मराठीत बोला
By admin | Published: February 26, 2017 11:24 PM2017-02-26T23:24:13+5:302017-02-26T23:24:13+5:30
आज २७ फेब्रुवारी. कुसुमाग्रजांचा वाढदिवस. तात्यासाहेब आपल्यातून जाऊन १६ वर्षे झालीत.
आज २७ फेब्रुवारी. कुसुमाग्रजांचा वाढदिवस. तात्यासाहेब आपल्यातून जाऊन १६ वर्षे झालीत. त्यांची स्मृती येत नाही असा दिवस नसतो आणि आज जागतिक मराठी दिनही आपण करतोय. म्हणजे काय करायचं? आपल्याच मराठीची आपण आठवण काढायची, आपली मराठी किती लाघवी आहे, प्रभावी आहे, प्रखर आहे आणि आपली आई आहे हे म्हणायचं. पण आपली सध्याची तरुण पिढी किती मानते? मध्यंतरी यूपीएससीचे निकाल लागले. एका खेडेगावातील मुलाने ठरवून ही परीक्षा दिली आणि तो पास झाला. त्याला बाहेरचे कुठलेच क्लास नव्हते. इंग्रजीचा बागुलबुवा नव्हता. महागडे कपडे घालून सजविलेला डामडौल नव्हता. तो तोंडी परीक्षेला गेला, तेही चपला घालून. त्याचं कौतुक पेपरात आलं. आपण ते वाचलं. विसरून गेलो. पुन्हा आईबाप मुलाच्या बुटांचे बंद बांधायला मोकळे झाले. आपल्याला हे कधी आणि केव्हा पटणार की आपणच वाढविलेला हा रोग आहे. इकडे इंग्रजीचं अवसान वाढतंय म्हणून मराठीचा आपण जयजयकार करायचा. प्रथम आपल्या कळकट मराठी शाळा आपण सुधारायला हव्यात. माणसांना स्वत:ला जर मराठीची जाणीव नसेल तर तो ती बोलणार नाही. अंगीकारणार नाही. पुन्हा गर्वाने आपण सांगणार पुढील दहा-वीस वर्षांत मराठी शाळा बंद पडणार ! फक्त इंग्रजीच शाळा राहतील. मुलं घरी येतील. मुलगा काळजीने होमवर्क करायला बसेल आणि आईबाबा त्याच्या पुस्तकातल्या भाज्या, फुलं, फळं कुठे मिळतील हे पाहत राहतील, कारण ती परदेशातील हवामानातली. आपल्या इथे कुठे पिकणार? जिथे पिकत नाही तिथे हे विकलं जातं. आपल्याला अंधानुकरण फार आवडतं. म्हणून तर मराठी पुस्तक वाचणं कमअस्सल वाटतं. चेतन भगत आपल्याला पटतो कारण ज्या गोष्टी शिक्षक आपल्या कानीकपाळी ओरडून मराठीत सांगतात त्या गोष्टी चेतन व्यवस्थित इव्हेंट मॅनेजमेंट करून सांगतो. आपल्याला ते पटतं. माझा पोरगा छानछोकीत वाढला पाहिजे, दिसला पाहिजे हे महत्त्वाचं! त्याला मिळणारं ज्ञान कसं मिळतं ते आपण पाहत नाही.
हे बघा मरेपर्यंत आई कुणीच विसरत नाही कारण ती आपल्याला घडवते म्हणून! तशी ही मराठी जन्मापासून आपण जपली पोसली, वर्धमान केली तर केवळ एक दिवसाचे स्मरण पुरेसे नाही. श्यामची आई किती वर्ष राहिली? अजून आहे ना? राहील. आपण विश्वासाने मराठीत एक पाऊल टाकू या. त्यासाठी बुद्धिमानांनी एक काम करा विज्ञान आणि तंत्रज्ञान मराठीत कसे येईल ते बघावे. यासाठी आपणच शासनाच्या मागे लागून हे काम करायला हवे. शासन करीत नाही असे नाही. आपण पुरेसे मागे लागत नाही. सदैव होकारार्थी दृष्टिकोन, ठेवून बोलायला हवे, मग एक दिवसापुरता ‘मराठीत बोला’ म्हणण्याची गरज नाही, सदैवच लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ! या मराठी भाषेचे आपण कृतज्ञ उतराई होऊ !
-किशोर पाठक