर्घायुष्य लाभतं असं संशोधकच म्हणताहेत, म्हटल्यावर काही जण आणखी जोमानं शिव्या द्यायला सुरुवात करतीलही, पण त्याचवेळी संशोधकांनी हेदेखील बजावलं आहे की, हे आमचं एक निरीक्षण आहे, याचा अर्थ येता-जाता, ज्याला-त्याला तुम्ही शिव्या देत राहिलात तर ते चांगलं नाहीच. शिवाय ज्याला तुम्ही शिव्या देता, त्याच्याही मनावर विपरीत परिणाम होताे, विशेषत: लहान मुलं आणि वृद्ध. कारण ती इतरांवर अवलंबून असतात. कोणी शिवीगाळ केल्यावर मनानं ते खचतात आणि बऱ्याचदा त्यातून लवकर बाहेर येत नाहीत किंवा आपल्या जीवाचंच बरंवाईट करून घेतात..
त्याचे फायदे लक्षात घ्या, पण म्हणून लगेच लोकांना शिव्या द्यायला लागू नका, असंही संशोधकांचं म्हणणं आहे.
कोणकोणत्या प्रसंगांत शिव्या देण्याचा फायदा त्या व्यक्तीला होतो, याबद्दलची संशोधकांची काही प्रमुख निरीक्षणं आहेत.
१- अतीव शारीरिक वेदना होत असताना, जे शिव्या देतात, त्यांची पीडा काही प्रमाणात कमी होण्यात मदत होते किंवा ते सहन करण्याची शक्ती वाढते.
२- ज्या घटना, प्रसंगांवर तुमचा काहीच कंट्रोल नसतो, अशावेळी शिव्या देण्यामुळे भावनिक लवचीकता वाढते.
३- शिव्या दिल्यामुळे अनेकांची क्रिएटिव्हिटी वाढते.
४- शिव्या दिल्यामुळे अनेकांचे नातेसंबंध सुधारतात. (दोन जवळचे मित्र एकमेकांना ‘हसत हसत’ घाणेरड्या’ शिव्या देताना तुम्ही ऐकलं असेलच.)
५- मनसोक्त शिव्या देताहात, म्हणजे तुम्ही ‘रिलॅक्स मूड’मध्ये असल्याचंही ते एक लक्षण मानलं जातं.
६- जेव्हा तुम्ही चिडलेले असता, निराश झालेले असता, त्यावेळी शिव्या दिल्यामुळे एकप्रकारचा ‘सुदिंग इफेक्ट’ मिळतो, असं प्रसिद्ध मानसतज्ज्ञ राफेलो ॲन्टोनिओ आणि डॉ. केल झ्रेन्चिक यांचंही म्हणणं आहे.
.. पण म्हणून शिव्या देऊ नका!
‘इतरांना’ शिव्या देणं चांगलं, असं आम्ही म्हणणार नाही, उलट इतरांचं आयुष्य त्यामुळे बरबाद होऊ शकतं, असा कळकळीचा सल्लाही संशोधकांनी दिला आहे. २०१७ मध्ये २८ देशांत झालेल्या विविध प्रकारच्या ५२ संशोधनांमध्ये आढळून आलं आहे, सर्वांत जास्त प्रमाणात शिव्या म्हाताऱ्या लोकांना आणि लहान मुलांना दिल्या जातात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर अतिशय विपरीत परिणाम झाला..