विशेष लेख: दिल्लीत (पुन्हा) सुरू झाली ज्योतिषांची चलती, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 07:44 AM2024-08-29T07:44:32+5:302024-08-29T07:45:39+5:30

चांगले डावपेच आखले तर भाजप पराभूत होऊ शकतो, हे लक्षात आल्याने राजकीय वर्तुळात धंदा बसलेले ज्योतिषी पुन्हा कामाला लागले आहेत!

Special Article Astrologers movement restarted in Delhi | विशेष लेख: दिल्लीत (पुन्हा) सुरू झाली ज्योतिषांची चलती, कारण...

विशेष लेख: दिल्लीत (पुन्हा) सुरू झाली ज्योतिषांची चलती, कारण...

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली |

२०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २७२चा जादुई आकडा गाठता न आल्यामुळे राजधानी दिल्लीत ज्योतिषांची पुन्हा चलती झाली आहे. प्रतिस्पर्ध्यांना गारद करून मोदी यांनी स्पष्ट बहुमत मिळविल्यामुळे या मंडळींना गेली १० वर्षे काही काम नव्हते. शिवाय मोदी यांच्या कार्यशैलीमुळे त्यांच्या डोक्यात काय चालले आहे याचा अंदाज बांधणे फारच कठीण होते. मात्र, २०२४ साली परिस्थिती बदलली असून, चांगले डावपेच आखले तर भाजपला पराभूत करता येऊ शकते हे बिगरभाजप पक्षांच्या लक्षात आले आहे. स्वाभाविकच राजकीय वर्तुळात धंदा बसलेले ज्योतिषी लगबगीने पुन्हा कामाला लागले आहेत.

सर्वच राजकीय पक्षनेत्यांच्या घरात हल्ली ते अधूनमधून दिसतात. काही केंद्रीय नेत्यांसह अनेक ज्येष्ठ नेते कौटुंबिक ज्योतिषी बाळगतात हे जगजाहीर आहे. अधूनमधून ते त्यांचा सल्ला घेत असतात. राज्यसभेतील एक खासदार स्वतःच ज्योतिष सांगतात. हे मंत्रीजी त्यांच्या विश्वासू ज्योतिषाचा सल्ला घेतल्याशिवाय पाऊलही टाकत नाहीत. अर्थात, हे सगळे सावधपणे केले जाते.
भाजपला हरयाणात ‘आप’ची चिंता का? 

भाजपला जम्मू आणि काश्मीरविषयी फारशी काळजी नाही. परंतु, हरयाणाचा प्रश्न येतो तेव्हा मात्र भाजप नेते चिंतित दिसतात. आम आदमी पक्षाने हरयाणात सर्व ९० जागा लढविण्याचे ठरविल्याने भाजप चिंतित आहे. राज्यात जाट समाजाचे प्राबल्य असून, तो पूर्णतः काँग्रेसच्या पाठीशी आहे. मुस्लिमांचीही त्या पक्षाला मदत होते. लोकसभेतील खासदार कुमारी सेलजा यांना काँग्रेसने संभाव्य मुख्यमंत्री म्हणून समोर ठेवले असून, दलित समाजालाही आपल्याकडे ओढण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे कुमारी सेलजा अलीकडेच सोनिया गांधींना भेटल्या. हुडा मंडळीविषयी त्यांनी सोनिया गांधींकडे तक्रारी केल्या असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यातल्या निवडणुकीच्या तोंडावर या कुरबुरी चव्हाट्यावर येऊ नयेत म्हणून सोनिया गांधी कदाचित उभय नेत्यांत तडजोड घडवून आणतील, असे दिसते. हरयाणात आप स्वबळावर लढणार असल्याने भाजपच्या चिंतेत भर पडली. कारण मध्यमवर्गीय तसेच बिगरजाट समुदायातील मते हा पक्ष आपल्याकडे खेचून घेईल. लोकसभा निवडणुकीत आपने काँग्रेसबरोबर समझौता केला होता. काँग्रेसने लोकसभेच्या नऊ जागा लढविल्या, तर ‘आप’ला कुरुक्षेत्रची एक जागा मिळाली. २०१९ सालच्या निवडणुकीत एकही जागा न मिळालेल्या काँग्रेसने यावेळी पाच जागा जिंकल्या. मात्र, ‘आप’ला एकही मिळाली नाही. भाजप पाच जागा हरला.

२०१९ साली ५८.२१ टक्के मते मिळविणाऱ्या भाजपला यावेळी ४६.११ टक्के मते मिळाली. काँग्रेसची मतांची हिस्सेदारी मात्र २८.५१ टक्क्यांवरून ४३.६७ टक्क्यांवर गेली. केवळ एक जागा लढविणाऱ्या आपलाही ३.९४ टक्के मते मिळाली. भाजपची अब्रू थोडक्यात वाचली. कारण, ९० पैकी ४४ विधानसभा मतदारसंघांत पक्षाला थोडे मताधिक्य दिसले. ४२ मतदारसंघांत काँग्रेसचा वरचष्मा आढळला, तर ‘आप’चा चार ठिकाणी. आप भाजपची बिगरजाट मते खाईल असे म्हटले जाते. इंडियन नॅशनल लोकदल आणि दुष्यंत चौटाला यांची जेजेपी या दोन अन्य जाटबहुल पक्षांनी अनुक्रमे गेल्या लोकसभा निवडणुकीत अनुक्रमे १.७४ टक्के आणि ०.८७ टक्के मते मिळवली आहेत. एकूणच  या बदललेल्या परिस्थितीत हरयाणामध्ये सत्ता संपादन करणे भाजप नेतृत्वाला चिंतेचे वाटते आहे.

व्हर्च्युअल की प्रत्यक्ष? 
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑगस्टला महाराष्ट्र दौऱ्यावर असून, ७६,००० कोटींच्या वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन ते करतील, अशी शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून, भारतातील तो सर्वात मोठा प्रकल्प असेल. भविष्यातील भारतासाठी मध्य पूर्व आणि युरोपियन कॉरिडॉर तसेच आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडॉर यासाठी ते प्रवेशद्वार ठरेल. पालघर जिल्ह्यात हा प्रकल्प प्रस्तावित आहे. वेळेअभावी पालघरला न जाता पंतप्रधान मुंबईतून त्याचे ऑनलाइन उद्घाटन करतील अशी शक्यता दिसते. विविध कारणांनी शेतकऱ्यांचा त्या प्रकल्पाला विरोध असल्याचे समजते.

Web Title: Special Article Astrologers movement restarted in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.