हरिरामाला सांगा बलात्काराचा अर्थ

By admin | Published: May 7, 2015 11:17 PM2015-05-07T23:17:46+5:302015-05-07T23:17:46+5:30

लग्न हे पवित्र बंधन असल्यामुळे त्यातल्या नवऱ्याने बायकोवर केलेला बलात्कार हा अपराध ठरत नाही, हा केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिराम चौधरी यांचा सुविचार त्यांच्या सरकारला,

Speaking of Harirama means rape | हरिरामाला सांगा बलात्काराचा अर्थ

हरिरामाला सांगा बलात्काराचा अर्थ

Next

लग्न हे पवित्र बंधन असल्यामुळे त्यातल्या नवऱ्याने बायकोवर केलेला बलात्कार हा अपराध ठरत नाही, हा केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिराम चौधरी यांचा सुविचार त्यांच्या सरकारला, पक्षाला व परिवाराला मान्य असला तरी या देशातील स्त्रियांना व सुजाण समाजाला मान्य होणारा नाही. बायकोला भोगाचे साधन समजणाऱ्या नवरोजींचा अपवाद वगळला तरी नवरा असण्याची चांगली समज असणाऱ्या पुरुषवर्गालाही तो मान्य होणारा नाही. लग्न हे पवित्र बंधन असल्याचे हे हरिरामांना आठवत असेल तर त्या ‘पवित्र’ गोष्टीशी संबंध असणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी ते क्षम्य व स्वागतार्ह ठरविणार आहेत? हुंडा घेणे, वधूपक्षाला कमी लेखणे, वरपक्षाची बडदास्त राखणे, ‘तुला आता माहेर मेले आहे’ असे माहेरच्यांनी मुलीला सांगणे हे सगळे त्या पवित्र बंधनात एकेकाळी बसणारे होते. आताच्या मुली व सुशिक्षित स्त्रिया यातली कोणतीही गोष्ट मान्य करीत नाहीत हे या हरिरामांना कोणी सांगायचे की नाही? आपला देश आणि त्याच्या संवैधानिक संस्था या कधीकधी फार गंमती करतात. या हरिरामांच्या अगोदर अशी गंमत आपल्या न्यायासनानेही केली आहे. बायकोने नवऱ्याच्या नातेवाइकांशी धरलेला दुरावा हा तिने नवऱ्याचा केलेला छळ समजावा असे सांगणाऱ्या या न्यायासनाने नवऱ्याने बायकोला केलेली माफक मारहाण हा छळ समजू नये असेही म्हटले आहे. तो निर्णय देताना माफक मारहाण म्हणजे किती मारहाण ते मात्र त्याने सांगायचे टाळले आहे. भारतातील ७५ टक्के स्त्रियांना विवाहातल्या बलात्कारांना नाइलाजाने व प्रसंगी मारहाण सहन करून सामोरे जावे लागते हा संयुक्त राष्ट्र संघाच्या विधीविषयक समितीचा अहवाल या हरिरामांना ठाऊक आहे की नाही? सुशिक्षित समाजात वाढू लागलेले घटस्फोटांचे प्रमाण त्यांना दिसते की नाही? पर्याय नाही म्हणून सारे काही सहन करीत नको तशा नवऱ्यासोबत आयुष्य काढणाऱ्या स्त्रिया हा आमचा वैवाहिक आदर्श आहे असे या गृहमंत्र्याच्या पदावर असलेल्या इसमाला वाटते काय? स्त्रियांच्या सबलीकरणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. सबलीकरणाचा अर्थ स्त्रियांना बरोबरीची व सन्मानाची वागणूक देणे व त्यांच्या इच्छांचा आदर करणे असा होतो. आपल्या कुटुंबजीवनात स्त्रीला बरोबरीची वा सन्मानाची वागणूक क्वचितच दिली जाते व तिची इच्छाही फारशी विचारात घेतली जात