बेचैनी, लाज-शरम.. काहीच कसे वाटत नाही?

By विजय दर्डा | Published: July 24, 2023 06:35 AM2023-07-24T06:35:57+5:302023-07-24T06:36:40+5:30

मणिपूरमध्ये दंग्यात बलात्कार हे जणू शस्त्र बनवले गेले आहे. एरवी छोट्या-छोट्या गोष्टींवर उसळणारा आक्रोश देशात का दिसत नाही?

special article by lokmat editorial board chairman vijay darda on Manipur Violence | बेचैनी, लाज-शरम.. काहीच कसे वाटत नाही?

बेचैनी, लाज-शरम.. काहीच कसे वाटत नाही?

googlenewsNext

विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

मणिपूरमध्ये दोन महिलांना रस्त्यावर विवस्त्र फिरवणे आणि सामूहिक बलात्काराच्या घटनांनी मन सुन्न झाले आहे. त्यातील एका महिलेचा पती लष्करातील सेवानिवृत्त सुभेदार असून, कारगिलच्या लढाईत लढला होता. श्रीलंकेमध्ये शांतीसेनेत सामील होता. देशाच्या संरक्षणात सदैव तत्पर राहिलेल्या या सुभेदारावर काय प्रसंग ओढवला असेल? पत्नीची ‘अब्रू वाचवू शकलो नाही, याचे मला दुःख होते’, असे त्याने म्हटले आहे. या शब्दांनी माझ्या कानात जणू उकळते शिसे ओतले.

मणिपूरमध्ये स्त्रियांची विवस्त्र धिंड, बेइज्जती आणि बलात्काराच्या घटनांनी देशाची मान खाली गेली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले ते बरोबरच आहे; परंतु  जळत  असलेल्या मणिपूरमध्ये बलात्कार हे हिंसेचे हत्यार बनवणारी अत्यंत लाजिरवाणी घटना घडलेली असताना देशात इतका सन्नाटा कसा? कोणत्याही धार्मिक स्थळांच्या बाबतीत छोटीशी घटना घडली तरी उसळून येणारे समाजातले ते लोक आता कुठे आहेत? मणिपूरमध्ये  मानवतेची अब्रू लुटली जात असताना आपला देश गप्प बसलेला असावा? अत्यंत दुःखद, लाजिरवाणी आहे ही शांतता!
ईशान्येकडील राज्यांबद्दल देशाच्या इतर भागांत पुरेशी संवेदना नाही. तिकडचे लोक जसे दिसतात, त्यामुळे लोकांची दृष्टी बदलत असावी का?  मणिपूरमध्ये जे घडते आहे ते जर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार किंवा उत्तर प्रदेशमध्ये होत असते तर? अख्खा देश उसळून आला असता; संतापाच्या ज्वाळा भडकल्या असत्या; पण मणिपूर जळत असताना मात्र देशात शांतता आहे, हे कसे? का? 

मी सतत प्रवासात असतो. लोकांना भेटतो. मणिपूरमध्ये काय होते आहे, याचा बहुतेकांना पत्ताच नाही, असे माझ्या लक्षात आले.  मणिपूरमध्ये दंगली का घडत आहेत, याचीही पुरेशी माहिती नसणे हा कोरडेपणा अत्यंत वेदनादायी आहे.

मणिपूरवर संसदेत चर्चा नक्कीच व्हायला हवी; पण महत्त्वाचे हे, की ही चर्चा नि:पक्षपाती झाली पाहिजे. काही विषय असे असतात की, ज्यावर विरोधी पक्षांकडूनही राजकारण होता कामा नये. अडीच महिने झाले तरी दंगलीवर काबू करता न येण्यामागे काही प्रश्न नक्कीच आहेत; परंतु पंतप्रधान किंवा गृहमंत्री काहीच करत नाहीत, हा आरोप निराधार आहे, असे होत नसते. स्थानिक पातळीवरच्या विभिन्न कारणांनीही त्यांचे प्रयत्न विफल होऊ शकतात, होतात. नक्षलवादाचेच उदाहरण घ्या. पश्चिम बंगालच्या नक्षलबाडी गावात १९६७ मध्ये सुरू झालेल्या नक्षलवादी दहशतीने देशाच्या अनेक भागांत हातपाय पसरले. चार दशके उलटली, तरीही नक्षली हिंसा निपटता आलेली नाही. त्यात अनेक राजकीय नेते मारले गेले. पोलिस आणि अर्धसैनिक दलाचे अनेक अधिकारी, शेकडो जवानांनी नक्षलवाद संपवण्यासाठी प्राणार्पण केले. मात्र, नक्षलवाद संपला नाही. याचा अर्थ सरकार काही करत नाही, असा नव्हे! दहशतवाद, दंगलींचा मुद्दा आला की, ‘त्यांना गोळ्या घालून ठार केले पाहिजे’, ही प्रतिक्रिया स्वाभाविक असली, तरी प्रशासकीय व्यवस्थेत संयमाने काम करावे लागते. कोणी निर्दोष मारला जाणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. अशावेळी डोक्यात राख घातलेला संताप आत्मघातकी ठरू शकतो.

