विनेश, हसीना आणि काही धुमसते प्रश्न... एकीकडे खेळातील राजकारण, दुसरीकडे षड्‌यंत्र!

By विजय दर्डा | Published: August 12, 2024 07:35 AM2024-08-12T07:35:45+5:302024-08-12T07:36:54+5:30

विनेश फोगाट आणि शेख हसीना.. दोघींचा एकमेकींशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही; पण एकात खेळातील राजकारण, तर दुसऱ्यात षड्‌यंत्राचे!

Special Article by Vijay Darda on Vinesh, Hasina and some burning questions Sports politics on one side conspiracy on the other | विनेश, हसीना आणि काही धुमसते प्रश्न... एकीकडे खेळातील राजकारण, दुसरीकडे षड्‌यंत्र!

विनेश, हसीना आणि काही धुमसते प्रश्न... एकीकडे खेळातील राजकारण, दुसरीकडे षड्‌यंत्र!

-डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

गेल्या आठवड्यात भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बांगलादेशच्या परागंदा पंतप्रधान शेख हसीना या दोन व्यक्तींबाबत जगभर चर्चा होत राहिली. दोघींचा एकमेकींशी काहीही संबंध नाही, तरीही त्या दोघी माझ्या या सदराचा विषय झाल्या आहेत. याचे कारण दोघींशी संबंधित घटना कोठे ना कोठे राजकारणाशी जोडलेल्या आहेत. एकात खेळातील राजकारण आहे, तर दुसऱ्यात षड्‌यंत्राचे राजकारण दिसते. दोन्ही प्रकरणांत काही लोकांचा अहंकारही दिसतो.

सर्वप्रथम खेळात शिरलेल्या राजकारणाची अतिशय वाईट पद्धतीने शिकार झालेल्या आपल्या देशाच्या मुलीची चर्चा करू. राजकारणाची दहशत आणि शोषणाविरुद्ध ज्यांच्या लढ्याची गोष्ट आपल्याला ठाऊक आहे. ती पुन्हा सांगण्याची गरज नाही; परंतु विनेशच्या संघर्षाची झळ ज्यांना पोहोचली त्यांच्यासाठी स्वतःचा अहंकार, राजकारण, विनेशला धडा शिकवण्याची संधी यापुढे त्यांना आपला देश, देशाचा ध्वज काहीही दिसले नाही. 

विनेश मुळात ५३ किलो वजनी गटात कुस्ती करते. तिला त्याच गटातून ऑलिम्पिकला पाठवायला हवे होते. परंतु, तिच्या जागी अंतिम पांघाल नामक कुस्तीपटूला पाठवण्यात आले. पहिल्याच फेरीत ती बाद झाली आणि नंतर आपल्या कार्डावर बहिणीला खेळाच्या स्टेडियममध्ये घुसवण्याचा प्रयत्न करून तिने देशाची मान खाली घातली. विनेशकडे ५० किलो वजनी गटातून खेळण्याव्यतिरिक्त पर्याय नव्हता; परंतु या मुलीने आपण हार मानणारे नाही, हे दाखवून दिले. 

विनेश जेव्हा अंतिम फेरीत पोहोचली, तेव्हा तिचे रौप्यपदक नक्की झाले होते. सारा देश तिच्या सुवर्णपदकाची आशा करत होता. परंतु, १०० ग्रॅम वजन जास्त झाल्याच्या बातमीने १४० कोटी भारतीयांचे सुवर्णाचे स्वप्न आणि विनेशचे हृदय विदीर्ण केले. कोट्यवधी क्रीडाप्रेमींना धक्का बसला. भारतीय खेळांना राजकारणाने आपले बटीक केले आहे, असे मला येथे नाइलाजाने म्हणावे लागते. खेळात अशी वाईट परिस्थिती उद्भवण्याचे कारण राजकारणच आहे. अन्यथा आमच्या खेळाडूंत काही कमतरता नाही. अमेरिका किंवा चीनसारखी आपण सुवर्णपदके खेचून आणू शकतो. पदकांची तालिका आणि त्या देशांची लोकसंख्या यांची तुलना करा. चीनला बाजूला ठेवले, तर वरच्या ३० देशांची एकंदर लोकसंख्या आपल्या देशापेक्षा कमी आहे. आपण विज्ञान-तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रात जगाला वरचढ ठरू शकतो, तर खेळात का नाही?, परंतु येथे खेळात राजकारण घुसले आहे. करणार तरी काय?

