सत्य हे काही काळ लपवता आले तरी ते नष्ट करता येत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 07:52 AM2021-12-18T07:52:59+5:302021-12-18T07:53:34+5:30
गुरुवारी (१६ डिसेंबर) बांगलादेश निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवाचा सोहळा झाला. काॅंग्रेस पक्षाने यानिमित्त जाे आक्षेप नाेंदविला आहे, ताे महत्त्वाचा आहे. पन्नास वर्षांपूर्वी पाकिस्तानबरोबरच्या युद्धात मिळविलेल्या देदीप्यमान विजयाच्या शिल्पकार तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी हाेत्या.
सत्य हे काही काळ लपवता आले तरी ते नष्ट करता येत नाही, हे जगाच्या इतिहासात आजवर अनेकवेळा दिसून आले आहे. परवा गुरुवारी (१६ डिसेंबर) बांगलादेश निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवाचा सोहळा झाला. काॅंग्रेस पक्षाने यानिमित्त जाे आक्षेप नाेंदविला आहे, ताे महत्त्वाचा आहे. पन्नास वर्षांपूर्वी पाकिस्तानबरोबरच्या युद्धात मिळविलेल्या देदीप्यमान विजयाच्या शिल्पकार तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी हाेत्या. त्यांच्या धाडसामुळेच दक्षिण आशियाचा भूगाेल आणि इतिहास बदलून गेला. हे सत्य नजरेआड करून केंद्रातले भाजप सरकार विजयदिन साजरा करण्याचा प्रयत्न करीत असेल तर या आंतरराष्ट्रीय विषयावर आक्षेप घेण्याचा हक्क काॅंग्रेस पक्षाला जरूर आहे.
फिल्ड मार्शल जनरल सॅम माणकेशा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय लष्कराने पाकिस्तानचे तुकडे करून बांगलादेश स्वतंत्र केला, एवढेच नव्हे तर हुकूमशाही पद्धतीने तीस लाख लाेकांचा संहार करणाऱ्या प्रवृत्तीला धडा शिकविला हाेता. तत्कालीन पूर्व पाकिस्तानमध्ये शेख मुजीबूर रहेमान यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला निवडणुकीत प्रचंड यश मिळाले हाेते. सामान्य जनतेचा मुक्ती वाहिनीच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा हाेता. भारताने पाकिस्तानवर युद्ध लादले नव्हते, तर बांगलादेश निर्मितीसाठी लढणाऱ्या नागरिकांवर हाेणाऱ्या अत्याचाराचा प्रतिकार केला हाेता. या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण होताना इंदिरा गांधी यांनी जे धाडस दाखविले त्याचे मूल्यमापन तत्कालीन जगाच्या राजकीय भूगाेलाची स्थिती पाहून करावे लागेल.
अमेरिका आणि चीन पाकिस्तानच्या बाजूने उभे हाेते. शीतयुद्धाचा काळ हाेता. इंदिरा गांधी यांनी मुत्सद्देगिरी दाखवून साेव्हिएत रशियाशी करार केला. त्याच्या आधारे भारताविरोधातील कोणतीही कारवाई रशियाविरुद्ध आहे, असे समजले जाईल, असा दम रशियाने दिला होता. अमेरिकेने संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पाकिस्तानच्या बाजूने आणि भारताच्या विराेधात तीन वेळा ठराव आणले हाेते. तिन्ही वेळेला साेव्हिएत रशियाने नकाराधिकार वापरला. ठराव हाणून पाडला. रशियाच्या मदतीने एका देशातील वंचितांच्या मुक्ती लढ्यासाठी भारत संघर्ष करताे आहे, हे इंदिरा गांधींनी जगाला दाखवून दिले. हा पाकिस्तानचा अंतर्गत मामला नाही, तर निर्वासितांच्या लोंढ्यांमुळे भारतात नवे प्रश्न उभे राहिलेत, हे त्यांनी वारंवार जगाला सांगितले.
मुक्ती वाहिनीने उठाव मार्चमध्ये केला. परंतु, युद्ध डिसेंबरमध्ये झाले. फिल्ड मार्शल जनरल सॅम माणेकशा यांना युद्धाची तयारी करण्यासाठी नऊ महिन्यांचा वेळ मिळाला. पावसाळ्यात युद्ध टाळता आले. त्यांचा सल्ला इंदिरा गांधी यांनी मानला. संपूर्ण तयानिशी युद्धात उतरून केवळ दहा दिवसांत १६ डिसेंबर १९७१ राेजी भारताने पाकिस्तानला शरण येण्यास भाग पाडले. पाकिस्तानातील अनेक विचारवंत, लेखक आणि अभ्यासकांनी या युद्धावर खूप लिखाण केले आहे. त्यात पाकिस्तानी लष्कराच्या अपयशाला दाेष दिला आहे; पण अपेक्षेनुसार इंदिरा गांधी यांनी दाखविलेल्या धाडसाचे मात्र पुरेसे आणि उचित काैतुक केलेले नाही.
आताच्या राजकीय परिस्थितीत तसाच प्रकार चालला आहे. ज्या कठीण आंतरराष्ट्रीय कालखंडात श्रीमती इंदिरा गांधी यांनी धाडस दाखविले ते काैतुकास्पद आहे. त्या काॅंग्रेसच्या नेत्या असल्या तरी भारताच्या पंतप्रधान हाेत्या. भारत देशाचे ते धाेरण हाेते आणि त्या धाेरणानुसार भारतीय लष्कराने कारवाई केली हाेती. अखेर ताे देशाच्या अस्मितेचा लढा हाेता. भारताने आपल्या स्वातंत्र्य लढ्यातदेखील उपेक्षित, शाेषित सामान्य माणसासाठी स्वातंत्र्य हवे, असाच आग्रह धरला हाेता.
वसाहतवादी राजकारणामुळे अनेक देशांवर अन्याय झाला आणि त्याविरुद्ध लढणाऱ्या जनतेला पाठिंबा नेहमीच दिला गेला. ती भारताची वैचारिक बैठक हाेती आणि असायला हवी आहे. हा सर्व इतिहास विसरून किंवा लपवून ठेवता येणार नाही. कारण ते सत्य आहे. बांगलादेश हा नवा देश जगाच्या क्षितिजावर उदयाला आला हेदेखील ढळढळीत सत्य आहे. पश्चिम पाकिस्तानच्या दडपशाहीमुळे लाखाे लाेक जिवास मुकले, हे सत्य आहे. सुमारे एक काेटी जनतेला भारतात आश्रय घ्यावा लागला हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. या सर्व मुक्ती लढ्यात भारताची भूमिकाच निर्णायक ठरली. त्यासाठी बांगलादेशाच्या बाजूने भारताखेरीज अन्य काेणी उभे राहिले नव्हते. ते धाडस इंदिरा गांधी यांनी दाखविले. आपल्या शेजारी देशाला जन्म देणाऱ्या या युद्धात पन्नासावा विजय दिवस साजरा करताना विद्यमान भारत सरकारला त्यांचा विसर पडत असेल, तर ते सर्वथा अनुचितच आहे. इतिहास लपवता येत नसतो.