मिलेनिअल्सना मिळालेल्या नव्या मिस युनिव्हर्सची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 08:47 AM2021-12-14T08:47:46+5:302021-12-14T08:48:36+5:30

२१ वर्षांची हरनाज म्हणाली, ‘आपण युनिक आहोत ही भावनाच तुम्हाला सुंदर बनवते. मी स्वत:वर भरवसा ठेवला म्हणून तर मी आज इथं उभी आहे..’

spacial editorial The story of the new Miss Universe for millennials harnaaz kaur | मिलेनिअल्सना मिळालेल्या नव्या मिस युनिव्हर्सची गोष्ट!

मिलेनिअल्सना मिळालेल्या नव्या मिस युनिव्हर्सची गोष्ट!

Next

मेघना ढोके, संपादक, सखी डिजिटल, लोकमत

सुश्मिता सेन १९९४ मध्ये ‘मिस युनिव्हर्स’ झाली. मागोमाग ऐश्वर्या राय ‘मिस वर्ल्ड’! देशानं तेव्हा नुकतीच जागतिकीकरणासाठी दारं किलकिली केली होती.  भारत नावाची मोठी बाजारपेठ जागतिक कंपन्यांना खुणावू लागली होती. त्यात काळ्या रंगाचा न्यूनगंड इथं समाजमनात पुरेपूर मुरलेला. त्याच काळात कॉस्मेटिक कंपन्या, विविध प्रॉडक्ट्स घेऊन ‘फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन’ हे तरुणांच्या गळ्यात मारायला पुढे सरसावल्या. अपवर्ड मोबिलिटीची स्वप्न पाहणाऱ्या अनेकांना आपल्या रंगरूपाच्या कॉम्प्लेक्सनं जागतिक ब्रॅण्ड्स आणि वस्तूंकडे वळवलं. पुढे तर ‘पाउच’ मार्केटिंग करत पाच-दहा रुपयांना वस्तूंच्या रूपात स्वप्नं विकायला सुरुवात झाली. जाहिरातीही सांगत की, उजळ रंगाच्या मुलीला करिअर-नोकरी-कुटुंबात आणि लग्नातही जास्त संधी आहेत.  

तू चीज बडी मस्त मस्त यावरून तर किती वाद आणि व्हॅलेंटाइन्स डेला केवढी तोडफोड. प्रेमात पडण्याची बंडखोरी करू; पण आई-वडिलांनी परवानगी दिली तर थेट जा सिमरन जी ले अपनी जिंदगी! -असं ते सॅण्डविच तारुण्य होतं. त्या तारुण्याला स्वप्नं चिक्कार होती; पण पायातल्या जुन्या बेड्या मात्र पुरेशा मजबूतही होत्या. अशा काळातल्या विश्वसुंदऱ्यांचा भाव वधारलेला असणं हे तसं स्वाभाविकच होतं! १९९४ ते २०२१ -सत्तावीस वर्षे उलटली. इतक्या काळानंतर  चंदीगडसारख्या शहरातल्या आजच्या परिभाषेत स्मॉल टाऊन गर्लच असणाऱ्या हरनाज कौर संधू नावाच्या मुलीने मिस वर्ल्ड होण्याचं स्वप्न खरं करून दाखवलं. देशाच्या वाट्यालाही साधारण २१ वर्षांनी पुन्हा हा विश्वसुंदरीचा मुकुट आला. १९९४ मध्ये विशीतही नव्हती ती पिढी आता चाळिशी पार आहे. जागतिकीकरणाचे आणि ब्रॅण्ड घडण्या-घडवण्या-बिघडण्या-बिघडवण्याचे सारे रंग गेल्या २५ वर्षांत देशानं पाहिले.  वायटुकेपासून सोशल मीडियाच्या ‘पीडीए’ (पब्लिक डिस्प्ले ऑफ अटेंशन) पर्यंतचा प्रवास झाला.

आज विशीत असलेल्या पिढीने देशातल्या वेगवान बदलाचा तो जुना काळ पाहिलेला नाही. क्वेर्टी मोबाइलवर एसएमएस टाइप करण्याचे कष्ट काय होते, हेही त्यांनी अनुभवलेलं नाही. त्या पिढीची प्रतिनिधी आहे जेमतेम २१ वर्षांची हरनाज. इंटरनेटचाच नाही तर जगण्याचा सुपरस्पीड हीच नॉर्मल गोष्ट आहे आज. आयडॉल्स-आयकॉन काही नसतं, फार तर इन्फ्ल्युएन्सर्स असतात, असं मानणारी आणि गोष्टी बदलतात चटकन, तेच नॉर्मल असतं असं मानणाऱ्या पिढीची हरनाज!  अंतिम फेरीतलं तिनं दिलेलं उत्तरच पुरेसं बोलकं आहे आणि विचारण्यात आलेला प्रश्नही. एरव्ही ‘ब्यूटी विथ ब्रेन’ म्हणून मिरवता यावं म्हणून या जागतिक व्यासपिठांवरही समाजसेवा, स्वप्नरंजक सामाजिक भेदावरचे प्रश्न विचारले जात. हरनाजला विचारलेला प्रश्नही होता ‘आजच्या तरुण मुलींना तू काय सल्ला देशील, त्यांना जो काही ताण आहे तो कसा हाताळावा?’ 

क्षणभर थांबून ठाम आत्मविश्वासानं ही २१ वर्षांची मुलगी म्हणाली, आज तरुणांसमोर जर कुठलं मोठं आव्हान असेल तर ते आहे स्वत:वरच विश्वास ठेवणं. आपण ‘एकमेव-युनिक’ आहोत ही भावनाच तुम्हाला सुंदर बनवते.  इतरांशी तुलना करणं सोडा, जगभरात बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या पाहा. स्वत:साठी बोला, आवाज उठवा. तुमच्या आयुष्याचे तुम्हीच नेते आहात. मी माझ्यावर भरवसा ठेवला म्हणून तर मी आज इथं उभी आहे.’ - ही भाषा खास मिलेनिअल्सची. 

जगभरात साधारण सारखीच. वयाच्या विशीतली ही मुलं आता ब्रॅण्ड्स, त्यांचा चकचकित प्रचार, त्यातली मोठायकी यांना भुलत नाहीत. त्यांना नव्या जगण्याची आस आहे, ते स्वत:वर भरवसा ठेवून इतरांना प्रश्न विचारायला कचरत नाहीत आणि नुसत्या मार्केटिंगला भुलत नाहीत. मात्र, तरीही एक भुलभुलय्या त्यांच्यासमोर आहेच, सोशल मीडियात सतत जगणं हॅपनिंग आहे असं दाखवण्याचा आणि इतरांशी तुलना करत कॉम्प्लेक्स देणाऱ्या डिजिटल जगण्याचा.. डिजिटल फुट प्रिण्ट्सचे या जगाचे प्रश्न आजवरच्या तरुण पिढ्यांपेक्षा वेगळे असतील हे तर उघड आहे. आणि तरुणांच्या जगात शिरण्याची बाजारपेठीय स्पर्धाही जास्त तीव्र होण्याची चिन्हं आजच दिसत आहे.

त्यासाऱ्यातून स्वत:ला आपण आहोत तसं स्वीकारणं हे आव्हान असेल हे जे हरनाज सांगतेय, ते म्हणूनच खरं आहे. म्हणून बदलत्या जगाची ही नवी विश्वसुंदरीदेखील नवी भाषा बोलते आहे !

Web Title: spacial editorial The story of the new Miss Universe for millennials harnaaz kaur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.