दुबईच्या वाळवंटात महापूर कसा आला?; १९४९ नंतर पडलेला हा सर्वाधिक पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 06:08 AM2024-04-23T06:08:55+5:302024-04-23T06:09:28+5:30
वाळवंटात मुसळधार पाऊस पडतो तेव्हा काय होते, याचा प्रत्यय नुकताच दुबईत आला. वाळवंटी प्रदेशात अचानक महापूर उद्भवण्याचे कारण काय?
भवताल रिसर्च टीम
दुबईमध्ये नुकताच, १५ एप्रिल रोजी तब्बल १४२ मिलिमीटर इतका पाऊस कोसळला. त्या ठिकाणची पावसाची आकडेवारी असे सांगते की, तिथे वर्षाला सरासरी सुमारे ९५ मिलिमीटर इतका पाऊस पडतो. याचाच अर्थ दीड वर्षांत सरासरी जितका पाऊस होतो, तितका पाऊस तिथे काही तासांमध्ये पडला. ‘यूएई’ची सरकारी वृत्तसंस्था WAM ने या पावसाला ऐतिहासिक घटना म्हटले आहे. तिथे १९४९ नंतर पडलेला हा सर्वाधिक पाऊस असल्याचे म्हटले आहे. दुबईप्रमाणेच यूएईच्या अनेक प्रदेशात आणि मध्य-पूर्वेत त्या काळात अतिवृष्टीने हजेरी लावली.
वाळवंटी प्रदेशात इतका पाऊस पडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, या प्रदेशात पाऊस का पडतो हे समजून घ्यावे लागेल.
भारत, भारतीय उपखंड आणि आसपासच्या प्रदेशात पाऊस पडण्यासाठी उष्ण कटिबंधीय प्रदेशात निर्माण होणाऱ्या हवामानाच्या प्रणाली (weather systems) कारणीभूत असतात. त्याचप्रमाणे दुबई व आखाती प्रदेशाच्या भौगोलिक ठिकाणाचा विचार करता, तेथे मध्य कटिबंधीय प्रदेशातील हवामानाच्या प्रणाली तयार झाल्या तर पाऊस पडण्याची शक्यता असते. कृत्रिम पाऊस अर्थात क्लाउड सीडिंग हे या पावसामागचे कारण असल्याची बरीच चर्चा झाली, पण असे प्रयोग करण्यासाठी मुळात हवेत बाष्प असावे लागते. त्याशिवाय कृत्रिम पाऊस पाडताच येत नाही. हे बाष्प मध्य कटिबंधीय प्रदेशातील हवामानाच्या प्रणालीमुळे निर्माण झाले. त्यामुळे या घटनेचा संबंध कृत्रिम पावसाशी जोडणे अतिशयोक्तीचे आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
महापूर येण्याची कारणे
या घटनेच्या निमित्ताने वाळवंटात पूर येण्याची कारणे समजून घेणे सयुक्तिक ठरेल. वाळवंटात पडणारा पाऊस अनेकदा हंगामी हवामान बदल किंवा इतर हवामान प्रणालींमुळेदेखील उद्भवू शकतो. परंतु, वाळवंटात कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडून पूर परिस्थिती उद्भवते.
१. जमिनीखालील ‘जिप्सम’चा थर
येथे उष्ण आणि कोरड्या परिस्थितीमुळे पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते. परिणामी जमिनीच्या खाली काही अंतरावर जिप्समचा (कॅल्शियम सल्फेट) कडक थर तयार होतो. त्यामुळे पृष्ठभागावरील पाणी त्वरित जमिनीत मुरत नाही. ते साठून पृष्ठभागावर वाहते आणि पूर परिस्थिती उद्भवते.
२. नैसर्गिक प्रवाहांच्या देखभालीचा अभाव
वाळवंटी भागात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे या भागांमधील नैसर्गिक प्रवाह (नद्या, नाले) हंगामी स्वरूपाचे असतात. पाऊस पडेल तेव्हाच नद्या प्रवाही होतात. परिणामी या भागातील पाणी वाहून नेणाऱ्या यंत्रणांची (उदा. नद्या, नाले, पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या) देखभाल दुरुस्ती वेळच्या वेळी होत नाही. किंबहुना त्यांच्यावर अतिक्रमणे होतात. त्यामुळे पूर येण्याचा धोका वाढतो.
३. वृक्षावरण कमी असणे
वाळवंटात पूर येण्याचे आणखी एक कारण म्हणजे या प्रदेशात वनस्पती आवरण खूपच विरळ असते. परिणामी, वाळवंटात पाण्याचा निचरा होण्याची क्षमता तुलनेने कमी आहे. यामुळे पावसाळी पाणी साठून पृष्ठभागावर वाहते आणि त्याचे रूपांतर पूर परिस्थितीमध्ये होते. याशिवाय वाळवंटी भागात पडणारा पाऊस हा वादळी स्वरूपाचा असतो. तिथे कमी वेळात जास्त पाऊस पडतो. याशिवाय त्याला इतरही काही कारणे जबाबदार असतात.
वाळवंटी प्रदेशात यापूर्वीही महापुराच्या घटना घडल्या आहेत. २०१७ मध्ये जुलै महिन्यात गुजरात, राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थिती निर्माण झाली होती. कच्छचे रण आणि जैसलमेरसारख्या कोरड्या भागावरही या पुराचा परिणाम झाला होता. कच्छमध्ये वार्षिक सरासरीच्या ११९ टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली होती.
वाळंवटात पूर येण्याच्या घटना नवीन नाहीत. सौदी अरेबियामध्ये २०१९ मध्ये आलेल्या पुरामध्ये अनेक उंट वाहून गेले होते. तुफान पावसामुळे तेथील नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले, याची सर्वाधिक झळ प्राणिमात्रांना बसली. २०२३ मध्ये ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या प्रभावाखाली दक्षिण राजस्थानच्या पाच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. राजस्थानमधील अनेक भागांना मुसळधार पावसाने झोडपल्याची नोंद आहे.
यासंदर्भात हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. कृष्णानंद घोसाळीकर म्हणाले, ज्या दिवशी (१५ एप्रिल) दुबईमध्ये अतिवृष्टी झाली, त्या दिवशी या प्रदेशात मोठ्या प्रमाणात बाष्प निर्माण करणारी हवामान प्रणाली निर्माण झाली होती. त्याचा परिणाम म्हणून दुबई व परिसरात अतिवृष्टी झाल्याचे म्हणता येईल. दुबईमध्ये या हवामान व्यवस्थेमुळे पाऊस पडणे अपेक्षित होते. पण तो इतक्या मोठ्या प्रमाणात होणे ही अपवादात्मक घटना आहे.
दुबई हा वाळवंटी प्रदेश असला तरी समुद्रकिनारी प्रदेशसुद्धा आहे. इथे अचानक अशी परिस्थिती उद्भवली आणि प्रचंड महापूर आला. त्यामुळे भारतासह इतर समुद्रकिनारी प्रदेशातसुद्धा भविष्यात असे काही घडू शकेल का, याचा विचार होणे आणि नियोजनात त्याची दखल घेणे आवश्यक आहे.
bhavatal@gmail.com