विशेष लेख: दंड थोपटत ट्रम्प सत्तेवर येत आहेत, सावधान !
By विजय दर्डा | Updated: January 20, 2025 09:33 IST2025-01-20T08:48:58+5:302025-01-20T09:33:23+5:30
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची तिखट कार्यशैली कुणाला मान्य असो वा नसो, तलवार परजत आलेल्या या नेत्याची उपेक्षा करणे मात्र कठीण आहे !

विशेष लेख: दंड थोपटत ट्रम्प सत्तेवर येत आहेत, सावधान !
- डाॅ. विजय दर्डा
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून डोनाल्ड ट्रम्प आज दुसऱ्यांदा विराजमान होत आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांनी आपला पहिला कार्यकाळ संपवून बायडेन यांच्या हाती सत्ता दिली होती, तेव्हापासून जगात पुष्कळ बदल झाले आहेत; परंतु ट्रम्प यांची वृत्ती बदललेली नाही. यावेळी तर सत्ता हाती घेण्याच्या आधीच त्यांनी तलवार परजणे सुरू केले आहे. ते जे काही बोलतात, ते खरेच त्यांनी केले तर काय?, या काळजीत जग आहे.
सत्ता हाती घेण्यापूर्वी ट्रम्प यांनी ‘कॅनडाला अमेरिकेचे ५१ वे राज्य केले जाईल’, असे सांगून टाकले. या विधानामागची कारणे काहीही असोत, कॅनडात हलकल्लोळ झाला. ट्रम्प यांच्या निशाण्यावर असलेल्या जस्टिन ट्रूडो यांना सत्ता सोडावी लागली. कॅनडाचे क्षेत्रफळ अमेरिकेच्या तुलनेत १.५ लाख चौरस किलोमीटरपेक्षाही जास्त आहे. दोन्ही नाटोचे संस्थापक सदस्य आहेत. त्यानुसार एकाने दुसऱ्याचे रक्षण करणे अपेक्षित असताना अमेरिका हा कॅनडाचा घास कसा घेऊ शकेल? परंतु ट्रम्प यांनी भरमसाठ कर लादण्याचे हत्यार उचलले, तर कॅनडा गुडघे टेकून शरण येईल. सत्तेवर येण्यापूर्वीच ट्रम्प यांनी तशी धमकीही दिली आहे
ग्रीनलँडवरील ताबा डेन्मार्कने सोडला नाही, तर अमेरिका जोरदार कर लावेल, असेही ट्रम्प म्हणाले. ग्रीनलँडचा ८५ टक्के हिस्सा बर्फाच्छादित असला, तरी येथे खनिज संपत्तीची रेलचेल आहे. ग्रीनलँडचे पंतप्रधान एगेडे यांनी अमेरिकेबरोबर जाण्यास साफ नकार दिला असला, तरी ‘आम्ही सहकार्याला तयार आहोत’, असेही म्हटले आहे. ग्रीनलँडची लोकसंख्या आहे जेमतेम ५७ हजार ! एवढ्या लोकांना आपल्या बाजूने वळवणे फार कठीण गोष्ट नाही. ट्रम्प यांच्याशी टक्कर घेणे सोपे नाही, हे डेन्मार्कला पक्के ठाऊक आहे.
मेक्सिकोच्या खाडीचे नामकरण ‘अमेरिकेची खाडी’, करू असेही विधान ट्रम्प यांनी केले आहे. पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याची धमकी दिली होती. पोप यांनी त्यावर टीका केल्यावर ट्रम्प यांनी ‘या विषयाशी तुमचा काहीही संबंध नाही’, असे त्यांना रोखठोक बजावले होते. चीनच्या मुसक्या आवळण्यासाठी आधी मेक्सिकोवर नियंत्रण मिळवावे लागेल; कारण चीन मेक्सिकोतील आपल्या कारखान्यात उत्पादन करून अमेरिकेत विकतो. याचा अर्थच असा की, मेक्सिकोची डोकेदुखी वाढणार !
‘आपण सत्तेवर येण्याच्या आधी इस्रायल आणि हमासला युद्ध संपवावे लागेल’, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. ट्रम्प यांचा दरारा इतका की, युद्धविराम झाला आहे. ट्रम्प इस्त्राएलचे खंदे समर्थक. पहिल्या कार्यकाळात त्यांनी जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देऊन अमेरिकन दूतावास जेरूसलेममध्ये स्थलांतरीतही केले होते. रशिया आणि युक्रेन यांच्या संबंधात बायडेन यांनी युक्रेनला जेवढी मदत केली, तेवढी ट्रम्प करणार नाहीत. रशियाचे राष्ट्रपती पुतीन आणि ट्रम्प यांच्यात चांगले सामंजस्य असल्याचे मानले जाते.
कूटनीतीच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर चीनच्या विरुद्ध अमेरिकेचा सर्वात मोठा सहकारी भारत होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये बरीच जवळीक असली, तरी अमेरिकेला प्राधान्य देण्याच्या धोरणामुळे भारताला त्रासदायक ठरतील अशी पावले ट्रम्प टाकू शकतात.
हार्ले डेव्हिडसन मोटरसायकलीवर भारताने जास्त कर लावल्याबद्दल नाराजी व्यक्त करून पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी अनेक भारतीय वस्तूंवर जास्त कर लादला होता. संरक्षण व्यवहारात भारताने अमेरिकेला प्राधान्य द्यावे, यासाठी ट्रम्प आता दबाव आणू शकतात. एच वन बी व्हिसाच्या मुद्द्यावर ट्रम्प यांच्या कडक धोरणाचा सर्वाधिक परिणाम अर्थातच भारतावर होईल. केवळ ‘अमेरिकेत जन्माला आले’, या आधारावर नागरिकत्व देणे आपल्याला मान्य नाही, असेही ट्रम्प सांगून चुकले आहेत. या सगळ्याच विषयात ट्रम्प भारताला काही सवलत देतात की नाही, हे सध्या चर्चेत आहे. परंतु ‘शत्रूचा शत्रू हा आपला मित्र’ या निकषावर चीनच्या संदर्भात भारताच्या आशा बळकट आहेत, हे मात्र खरे!
परंतु ट्रम्प हे तर ट्रम्प आहेत. ते केव्हा कोणता पवित्रा घेतील हे सांगणे कठीण असते. वयाच्या ७८ व्या वर्षी निवडणुकीत २०० पेक्षा जास्त प्रचारसभा घेऊन आपण तरुण असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते. आपले सहकारीही त्यांनी बारकाईने निवडले आहेत. स्पेस एक्स या कंपनीच्या स्टारशिपचा चक्काचूर झाल्यावरही ज्यांच्या चेहऱ्यावरची एकही रेष हलली नाही, ते इलॉन मस्क ट्रम्प यांच्याबरोबर आहेत. ट्रम्प यांचा दरारा इतका की, ‘राष्ट्रपतींच्याजवळ सर्व प्रकारची शक्ती आहे’, असे त्यांनी न्यायव्यवस्थेलाच बजावले आहे. शपथविधीसाठीही त्यांनी निवडक देशांनाच बोलावले आहे. अमेरिकेच्या मांडीवर खेळणाऱ्या पाकिस्तानलाही निमंत्रण नाही.
दंड थोपटतच ट्रम्प सत्तेवर येत आहेत. दणदणीत बहुमताने मिळवलेल्या विजयाचाही त्यांच्यावर दबाव आहे. आपल्याला काही वेगळे करून दाखवावे लागेल, हे ते जाणतात आणि तोच त्यांचा स्वभावही आहे !
वेलकम, मिस्टर ट्रम्प !