नाही. वैवाहिक संबंधात तर ती गृहीतच धरली जाते. स्वातंत्र्याचा आरंभ स्वत:च्या देहावरील स्वत:च्या अनिर्बंध अधिकारापासून सुरू होतो. त्याचा वापर दुसऱ्या कोणीही आपल्या संमतीखेरीज करू नये असे सांगता येणे ही स्वातंत्र्याची सुरुवातही असते. आपल्याकडे या गोष्टी अभावानेच आढळणाऱ्या आहेत. स्त्रीचा आत्मसन्मान वाढविण्याची, तिला तिच्या नागरिकत्वाची जाणीव करून देण्याची व सरकारसह समाज आपल्या पाठीशी असल्याची तिची खात्री पटवून देण्याची आज गरज आहे. अशावेळी तिला तिच्या पायातील ‘पवित्र’ सांस्कृतिक बेड्यांची आठवण करून देणे हाच अपराध आहे. त्यात नुसते मागासलेपणच नाही, तर पुरुषी अहंकाराएवढीच एका अक्षम्य गुन्हेगारीवर पांघरूण घालण्याची वृत्ती दडली आहे. नवऱ्याने केलेल्या मारहाणीपासून लैंगिक अत्याचारापर्यंतचे सगळे अपराध सहन करून आपले पातिव्रत्य सांगण्याची ‘सिंधू परंपरा’ आता शंभर वर्षांएवढी जुनी व टाकाऊ झाली आहे. या काळात जग फार पुढे निघून गेले. त्याबरोबरच त्यातल्या स्त्रियांनीही आपल्या विकासाची फार मोठी वाटचाल केली आहे. या बदलाची दखल घेऊन त्यांना अनुरूप ठरणारे कायदेही दरम्यानच्या काळात सरकारने केले. पत्नीवरचा बलात्कार हाही अपराधच ठरवून त्याची दखल घ्यायला या काळात न्यायासनांनी सुरुवात केली. प्रगत देशांत तर तो घटस्फोटाचे एक सबळ कारणही बनला. हरिराम चौधरी या साऱ्या काळाबाबत व बदलांबाबत अनभिज्ञ राहिले असावे वा या बाबी त्यांच्या लक्षातच आल्या नसाव्या. मनाने १९ व्या शतकात जगणाऱ्या आपल्या परंपरावाद्यांसारखेच ते होते तेथेच राहिले. त्यांच्या सुदैवाने त्यांच्या अवतीभवतीची माणसेही याच काळात प्रत्येक हिंदू बाईला चार ते दहा पोरे झालीच पाहिजेत असे म्हणणारी निघाली. बाईचे खरे कार्यक्षेत्र तिचे घर व फार तर अंगण हेच आहे असे सांगणारे पाठीराखेही त्यांना या काळात मिळाले. आपल्या समाजाने स्त्रीला सहनशक्तीची देवता मानून तिला नको ते सारे सहन करायला लावण्याचा इतिहास रचला. त्या इतिहासाचे गोडवे गाणारे शाहीरही त्याच्यासोबत होते. अशावेळी बलात्कार व जबरी संभोग हा विवाहाबाहेरचा असो वा विवाहातला तो अपराधच असतो हे समजण्याएवढे साधे व कालोचित तारतम्य या हरिरामात उरले नसेल तर तो दोष त्याचा म्हणायचा की त्याच्यावर असाच संस्कार करणाऱ्या त्याच्या परिवाराचा? परंपरा आणि धर्म या स्त्रियांना न्याय देणाऱ्या बाबी नाहीत. त्यासाठी नव्या काळाच्या नव्या जाणिवांचा स्वीकार करणे गरजेचे आहे. मात्र या जाणिवांनाच अधोगती मानणारी मानसिकता जपणाऱ्या यंत्रणा ज्यांच्या मानगुटीवर बसल्या आहेत त्यांचे काय करायचे असते? अशी माणसे आश्रमात वा गुहेत राहिली तर एकदाची चालतात ती सरकारातल्या महत्त्वाच्या पदावर चढून बसली असतील तर त्यांना तेथून हाकलणे हेच लोकशाहीचे व आधुनिकतेचे मागणे ठरते.

Web Title: Speaking of Harirama means rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.