राजकारण ही अत्यंत विचित्र गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीवर कब्जा करू इच्छिते. राजकारणाच्या स्वभावातच मालकी आहे. असे नसते, तर बांगलादेशच्या शेख हसीनांची अशी दुर्दशा झाली असती का? हसीना यांनी १५ वर्षांपूर्वी सत्ता हाती घेतली, तेव्हा बांगलादेशची परिस्थिती वाईट होती. परंतु, हसीना यांनी आपल्या देशाला नव्या टप्प्यावर पोहोचवले. ‘प्रगती आणि विकासाची नवी कहाणी’ असे या बदलाचे वर्णन जागतिक बँकेने केले. २०३१ पर्यंत बांगलादेश उच्च मध्यमवर्गीय उत्पन्नाचा देश होऊ शकतो. २०२६ पर्यंत सर्वांत कमी विकसित देशांच्या गटातून बांगलादेश बाहेर पडू शकतो, असे आशियाई विकास बँकेने म्हटले. सुधारलेल्या आर्थिक स्थितीबरोबरच दहशतवादाविरुद्ध देशाने मजबूत लढाई दिली. ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण अवलंबिले. जेव्हा देशाची अशी प्रगती होत होती, तेव्हा असे काय झाले की, लोक शेख हसीना यांच्यावर नाराज होऊन त्यांना देश सोडून पळून जावे लागले?

गेल्या काही दिवसांत बांगलादेशमध्ये महागाई वाढली, हे खरे होते. लोक नाराज होते. आरक्षणविरोधी आंदोलन सुरू झाले होते; परंतु शेख हसीना यांची सत्ता उलथवली जावी इतकी ताकद या आंदोलनात नव्हती. वास्तवात हसीना यांचे भारताशी असलेले मजबूत नाते ज्यांना खुपत होते, अशा आंतरराष्ट्रीय शक्ती त्यांच्यावर नाराज होत्या. विशेषत: चीनची नाराजी, तर स्पष्ट होती. हसीना यांनी बांगलादेशात आपल्याला स्थान द्यावे, अशी चीनची इच्छा होती. भारताशी बांगलादेशच्या संबंधांवरून इतर महाशक्तीही खूप नाराज होत्या. हसीना त्यांच्यापैकी कोणाचेच ऐकत नव्हत्या. त्यांच्यासाठी त्यांचा देश महत्त्वाचा होता, म्हणून त्या कडक राहिल्या.

यातच विद्यार्थी आंदोलनाच्या नावाने ‘जमात-ए- इस्लामी’ची विद्यार्थी शाखा मैदानात उतरली. बऱ्याच वर्षांपासून हसीना यांची सत्ता उलथवण्याची संधी ही संघटना शोधत होती. जमात-ए-इस्लामी या पाकिस्तानधार्जिण्या संघटनेने १९७१ साली बांगलादेशच्या निर्मितीला कसून विरोध केला होता, हे लक्षात ठेवले पाहिजे. 

कोणताही बांगलादेशी देशभक्त विद्यार्थी राष्ट्रपिता म्हणवल्या जाणाऱ्या शेख मुजीबुर्रहमान यांचा पुतळा फोडील, अशी कल्पना आपण करू शकता काय? मुजीबुर्र यांचा पुतळा तोडणारे लोक जमात- ए- इस्लामीचे होते, हे स्पष्ट झाले आहे. याच जमातीच्या लोकांनी बांगलादेशात अल्पसंख्याकांवर हल्ले केले आणि त्यांची घरे लुटली.

भारताने प्रसंग ओळखून पावले टाकली नसती, तर सत्ता उलथवणाऱ्या या लोकांनी हसीना यांना ठार मारले असते. त्यांचे पिता शेख मुजीबुर्रहमान यांना मूलतत्त्ववाद्यांनीच मारले होते. नशीब म्हणजे हसीना भारतात येऊ शकल्या आणि त्यांचे प्राण वाचवून भारताने जगाला हे दाखवून दिले की, संकटकाळात भारत बांगलादेशबरोबर उभा आहे. 

शेजारी आग लागली, तर त्याच्या झळा आपल्यालाही बसतात हे आपण जाणतो, म्हणून बांगलादेशमध्ये शांतता प्रस्थापित करणे आणि त्या देशाला कट्टरपंथीयांपासून वाचवणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. क्रीडा संघटनांना राजकीय नेत्यांनी आपल्या कह्यात का ठेवले आहे, हा एक गंभीर प्रश्न होय.

vijaydarda@lokmat.com 
डाॅ. विजय दर्डा यांचे समग्र लेखन

Web Title: Special Article by Vijay Darda on Vinesh, Hasina and some burning questions Sports politics on one side conspiracy on the other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.