अन्वयार्थ: सध्या देशात अनेकांना फार अस्वस्थ वाटते आहे, कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2023 09:50 AM2023-04-04T09:50:34+5:302023-04-04T09:51:35+5:30

राजकीय विरोधक म्हणजे ज्यांच्यावर राग धरावा, ज्यांची थट्टा करावी किंवा ज्यांना चिरडून टाकावे, असे व्यक्तिगत शत्रू नव्हेत, हे लक्षात घेणे गरजेचे आहे!

Special Article by Former Union Minister Ashwani Kumar on Modern Political Crisis | अन्वयार्थ: सध्या देशात अनेकांना फार अस्वस्थ वाटते आहे, कारण...

अन्वयार्थ: सध्या देशात अनेकांना फार अस्वस्थ वाटते आहे, कारण...

googlenewsNext

अश्वनी कुमार, माजी केंद्रीय कायदामंत्री

भारताच्या राज्यघटनेची पायमल्ली होत असल्याची उदाहरणे हल्ली वारंवार समोर येत आहेत. लोकशाहीचे सत्त्व आणि खोली यावर त्यामुळे प्रश्नचिन्ह लागताना दिसते. अलीकडच्या काळात विरोधी पक्षनेत्यांनी संसदेत केलेल्या निवेदनांच्या नोंदी कामकाजातून वगळण्यात आल्या. राज्यसभेत पंतप्रधानांच्या भाषणात अडथळे आले. काही अपवाद वगळता लोकप्रतिनिधींचे सभागृहातले वागणे  बालिशपणाचे असल्याने संसदेचे पावित्र्य नष्ट होत आहे. जातीवरून भेदभाव केला गेल्याने आलेला मानसिक ताण असह्य होऊन देशाच्या अग्रगण्य शिक्षणसंस्थेत एका १८ वर्षांच्या मुलाने
आत्महत्या केली ; तसेच १६ वर्षांच्या एका विद्यार्थ्याला प्राचार्यांनी बदडून काढले ; कारण तो मुलगा त्यांच्या बाटलीतील पाणी प्यायला होता. या सर्व घटना सामाजिक विषमता अजूनही थैमान घालत असल्याचे यातनादायी स्मरण देणाऱ्या होत.
उत्तर प्रदेशमध्ये विरोधी पक्षाच्या एका विद्यमान आमदाराला १५ वर्षांपूर्वी वाहतूक अडवल्याच्या प्रकरणात दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली ; ही शिक्षाही अवाजवीच होती. राज्याच्या विधानसभेतील या सदस्याची आमदारकी त्यामुळे गेली. खटल्यांच्या कामकाजातून दमनचक्र फिरवले जात आहे. न्याय यंत्रणेची चाके फिरली की, अनेकांच्या प्रतिष्ठा धुळीला मिळतात. ही एक मानभंगाची उपाय नसलेली, न संपणारी कहाणी होऊन बसली आहे.

ही अशी संस्थात्मक अस्वस्थता देशाच्या घटनात्मक लोकशाहीच्या इमारतीला तडे जात असल्याचे सांगते. मात्र, या ढासळत्या लोकशाहीविषयी आपल्या राजकीय व्यासपीठांवर कोठेही फारसे बोलले जात नाही.  राजकीय पक्षांचे नेते भूतकाळ उकरून काढत एकमेकांवर चिखलफेक करतात. आपली राजकीय भाषाही अत्यंत दांभिक आणि व्यक्तिगत द्वेषाने भरलेली, राजकीय संकुचितपणा दाखवणारी झाल्याने वातावरण कलुषित होते. परस्परांचा आदर राखला जाईल, असे वचन घटनेने दिले. त्याला या वातावरणात नख लागते. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडतो. भाषा, संस्कृती, कल्पनाशक्ती आणि इतिहास हे घट्ट धाग्याने बांधलेले आहेत, हे आपल्याला ठाऊक आहे. आरडाओरडा करून नव्हे तर सभ्यपणे बोलूनच जे म्हणायचे ते लोकांपर्यंत पोहोचत असते.

आपल्या आदरणीय पूर्वजांनी त्यांची भव्य स्वप्ने गद्य -पद्यातून व्यक्त केली, ती आदर्शवादाने ठासून भरलेली होती. भव्य, उदात्त अशा ध्येयांसाठी त्यांनी मने प्रज्वलित केली. त्यांची भाषा हृदय आणि बुद्धी यांच्यातील दुवा झाली. लोकशाहीची भाषा सगळ्यांचे समजून घेणारी, संतुलित विचारांची आणि समजावून सांगणारी असते. ती कोणाला दुखावत नाही. उलट आदर करते. राजकीय विरोधक म्हणजे ज्यांच्यावर  राग धरावा, ज्यांची थट्टा करावी किंवा ज्यांना चिरडून टाकावे, असे व्यक्तीगत शत्रू नव्हेत ! लोकशाही म्हणजे एखाद्या बलदंड माणसाने दीन दुबळ्यांवर हुकूमत गाजवणे नव्हे. अतिरेक टाळून मध्यममार्ग स्वीकारणे लोकशाहीत अपेक्षित असते. सहज संवादातून हे उद्दिष्ट गाठता येते.

नेतेमंडळी बोलतात कसे याला लोकशाहीत महत्त्व असते. सार्वजनिक जीवनातील व्यक्तीचे स्थान त्यांच्या उच्चारणावर ठरते. आपण कोण आहोत, हेही त्यातून सांगितले जाते. म्हणून असे म्हणावेसे वाटते की, भारतीय लोकशाहीच्या मजबुतीकरणासाठी राजकीय संवादाचा दर्जा वाढवला पाहिजे. सभ्यतेची म्हणून काही ताकद असते. यावर विश्वास असणारे तर्कसंगत असे बोलणे व्हायला हवे.

सत्तारूढांनी लोकसत्ता योग्य प्रकारे वापरावी, हेच प्रजासत्ताकात अभिप्रेत आहे. सत्तेचा गैरवापर होत असेल तर, विरोधकांना त्याविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवता आला पाहिजे. सदसद्विवेकबुद्धीचा आवाज ऐकून जनमताचा कानोसा घेतल्यावर जे समोर येईल त्यावरच आपले राजकीय विश्व उभे आहे. याची वैभवशाली देशाचे नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्यांनी निदान कल्पना करावी आणि ते टिकून कसे राहील हे पहावे. तेच त्यांच्यापुढचे  सर्वात मोठे आव्हान आहे.

Web Title: Special Article by Former Union Minister Ashwani Kumar on Modern Political Crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.