द ग्रेट लिओनेल मेस्सी : मायाळू छावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 09:40 AM2022-12-20T09:40:30+5:302022-12-20T09:45:53+5:30
फुटबॉल विश्वविजेतेपदाच्या अंतिम सामन्यात लियोनेल मेस्सी आणि किलियन एम्बाप्पे या दोन ध्रुवांवरच्या दोन टोकांनी एक परमोच्च बिंदू रविवारी अनुभवला. एकाच्या नशिबाला स्वप्नपूर्तीचं सुख आलं तर दुसऱ्याच्या पदरात निराशेचं दान पडलं!
श्रीमंत माने,
कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर
प्रचंड वेगाने प्रतिस्पर्ध्याच्या गोलपोस्टकडे चेंडूसह धावणारा हा थोर खेळाडू इतका निर्व्याज असण्यामागे जवळच्यांबद्दल त्याच्या मनात झुळूझुळू वाहणारे प्रेमच तर नाही ?
गेल्या बुधवारी, १४ डिसेंबरला अर्जेंटिनाने उपांत्य सामन्यात क्रोएशियाला पराभूत केल्यानंतर तिकडे मायदेशात चाहत्यांनी द ग्रेट लिओनेल मेस्सीची आजी समजून एका वृद्ध महिलेच्या घरापुढे जल्लोष केला. प्रत्यक्षात ती मेस्सीची आजी नव्हतीच. सिलिया क्युकसिटीनी ही मेस्सीवर जिवापाड माया करणारी त्याची आजी, म्हणजे आईची आई १९९८ सालीच देवाघरी गेली आहे. मेस्सीलाही आजीचा इतका लळा अन् तो अवघ्या ११ वर्षांचा असताना झालेल्या तिच्या मृत्यूचे दु:ख त्याच्या काळजात इतके खोल घर करून गेलेय की प्रत्येक गोल केल्यानंतर तो आकाशाकडे पाहत दोन्ही हात उंचावून, त्याची दोन बोटे वर करून जणू तो गोल तो रोमन कॅथालिक ख्रिश्चन म्हणून आकाशातल्या देवाला तसेच मायेच्या आजीला अर्पण करीत असतो. कारण आजीच त्याला क्लबमध्ये खेळायला घेऊन जायची, त्याला तयार करा म्हणून कोचला विनंत्या करायची, मॅराडोनसारखा तू नक्की जगातला महान खेळाडू बनशील, अशी स्वप्ने दाखवायची. मेस्सीची जडणघडण अशी आजीच्या मांडीवर झाली.
लिओच्या अख्ख्या कुटुंबाचे भावविश्व फुटबॉलभोवती गुंफलेले आहे. वडील जॉर्ज तर तो अगदी १४ वर्षांचा कोवळा फुटबॉलपटू होता तेव्हापासून लिओचा सगळा व्यावसायिक कारभार पाहतात. त्याला तीन भाऊ. त्यापैकी एक रॉड्रिगो त्याची दैनंदिनी सांभाळतो. दुसरा मॅटियास हा मेस्सी फाउंडेशन नावाच्या चॅरिटी संस्थेचे काम सांभाळतो. एका हॉस्पिटलमध्ये भेटीच्या वेळी रुग्णांची अवस्था पाहून त्याने धर्मदाय संस्थेची उभारणी केली. मेस्सीच्या आईचे नावही सिलिया. आईवर त्याचे नितांत प्रेम आहे. अर्जेंटिनाच्या सॅन्ता फे प्रांतातल्या रोजारिओ शहरात जिथे मेस्सीचा जन्म झाला तिथले वडिलोपार्जित घर अजून त्याने सांभाळले आहे. सोबत आईसाठी एक आलिशान घर बांधून दिले आहे.