मणिपूरमधील परिस्थितीशी संबंधित सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मार्ग काढला पाहिजे. ती केवळ सरकारची जबाबदारी नाही. महाराष्ट्रात मणिपूरमधील अनेक लोक काम करतात. कोणी पायलट आहेत, तर कोणी हवाई सुंदरी. काही महिला ब्युटीपार्लर किंवा स्पामध्ये काम करतात. इतरही काही व्यवसायांत त्या राज्यातील लोक आहेत. तिथली परिस्थिती समजून घेण्यासाठी मी त्यांच्यापैकी अनेकांशी बोललो. त्या सगळ्यांचे म्हणणे एकच आहे की, हा राजकीय प्रश्न नाही. मैतेई आणि कुकी, या दोन समुदायांमध्ये वर्चस्वाची ही लढाई आहे. मैतेई जास्त करून हिंदू धर्म मानतात, तर कुकी आदिवासी जन-जातीत ख्रिश्चन आणि इतर काही धर्मांचे अनुसरण करणारे लोक आहेत. याच दृष्टिकोनातून या संघर्षाकडे पाहिले पाहिजे. पूर्वोत्तर भारतातील जन-जातींमध्ये भीषण संघर्षाचा इतिहास मोठा आहे. नागालँडमध्ये तर एका समाजाच्या लोकांनी दुसऱ्या समाजाच्या लोकांच्या मुंड्या छाटण्याच्या घटना घडलेल्या आहेत.

मात्र, विकासाच्या या नव्या टप्प्यावर लोकशाही भारतात एका समूहाच्या लोकांनी दुसऱ्या समूहाच्या स्त्रियांना विवस्त्र फिरवणे किंवा त्यांच्यावर बलात्कार करणे, नवजात अर्भकांनाही ज्यात जळून मृत्यू आला, अशा रुग्णवाहिका जाळण्याच्या घटना हे सगळे अत्यंत वेदनादायक आहे. देशासाठी ही धोक्याची घंटा आहे. या संहारातील आकडे अंगावर काटा आणणारे आहेत. अडीच महिन्यांच्या हिंसाचारात १५० पेक्षा जास्त मृत्यू, ३०० पेक्षा जास्त जखमी, ६ हजारांपेक्षा जास्त एफआयआर आणि ६० हजार लोक बेघर झाले. ज्यांच्यावर बलात्कार होतो, ज्यांची घरे उद्ध्वस्त होतात, त्यांच्यावर कोणती परिस्थिती ओढवत असेल याचा जरा विचार करणेही अशक्य आहे! त्यांच्या मनात भीती घर करते!

 मणिपूरचे अवघे अस्तित्वच जणू लुटले गेले आहे. देशाला मेरी कोम, मीराबाई चानू, कुंजुराणी, सरिता देवी, संजिता चानू आणि न जाणो किती तरी खेळाडू देणाऱ्या मणिपूरमधील खेळाची मैदाने ओसाड झाली आहेत. कारण तेथे रक्ताची होळी खेळली जात आहे. या सर्व बाबींचा विचार करताना  हृदय विदीर्ण होते... हे प्रभू, त्या अतीव सुंदर प्रदेशाचे सुखस्वास्थ्य परत येऊ दे!

Web Title: special article by lokmat editorial board chairman vijay darda on Manipur Violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.