विशेष वाचनीय लेख: चीनमध्ये ‘आल इज नॉट वेल’!
By रवी टाले | Published: October 29, 2023 10:42 AM2023-10-29T10:42:28+5:302023-10-29T10:42:38+5:30
मुद्द्याची गोष्ट : चीनच्या पोलादी पडद्याआड काय चालले आहे, हे जगाला कळणे तसे अवघडच असते; पण तरीही काही गोष्टी त्या पडद्यातूनही झिरपतातच आणि त्याआधारेच जिनपिंग यांची चीनवरील घट्ट पकड सैल होऊ लागल्याची चर्चा जगात सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून जो खेळ सुरू आहे त्यातून हेच दिसते की... तिथे आल इज नॉट वेल!
रवी टाले, कार्यकारी संपादक, जळगाव
प्रसिद्ध अभिनेता आमिर खानच्या खूप गाजलेल्या ‘थ्री इडियटस’ या चित्रपटातील आल (ऑल) इज वेल’ संवाद आजही अनेकदा आपसुक लोकांच्या ओठावर येत असतो. सध्या चीन आणि त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे चाललंय तरी काय, हा प्रश्न जर कुणी उपस्थित केला, तर त्याचे उत्तर आमिरच्या त्या संवादात किंचितसा बदल करून, ‘आल इज नॉट वेल’ असे देता येऊ शकते!
जिनपिंग यांनी अलीकडेच संरक्षण मंत्री जनरल ली शांगफू यांची गच्छंती केली. गत जुलैपासून जिनपिंग यांची खप्पा मर्जी झालेले ते चौथे मंत्री! जिनपिंग यांनी जुलैमध्ये परराष्ट्र मंत्री क्विन गँग यांना मंत्रिमंडळातून दूर केले होते. त्यानंतर गेल्या मंगळवारी त्यांनी ली शांगफू यांना संरक्षण मंत्री आणि स्टेट कौन्सिलर या दोन्ही पदांवरून बरखास्त केले. त्याचवेळी लिऊ कून यांना अर्थमंत्री पदावरून, तर वांग झीगॅन्ग यांना विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री पदावरून दूर केले. ली शांगफू आणि क्विन गँग यांच्या गच्छंतीमध्ये साम्य आहे. मंत्रिमंडळातून हकालपट्टी होण्यापूर्वी काही काळ दोघेही रहस्यमयरीत्या बेपत्ता होते!
शांगफू हे जिनपिंग यांच्या अत्यंत विश्वासातील उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांपैकी एक होते. जिनपिंग यांच्या लष्कर आधुनिकीकरणाच्या स्वप्नाची धुरा शांगफू यांच्याच खांद्यावर होती. शिवाय ते चीनच्या महत्वाकांक्षी अवकाश कार्यक्रमाचेही प्रमुख होते. राजकीयदृष्ट्या ते जिनपिंग यांच्याशी अत्यंत एकनिष्ठ होते आणि तशी ग्वाहीही त्यांनी वेळोवेळी दिली होती. तरीही जिनपिंग त्यांच्यावर नाराज होण्यामागे चीनच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमातील भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याशिवाय शांगफू यांच्यावर अमेरिकेने २०१८ मध्ये घातलेल्या निर्बंधांमुळे चीन-अमेरिका लष्करी संवादावर आलेली मर्यादा हेदेखील त्यांच्या हकालपट्टीचे एक कारण सांगितले जात आहे.
शांगफू यांच्या गच्छंतीमागे कदाचित भ्रष्टाचार वा अमेरिकेसोबतच्या लष्करी संवादावर आलेली मर्यादा हे कारण असेलही; पण सध्याच्या घडीला चीनमध्ये सर्व काही आलबेल नाही, हे मात्र निश्चित! चीनच्या पोलादी पडद्याआड काय चालले आहे हे जगाला कळणे तसे अवघडच असते; पण तरीही काही गोष्टी त्या पडद्यातूनही झिरपतातच आणि त्याआधारेच जिनपिंग यांची चीनवरील घट्ट पकड सैल होऊ लागल्याची चर्चा जगात सुरू झाली आहे.
देशाच्या प्रमुखालाच जेव्हा असुरक्षित वाटते...
- माओ झेडाँग यांच्यानंतरचा चीनचा सर्वात शक्तिशाली नेता अशी जिनपिंग यांची ओळख आहे. अलीकडेच त्यांनी एका व्यक्तीला राष्ट्राध्यक्ष पदावर किती काळ राहता येईल, यासंदर्भातील मर्यादा समाप्त करून, एकप्रकारे तहहयात राष्ट्राध्यक्ष पदावर राहण्याचा मार्ग मोकळा करून घेतला होता.
- आता जिनपिंग यांना आव्हान देऊ शकणारी कुणीही व्यक्ती चीनमध्ये नाही, असे मानले जाऊ लागले होते; परंतु कोरोना संकटानंतर चिनी अर्थव्यवस्थेला लागलेली घरघर, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा चीनमधून काढता पाय, जगाचे उत्पादन केंद्र या स्थानाला पोहोचत असलेला धक्का, जिनपिंग यांच्या महत्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पाच्या यशस्वीतेवर निर्माण झालेले प्रश्न, वाढती बेरोजगारी, धनाढ्यांचा चीनला रामराम, अशा आव्हानांमुळे जिनपिंग यांच्या नेतृत्वाला आव्हान मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे. गत तीन महिन्यांत चार मंत्र्यांची गच्छंती झाल्यामुळे त्या शक्यतेला आपसुकच बळ मिळते.
हा पराभव कोणाचा?
ली शांगफू आणि क्विन गँग हे दोघेही अवघ्या काही दिवसांपूर्वी जिनपिंग यांच्या गळ्यातील ताईत होते; पण गँग यांना अवघ्या सात महिन्यांत, तर शांगफू यांना अवघ्या आठ महिन्यांतच मंत्रिपदावरून हटविण्यात आले.
जिनपिंग २०१२ मध्ये सत्तेत आल्यापासून त्यांनी त्यांच्याशी एकनिष्ठ, सक्षम व स्वच्छ चारित्र्याच्या युवा नेत्यांना पुढे आणणे सुरू केले होते. त्यातीलच दोघांना अल्पावधीतच भ्रष्टाचार आणि डागाळलेल्या चारित्र्यामुळे हटवावे लागत असेल, तर तो एकप्रकारे जिनपिंग यांचाच पराभव असल्याचे मानले जात आहे.
प्रतिमेला तडे... यातच आले सारे
- काही जणांना या घटनाक्रमातून जिनपिंग यांची पक्ष व सरकारवरील पोलादी पकड अधोरेखित होत असल्याचे वाटत असले तरी, चीनवर एकचालकानुवर्ती सत्ता गाजविणारा कम्युनिस्ट पक्ष आणि सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही, हेदेखील ठसठशीतपणे समोर येत आहे.
- या घटनाक्रमामुळे जिनपिंग यांच्या निरंकुश सत्तेला भलेही लगेच धोका निर्माण होणार नाही; पण सार्वकालिक महान चिनी नेता अशी प्रतिमा निर्माण करण्याच्या त्यांच्या महत्वाकांक्षेला निश्चितच ठेच पोहोचू शकते!