मेस्सी कुटुंबाचा स्थलांतराचा इतिहास हा लिओच्या मैदानावरील कर्तबगारीचा एक आगळा पैलू आहे. मेस्सीचे खापरपणजोबा एंजेलो मेस्सी एकोणिसाव्या शतकात, १८९३ साली इटलीतल्या अंकोना भागातून कामाच्या शोधात अर्जेंटिनाला गेले. तेव्हा अर्जेंटिनात मजुरांचा तुटवडा होता तर इटलीत दारिद्र्य भोगणाऱ्यांची संख्या मोठी होती. आईकडील क्युकसिटीनी कुटुंब स्पेनमधील कॅटालोनियामधून अर्जेंटिनाला गेले होते. परक्या भूमीतून आलेल्या या दोन्ही कुटुंबांत पुढे बेटीव्यवहार झाले.
लिओनेल मेस्सी GOAT बनण्यात स्पेनमधून आलेल्या मातुलाचा मोठा वाटा आहे. कारण, तो दहा वर्षांचा असताना त्याला ग्रोथ हार्मोन डिफिशियन्सीने ग्रासले. त्या कमतरतेमुळे मुलाची वाढ खुंटते. फुटबॉलसारख्या बऱ्यापैकी धसमुसळ्या, शारीरिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या खेळात छोट्या चणीचा, किरकोळ भासणाऱ्या अंगकाठीचा मेस्सी हा त्या व्याधीचाच परिणाम आहे. त्यावर उपचारासाठी महिन्याला एक हजार डॉलर्सची गरज होती. मेस्सीचे वडील एका स्टील कारखान्यात मॅनेजर होते. त्यांनी इकडेतिकडे हातपाय मारून पाहिले; पण पैशाची तजवीज होईना. तेव्हा, सासरच्या मंडळींचा आधार घेत तेरा वर्षांच्या लिओला घेऊन त्यांनी तडक स्पेनमध्ये कॅटालोनिया प्रांत गाठला. बार्सिलोनामध्ये मेस्सीची एन्ट्री झाली. उपचारही झाले अन् महान खेळाडू घडत गेला. तिथल्याच जगप्रसिद्ध क्लबमध्ये त्याची सगळ्या टप्प्यावरील व्यावसायिक कारकीर्द बहरली.
यापेक्षा रंजक कथा मेस्सीच्या आयुष्याची जोडीदार बनलेल्या टोनेला रोझ्झुको हिची आहे. रोजारिओ येथील टोनेला मेस्सीची अगदी बालपणीची मैत्रीण. लुकास सॅग्रियारी या लहानपणीच्या दोस्ताची बहीण. चिमुकल्या हृदयांमध्ये फुललेले प्रेम दोघांनी अनेक वर्षे जपले. जगातला सध्याचा बेस्ट ड्रिबलर अन् फुटबॉलच्या इतिहासातील ग्रेट ड्रिबलर्सपैकी एक लिओनेल मेस्सी मैदानाबाहेरही बालमैत्रिणीच्या प्रेमात असे ड्रिबल करीत राहिला. दोघांनी अखेर २००८ मध्ये एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. औपचारिक लग्न त्यांनी त्यानंतर नऊ वर्षांनी केले. त्याआधी त्यांना दोन मुलेही झाली होती. आई-वडील, तीन भाऊ, धाकटी बहीण किंवा मायाळू आजींप्रमाणेच पत्नी व मुलांवर मेस्सीचे प्रचंड प्रेम. थिएगो या पहिल्या मुलाच्या जन्माआधी आपण बाप होणार असल्याची बातमी त्याने थेट मैदानावरूनच जगाला दिली. २ जून २०१२ ला इक्वाडोरविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर त्याने अंगावरच्या जर्सीखाली पोटात चेंडू लपविला आणि टोनेला गर्भवती असल्याची खूण जगाला कळली. लिओनेल म्हणजे सिंहाचा छावा! हा छावा स्वभावाने इतका मायाळू की खरे वाटू नये!
द ग्रेट लिओनेल मेस्सी मैदानावर कूल राहतो. चिडत नाही, आदळआपट करीत नाही. प्रचंड वेगाने प्रतिस्पर्ध्याच्या गोलपोस्टकडे चेंडूसह धावणारा हा थोर खेळाडू प्रेमळ, निर्व्याज्य असण्यामागे जवळच्या सगळ्यांबद्दल त्याच्या मनात झुळूझुळू वाहणारे हे प्रेमच तर नाही ?
shrimant.mane@lokmat.com