अन्वयार्थ : शाळा, कॉलेजच्या वर्गात AI येईल, म्हणून दचकायचे कशाला?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 04:00 AM2024-04-29T04:00:23+5:302024-04-29T04:00:41+5:30
शिकणे-शिकवणे अधिक परिणामकारक, स्वारस्यपूर्ण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता यापुढील काळात मोठी भूमिका बजावू शकते! त्यासाठी आपण तयार राहिले पाहिजे.
डॉ. एस. एस. मंठा, माजी अध्यक्ष भारतीय तंत्रशिक्षण परिषद
सार्वजनिक सेवा, बॅंकिंग किंवा आरोग्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत चांगले काम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होऊ लागला असताना, शिक्षण क्षेत्र कसे मागे राहू शकेल? सध्याचे अध्ययन अध्यापनाचे आयाम कसोटीला लागतील, अशा प्रकारची क्षमता जनरेटिव आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग अल्गोरिदम्समध्ये आहे. आंतरसंवादी आशय, मार्गदर्शन आणि प्रेरणा याबाबतीत कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची भूमिका बजावेल. सखोल अध्ययन करण्यासाठी विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाचा लाभ होऊ शकेल. काही विद्यार्थी संथ गतीने शिकणारे असतील, काहींना गणित येणार नाही, तर काहींना तर्कशास्त्र. काहींना त्यांच्या आवडीचा विषय शिकायचा असेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झाल्याने व्यक्तिगततेवर आधारित काठीण्य पातळीचे समायोजन करता येईल. शिकणाऱ्याला कंटाळा येणार नाही, असे शिक्षण असेल.
विद्यार्थ्यांचे स्वारस्य, अध्ययनाची पार्श्वभूमी आणि क्षमता या गोष्टी लक्षात घेऊन कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षणक्रमात काही चांगले बदल सुचवू शकेल. विद्यार्थ्याला जे जाणून घ्यायचे आहे, त्यासाठी नवीन आशय सामग्री उपलब्ध करून देता येईल. विद्यार्थ्याची अध्ययन शैली, त्याची मर्मस्थाने आणि बलस्थानेही व्यक्तिगत अध्ययन अल्गाेरिदम्सच्या माध्यमातून समजून घेता येतील.
इंटेलिजेंट ट्यूटरिंग सिस्टम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्राचा वापर करून व्यक्ती अनुरूप सूचन आणि पूर्व प्रतिसाद साधते. विद्यार्थ्याची अध्ययन गती लक्षात घेऊन एकेका विद्यार्थ्याला ही प्रणाली प्रेरित करू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने चालविली जाणारी अध्यापन प्रणाली एक एका विद्यार्थ्याला प्रश्नांची उत्तरे आणि त्याच्या आकलन क्षमतेनुसार मार्गदर्शन उपलब्ध करून देते.
कृत्रिम बुद्धिमत्तेतील अल्गोरिदम्स प्रश्नमंजुषा, कार्यपत्रिका पाठयोजना अशा गोष्टी विद्यार्थी आणि अभ्यासक्रमाची गरज लक्षात घेऊन पुरवू शकते. यातून पाठाची तयारी आणि अद्ययावत अध्यापन सामग्री शोधण्याचा शिक्षकांचा वेळ वाचतो.
विद्यार्थी वेगवेगळ्या भाषा माध्यमातून येत असल्यामुळे अनेकांना भाषेची अडचण भासू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने चालवल्या जाणाऱ्या भाषा अध्ययन ॲप्सचा येथे उपयोग होऊ शकतो. उच्चारांपासून व्यक्तिगत पातळीवर भाषिक कौशल्ये कशी सुधारावीत हेही या ॲप्सद्वारे साधता येते. भारतीय भाषांच्या बाबतीतही हे लागू आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवितानाही कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होऊ शकतो. अध्ययन सामग्रीचे पर्यायी आराखडे तयार करता येतात. एआयचलित चॅटबॉट किंवा आभासी शिक्षकांशी विद्यार्थी संवाद साधू शकतो. प्रश्नोत्तरे होऊ शकतात. संवादावर आधारित अध्ययन पद्धतीमुळे शिक्षण अधिक चांगले होते. कृत्रिम बुद्धिमत्तेने उपलब्ध करून दिलेल्या भाषांतर तंत्रामुळे भाषिक अडसर दूर होतात आणि विद्यार्थ्याला त्याच्या स्थानिक भाषेत शैक्षणिक सामग्री मिळू शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता खरेतर शिक्षण क्षेत्रासाठी वरदान आहे. त्याची अल्गोरिदम प्रणाली शैक्षणिक सामग्रीचे विश्लेषण करून त्यातील कल, पद्धत, बलस्थाने आणि मर्मस्थाने सांगू शकते. विद्यार्थ्याची प्रगती मोजणे, नेमके कसे शिकवावे हे ठरवणे, यासाठी शिक्षकांना त्याचा उपयोग होऊ शकतो. अध्ययन अध्यापन अधिक परिणामकारक, स्वारस्यपूर्ण करण्यासाठी, तसेच वेगवेगळे वयोगट आणि पार्श्वभूमीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी ते सहाय्य करते.
परीक्षेच्या मूल्यमापनातही या बुद्धिमत्तेचा उपयोग होतो, शिवाय काय चुकले आणि कशी सुधारणा करावी हेही विद्यार्थ्याला लगेच सांगितले गेल्याने फायदा होतो. विद्यार्थ्यांची कामगिरी, सातत्य आणि शिक्षण सोडण्याचे प्रमाणही आजमावता येते. कच्चे विद्यार्थी शोधून विद्यार्थ्यांच्या यशाचे एकंदर प्रमाण सुधारण्यासाठी उपाय योजता येतात. विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या गरजा त्यातून पूर्ण होऊ शकतात. अंतिमतः शैक्षणिक संकल्पना आणि सखोल आकलन साध्य होऊ शकते. शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे इतके जास्त फायदे असले, तरीही मानवी बुद्धिमत्तेला तो पर्याय नाही, याचा विसर पडता कामा नये. मानवी सर्जनशीलता आणि चातुर्य वाढविण्याचे ते एक साधन आहे. अध्ययन अध्यापनात ते वापरून आपण दोन्ही गोष्टी वाढवल्या पाहिजेत.