विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
By रेश्मा शिवडेकर | Published: May 26, 2024 07:38 AM2024-05-26T07:38:26+5:302024-05-26T07:39:08+5:30
नीट, जेईई, एमएचटी-सीईटीची कटकट नको म्हणून आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या पारंपरिक अभ्यासक्रमांमधील करिअरच्या वाटा चोखाळणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सीईटी देणे बंधनकारक झाले आहे.
रेश्मा शिवडेकर, विशेष प्रतिनिधी
सीईटी म्हटले की मेडिकल, इंजिनीअरिंग, फार्मसी, लॉ, एमबीए अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी नजरेसमोर येत; परंतु मार्च २०२२ पासून आलेल्या ‘सीयुईटी’ (सेंट्रल युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट) नामक सीईटीमुळे पदवी अभ्यासक्रमांसाठीही सीईटी बंधनकारक ठरली आहे. आता बीबीए, बीसीए अशा अभ्यासक्रमांना व्यावसायिक ठरवून त्यांचेही प्रवेश सीईटीतून केले जाणार आहेत. थोडक्यात नीट, जेईई, एमएचटी-सीईटीची कटकट नको म्हणून आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या पारंपरिक अभ्यासक्रमांमधील करिअरच्या वाटा चोखाळणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सीईटी देणे बंधनकारक झाले आहे. बोर्डांच्या अभ्यासक्रमातील तफावतीमुळे जेईई, नीटसारख्याच नव्हे, तर एमएचटी-सीईटीसारख्या स्पर्धात्मक परीक्षांना क्लासशिवाय सामोरे जाताच येत नाही, अशी भावना विद्यार्थी-पालकांमध्ये तयार झाली आहे.
यंदा २४ लाखांच्या आसपास विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी केंद्रीय स्तरावर होणाऱ्या नीट सीईटीला बसले होते. एमएचटी-सीईटीच्या परीक्षार्थींची २०२१ मध्ये पाच लाखांच्या आसपास असलेली संख्या यंदा ७.२५ लाखांवर गेली आहे. राज्यातील मॅनेजमेंट कोर्सेसकरिता १.५२ लाख (गेल्या वर्षी १.३० लाख) विद्यार्थ्यांनी एमबीए-सीईटी दिली. राज्याचा सीईटी सेल ३८ अभ्यासक्रमांसाठी २० हून अधिक सीईटींचे आयोजन करतो. त्यात यंदा बीबीए, बीसीए, एएनएम, जीएनएम यांच्या सीईटींची भर पडली आहे.
कॉलेज जीवनच संपुष्टात
भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे इंटिग्रेटेड, टायअप असे नवनवीन शब्द शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रचलित होऊ लागले. कोचिंग क्लासेसच्या या समांतर व्यवस्थेने विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे कनिष्ठ महाविद्यालयीन जीवनच संपुष्टात आणले. कॉलेजातील अभिनय, लेखन, क्रीडा आदी व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या उपक्रमांमधील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग या संस्कृतीने पूर्णपणे थांबवला. ज्या महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ असायची, ती संपली. ज्युनिअर कॉलेजेस केवळ प्रात्यक्षिकांपुरती उरली.
क्लास चालकांचेच कॉलेजेस
आता तर क्लास चालकांनीच आपल्या क्लासेसची कनिष्ठ महाविद्यालये करून टाकली आहेत. पदवीच्या इतरही अभ्यासांच्या प्रवेशासाठी सीईटी बंधनकारक ठरू लागल्याने ही समांतर व्यवस्था आणखी फोफावणार आहे. या सगळ्यात शालेयकडून पदवी शिक्षणाकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची पायाभरणी करणारा उच्च माध्यमिक स्तरावरील पाया ढासळण्याच्या मार्गावर आहे.
सीईटीचे ३० वर्षांतील फलित काय?
सीईटीने बोर्डाच्या परीक्षेचे महत्त्व संपले असले तरी पात्रतेपुरते बारावीचे गुण आवश्यक असल्याने या परीक्षेकडे कानाडोळा करता येत नाही. त्यातून नाही मनासारखे कॉलेज मिळाले तर पदवी शिक्षणाचा पर्याय खुला राहतो. यामुळे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतींचा विद्यार्थ्यांवरील ताण सीईटीनंतर वाढल्याचे दिसून येते. थोडक्यात, सीईटीचे ३० वर्षांतील फलित काय, याचा विचार हाेण्याची गरज आहे.