विदर्भात घोडा अडला; पण भाकरी करपली नाही!
By Shrimant Maney | Published: December 15, 2021 08:57 AM2021-12-15T08:57:44+5:302021-12-15T08:58:24+5:30
वेळीच सोंगट्या फिरविण्याचे भान राखले की राजकारणात बाजी पलटवता येते. नागपुरात भाजपची भाकरी करपली नाही, ती त्यामुळेच!
श्रीमंत माने, कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर
ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे राज्यभरातील महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका नेमक्या कधी होतील, हे कोणी सांगू शकत नाही. परंतु, त्यांच्या तोंडावर नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघात वसंत खंडेलवाल यांचा विजय भाजपला दिलासा देणारा आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र आले, तर भाजपला विजय शक्य नाही, हा गेल्या दोन वर्षांतला दावा खोटा ठरला. आधी तो समज पंढरपूरमध्ये खोडून निघाला. आता विदर्भात धक्का बसला. विदर्भात भाजप व काँग्रेस हेच मुख्य पक्ष असल्याने आणि राष्ट्रवादी व शिवसेनेची ताकद कमी असल्यानेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळाची भाषा बोलताहेत व शरद पवार यांच्यासह सगळे त्यांना टोमणे मारताहेत. नागपूरच्या निकालामुळे ते टोमणे वाढतील.
नागपूरमध्ये वर्षभरापूर्वी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने भाजपला धक्का दिला होता. उमेदवाराची निवड चुकल्यामुळे तब्बल ५८ वर्षांनंतर भाजपला या मतदारसंघात पराभव पाहावा लागला. संदीप जोशी यांना पराभूत करून काँग्रेसचे अभिजित वंजारी निवडून आले. या पराभवातून, नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या विसंवादातून भाजपने धडा घेतला. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली गेली. ते गडकरींच्या जवळचे. पण, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन फडणवीसांनी त्यांच्या विजयासाठी परिश्रम घेतले. विजय सोपा असूनही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील मताधिक्य वाढावे म्हणून नागपुरात येऊन गेले. या सगळ्याचा परिणाम निकालात दिसला. भाजपच्या तिकिटावर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची संख्या ३२५ असताना, बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली. जवळपास दुप्पट मतांच्या फरकाने बावनकुळे विजयी झाले.
भाजपमधून आयात केलेले रवींद्र भोयर यांना मतदानाच्या आदल्या रात्री बाजूला करून अपक्ष मंगेश देशमुख यांना पाठिंबा देण्याचा काँग्रेसचा निर्णय अजूनही अनाकलनीय आहे. तरीदेखील १८६ मते देशमुखांकडे वळविण्यात आलेले यश हेच काँग्रेसला समाधान. पदवीधरप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातही चमत्कार घडविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न फसला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व सोबतच डॉ. नितीन राऊत, सुनील केदार यांचे सगळे डावपेच संख्याबळापुढे फसले. रवींद्र भोयर यांच्या ताकदीबद्दल खूपच अपेक्षा काँग्रेसने बाळगल्या होत्या. प्रत्यक्षात ते काँग्रेसकडे गेल्याने भाजपचे लोक खूश होते. त्यामुळेच ते गेले की पाठविले, यावर जोरदार चर्चा झडल्या. खरे तर माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्यारूपाने असा चमत्कार घडवू शकणारा उमेदवार काँग्रेसकडे होता. याआधी त्यांनी तो घडविलाही आहे. पण, मुळक मोठे झाले तर आपले काय होईल, हा विचार करून त्यांचे पंख उमेदवारीआधीच कापण्यात आले.
अकोल्यातील शिवसेनेचा पराभव महाविकास आघाडीच्या अधिक जिव्हारी लागणारा आहे. तीन जिल्ह्यांत मिळून संख्याबळात क्रमांक एकचा पक्ष भाजप असला तरी, दोन्ही काँग्रेस व शिवसेनेची एकत्रित ताकद त्यापेक्षा अधिक आहे. अठरा वर्षे विधानपरिषदेत राहिलेले गोपीकिशन बाजोरिया यांच्यासारखा तगडा उमेदवार रिंगणात होता. बाजोरिया यांची ताकद यावरूनच स्पष्ट व्हावी, की त्यांनी त्यांचे पुत्र विप्लव यांना बाजूच्या मराठवाड्यातल्या हिंगोली-परभणीमधून निवडून आणले. कदाचित त्यामुळेच ते गाफील राहिले. महाविकास आघाडी एकसंध राहिली नाही. ॲड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी नावाला का होईना, तटस्थ राहिली. म्हणजे ती मते वसंत खंडेलवाल यांच्याकडे गेली.
थोडक्यात हे निकाल सांगतात की, घोडा अडला, भाकरी करपली, पाने नासली हे राजकारणात एकाचवेळी घडत नाही. सोंगट्या फिरविण्याचे भान राखले की हे टाळता येते. म्हणूनच नागपूरमध्ये भाजपची भाकरी करपली नाही. वऱ्हाडात मात्र अठरा वर्षे चौखूर उधळलेला शिवसेनेचा घोडा अडला.