विशेष लेख: माझा नवरा सांगतो, ‘मॅडमशीच बोला, त्या सक्षम आहेत..’ - गोमती साय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 10:41 AM2024-04-05T10:41:00+5:302024-04-05T10:43:16+5:30
Gomti Sai: सर्वपक्षीय स्त्री खासदारांशी केलेल्या संवादाची मालिका : नेत्री! या प्रकल्पात रायगड (छत्तीसगड) च्या खासदार गोमती साय यांच्याशी झालेल्या गप्पांचा सारांश!
- शायना एन. सी.
(भाजप नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या)
ग्रामीण भागातील एक महिला सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष होते; पण नंतर थेट संसदेत पोहोचते. गोमतीजी, आपला हा प्रवास कसा झाला?
खेड्यातल्या एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात मी जन्मले. राजकारणात येईन, असे मला कधीही वाटले नव्हते. परिस्थितीच तशी होती. गावात प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढल्या इयत्तांसाठी आम्ही २०-२५ मुली पायी शेजारच्या गावी जायचो. गावात सायकलसुद्धा मोठ्या मुश्किलीने दिसायची. गावाकडचे ते जीवन दुष्कर होते; पण त्यात स्वर्ग होता. आजही माझे घर जंगलात आहे. सोबत कोणी असल्याशिवाय किंवा रात्रीच्या वेळी दिवा घेतल्याशिवाय बाहेर पडता येत नाही.
सरपंचपदापासून दिल्लीपर्यंतचा प्रवास नशिबाने मिळालेला की तुम्ही कष्टाने कमावलेला?
भाग्यापेक्षाही मी अधिक कर्माला मानते. भाग्य कुणाला जाणता येत नाही; पण कर्म वर्तमानात असते; त्यावर माझा जास्त विश्वास आहे.
तुमचे आई, वडील दोघेही सरपंच होते. सरपंचपद असो किंवा खासदारकी; पुरुषच सूत्रे हलवतो, असा तुमचा अनुभव आहे का?
वयाच्या १६ व्या वर्षी माझे लग्न झाले, तेव्हा लग्नाचा अर्थही मला कळत नव्हता. पण मी प्रत्यक्ष जगण्यातले अनुभव घेऊन त्यातून शिकून पुढे आले आहे. माझे घर आधीपासून जनसंघाशी जोडले गेलेले होते. पाहून पाहून मी राजकारण शिकले. खासदार झाले. जिल्हा परिषदेत होते तेव्हा आणि आजही मला कधीही माझ्या पतीच्या मदतीची, माझ्या कामात त्यांच्या सहभागाची गरज भासलेली नाही. माझ्या कामात त्यांचा हस्तक्षेप नसतो. आजवर ते कधी दिल्लीला आलेले नाहीत. कुणी त्यांच्याकडे काम घेऊन आले तर ते स्पष्ट सांगतात ‘मॅडमशीच बोला, त्या सक्षम आहेत.’
४०० किलोमीटरचा मतदारसंघ कसा हाताळता?
मी जंगलात, गरिबांच्या गल्लीत राहते. त्यांचे जीवन मी जगत आले आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघातल्या प्रश्नांचा शोध मला वेगळा घ्यावा लागला नाही. स्वाभाविकच शिक्षण, वीज, रस्ते, पाणी असे प्रश्न मी स्वतःहूनच मांडले.
तुम्ही अजून शेतात काम करता?
मी घरातली मोठी सून होते. पती शिकलेले असल्याने त्यांना शेतीत रस कमी होता. आर्थिक अडचण निर्माण झाल्यावर मला लक्ष घालावे लागले. १७ वर्षे मी शेती केली. पेरणीपासून कापणीपर्यंत सगळी कामे केली. निर्णय स्वतःच घेतले. दिरांना शिकवले. त्यांची लग्ने करून दिली.
लोकसभेतल्या पहिल्या भाषणाचा अनुभव..
रायगड जशपूर हा माझा मतदारसंघ शेतीप्रधान आहे. टोमॅटो, मिरची, बटाटा, तीळ अशी पिके येथे होतात. माझ्या क्षेत्रातील मुले शिक्षणात अग्रेसर आहेत, असे असताना आमच्याकडे रेल्वे का नाही, असा प्रश्न मी मांडला होता.
एखादी महिला राजकारणात येते ती कशासाठी?
कोणतेही काम करताना आधी योजना तयार होते. नुसत्या राजकारणातून काही होत नाही. लोकांची सेवा करायची तर सत्ताही लागते. वयाच्या २८ व्या वर्षी २००५ साली मी पहिली निवडणूक जिंकले आणि तेव्हापासून एकदाही माझ्या वाट्याला पराजय आलेला नाही; याचा अर्थ लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. गेली १७ वर्षे मी लोकांमध्ये आहे. चारशे किलोमीटरच्या मतदारसंघात सतत फिरून लोकांशी संपर्कात राहते.
या धामधुमीत स्वत:चे आरोग्य कसे सांभाळता?
मी गावात जन्माला आले. तिथले अन्न खाल्ले. मी सकाळी ५ ला उठते. खासदार होईपर्यंत मी रात्रीच भांडी घासून ठेवत असे. सकाळी शेतात चक्कर मारून आल्यावर नित्यकर्म आटोपून १० वाजेपासून मी राजकीय स्वरूपाची कामे पाहत असते. संध्याकाळी कुटुंबाला तासभर वेळ देते. मला मुलांशी खेळणे, वडीलधाऱ्यांशी गप्पा मारणे मला आवडते. माझे दीर, जावा कुणीही मी खासदार असल्याचे सांगून कामे करून घेत नाहीत. मी ग्रामीण भागातल्या महिलांना, मुलींना हेच सांगू इच्छिते की एका गरीब घरातून आलेली मुलगी कष्टपूर्वक उभी राहते, हे मी अनुभवले आहे. तुम्ही घाबरू नका. इच्छाशक्ती बाळगा. माध्यम कोणतेही असो, मनापासून काम करणे हेच सगळ्या यशाचे रहस्य आहे.
https://shorturl.at/opv35