हैराण आहात?- ‘सेवा दला’कडे ५ उत्तरे आहेत! कट्टरतेकडे वळणाऱ्या तरुणांचा दोष नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 08:45 IST2025-03-26T08:44:10+5:302025-03-26T08:45:01+5:30

ही बिघडती परिस्थिती वेळीच सावरायची, तर ‘राष्ट्र सेवा दला’कडून काही धडे घेऊया!

special arrticle on rashtra seva dal youth influenced by extremism | हैराण आहात?- ‘सेवा दला’कडे ५ उत्तरे आहेत! कट्टरतेकडे वळणाऱ्या तरुणांचा दोष नाही...

हैराण आहात?- ‘सेवा दला’कडे ५ उत्तरे आहेत! कट्टरतेकडे वळणाऱ्या तरुणांचा दोष नाही...

योगेंद्र यादव, राष्ट्रीय संयोजक, भारत जोड़ो अभियान सदस्य, स्वराज इंडिया

सुरुवातीला मी त्यांच्याकडे ओढला गेलो ते त्यांच्या गाण्यांनी. त्यातले सगळे मराठी शब्द मला कळत नव्हते; पण गायक सुरेल होता आणि शब्द भावपूर्ण. एखाद्या राजकीय सभेत हे चित्र दुर्लभ असते. तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ठाण्यात समाजवादी जनपरिषदेच्या उद्घाटनाचे अधिवेशन होते. महाराष्ट्रातील सळसळत्या सार्वजनिक जीवनाशी आलेला हा माझा पहिला संबंध. या अधिवेशनात सहभागी चळवळ्या तरुणांचे पाणी काही वेगळेच होते. ध्येयवाद, ठाम विचारसरणी, उत्साह आणि शिस्तबद्धता!  उत्तर भारतात मला नेहमी दिसणाऱ्या उग्र, आक्रस्ताळ्या आणि बेलगाम आंदोलकांपेक्षा हे चित्र अगदीच वेगळे होते. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व आणि अभिव्यक्तीची रीत वेगळी, तरी ती सारी जणू एकाच आईची लेकरे वाटत होती. कुठून बरं शिकून आली असतील ही मंडळी?- तेवढ्यात ‘सेवा दल’ हा शब्द माझ्या कानी आला. यातल्या प्रत्येकाचा राष्ट्र सेवा दलाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध होता.
काँग्रेस पक्षांतर्गत या संघटनेची स्थापना १९४१ मध्ये समाजवाद्यांनी केली होती. राष्ट्रवाद, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि बुद्धिप्रामाण्यवाद या तत्त्वांना ही युवक संघटना बांधील होती. त्यावेळी राजकीयदृष्ट्या नगण्य असणाऱ्या ‘आरएसएस’ला उत्तर म्हणून तिची स्थापना झाली नसली तरी दोन्हींतील विरोध उघड होता. स्थानिक मुले खेळण्यासाठी, शारीरिक शिक्षण आणि बौद्धिकांसाठी एकत्र जमत. वैचारिक चर्चा होत. स्वातंत्र्यानंतर सेवा दल काँग्रेसमधून बाहेर पडून समाजवादी पक्षांना पूरक काम करत राहिले. साने गुरुजी हे सेवादलाचे प्रेरणास्रोत. त्या कार्यक्रमात मी ऐकलेले ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हे गीत त्यांचेच!
महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणावर सेवा दलाचा किती सर्वव्यापी आणि सखोल ठसा उमटला आहे, हे मी अनेक वर्षे पाहत आलो. छात्र भारती, समाजवादी महिला सभा, मुस्लिम सत्यशोधक समाज, समाजवादी अध्यापक सभा अशा अनेक संघटनांची गंगोत्री सेवा दल हीच आहे. त्याशिवाय भारतीय भाषांतील भावबंध वाढवणारी आंतरभारती आणि विधायक कार्य करणारे सेवापथक, कलापथक ही दलाची अविभाज्य अंगे आहेत. एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन आणि साने गुरुजी मेमोरियल ट्रस्ट या संस्थाही गुरुजींचा वारसा जपत आहेत.
महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील नानाविध क्षेत्रांत नावारूपाला आलेले अनेक धुरीण सेवा दलाशी संबंधित आहेत. सेवा दलातून आलेले कार्यकर्ते, व्यावसायिक, साहित्यिक, शिक्षक, पत्रकार, कलाकार आणि सेवा दलातूनच प्रेरणा घेऊन स्थापलेल्या विविध संस्था, आंदोलने आणि नियतकालिके वजा केली तर महाराष्ट्राचे सार्वजनिक जीवन निश्चितच गतप्रभ होईल. स्थापनेनंतरची पहिली दोन दशके सेवा दलाचे सामर्थ्य आणि सामाजिक स्थान अजोड होते. आज ते तसे उरलेले नाही. तरीही आपल्या घटनात्मक प्रजासत्ताकाच्या पुनर्प्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या, खोलवर प्रभाव पाडणाऱ्या राजकारणाचा आदर्श सेवा दल आपल्यासमोर ठेवू शकते. एक गोष्ट नक्की. भाजपला केवळ निवडणुकीपुरता विरोध करून आपल्या प्रजासत्ताकाची आज होत असलेली ढासळण मुळीच थांबवता येणार नाही. त्यासाठी नागरिकांचे राजकीय प्रबोधन, तरुणांमध्ये घटनात्मक मूल्यांची जोपासना, मुद्दे आणि कार्यक्रम यांची सर्जनशील बांधणी, राजकीय कार्यकर्त्यांचे व नेत्यांचे सुयोग्य प्रशिक्षण आणि भारत नावाच्या या संकल्पित समुदायाची पुनर्निर्मिती यांचा समावेश असलेले सखोल राजकारण आवश्यक आहे. राष्ट्र सेवा दलाने नेमके हेच साधले होते. आज याच गोष्टींची आपल्याला तीव्र गरज आहे.
सेवा दलाकडून घ्यावयाचे धडे असे : 
१.  केवळ युवकांकडे नव्हे, तर कुमारवयीन शालेय विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला हवे. 
२. राजकीय प्रबोधनावर नव्हे, तर क्रीडा-सांस्कृतिक उपक्रमांच्या आधारे मुलांचे चारित्र्य घडवण्यावर भर असला पाहिजे. 
३. घटनात्मक मूल्ये, धर्मनिरपेक्ष समाजवादी विचार रुजवण्याचे  सारे प्रयत्न सकारात्मक राष्ट्रवाद, रसरशीत प्रादेशिक संस्कृती आणि आपली सांस्कृतिक वैशिष्ट्ये यावरच आधारित असावेत. 
४. अन्यायाविरुद्धच्या संघर्षाला विधायक कार्यक्रमाची जोड हवी.
५. निवडणुकीचे राजकारण आणि राजसत्ता या क्षेत्रात हस्तक्षेप करत असताना कोणत्याही राजकीय पक्षापासून दोन हात दूर राहण्याची दक्षता घ्यावी.
काही प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला हवेत. घटनात्मक मूल्ये जोपासणाऱ्या संघटना आपण उभारल्या का? अभ्यास मंडळांचा समकालीन अवतार कुठं आढळतो का? युवकांना त्यांच्या दैनंदिन समस्या आणि व्यथा यांचा संबंध कुणी एकंदर राजकारणाशी जोडून दाखवत आहे का? - दोष युवकांचा नाही. आपला आहे. आपल्याकडे आदर्श उपलब्ध आहे. मुद्दा आहे तो वेळ उलटून जाण्यापूर्वीच त्या आदर्शानुरूप कृती करण्याचा. हे एक आव्हान आहे. समकालीन साने गुरुजींच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेले हे एक उदात्त जीवनकार्य आहे.

yyopinion@gmail.com

Web Title: special arrticle on rashtra seva dal youth influenced by extremism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.